मळगाव-सुतारवाडी बायपास डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत
swt1025.jpg
N76653
मळगावः सुतारवाडी बायपास रस्त्याची झालेली दैना.
मळगाव-सुतारवाडी बायपास डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत
महामार्ग प्रशासनाकडून दुर्लक्षः पायी चालणेही जिकिरीचे
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः झाराप-पत्रादेवी मार्गावरील मळगाव बॉक्सवेलजवळ, कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या सर्विस रस्त्यालगत असलेला सुतारवाडी बायपास रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे अजूनही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. मुख्य महामार्गाचे काम पूर्ण होऊनही अनेक वर्षांपासून या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. प्रशासनाच्या या जाणूनबुजून केलेल्या दुर्लक्षामुळे संतप्त ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सर्विस रस्त्याला लागूनच असलेल्या या रस्त्यावर उताराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील माती पूर्णपणे वाहून गेल्याने केवळ दगडधोंडेच शिल्लक राहिले आहेत. यामुळे येथून वाहन चालवणे तर सोडाच, पायी चालणेही जिकिरीचे झाले आहे. रात्रीच्या वेळी तर स्थानिकांना ये-जा करताना अधिकच त्रास सहन करावा लागतो. येथे एखादा मोठा अपघात झाल्यावर किंवा एखादा निष्पाप बळी गेल्यावरच राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला जाग येणार का0"असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. मुख्य महामार्गाचे काम झाल्यापासून हा रस्ता स्थानिकांच्या सोयीसाठी करून देण्याचे महामार्ग प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, तेव्हापासून महामार्ग प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोघांनीही या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने सध्या या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. ग्रामस्थांनी तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण करून वाहतुकीसाठी योग्य बनवण्याची मागणी केली आहे.
----------------
चौकट
खोटी आश्वासने
सुतारवाडी येथील ग्रामस्थांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकदा मागणी केली आहे. त्यांनी दोन वेळा उपोषणही केले. त्यावेळी लोकप्रतिनिधींनी रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. तसेच सावंतवाडी आणि ओरोस येथील सार्वजनिक बांधकाम विभागालाही ग्रामस्थांनी पत्र दिले होते. परंतु, तेथेही आश्वासने पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे संबंधित प्रशासन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
----------------