रत्नागिरी-सहावी व नववीतील विद्यार्थ्यांनी राखला नावलौकीक
सहावी, नववीतील विद्यार्थ्यांनी राखला नावलौकीक
परख राष्ट्रीय सर्वेक्षण; तिसरीचा शैक्षणिक स्तर घसरला
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या अखत्यारितील ''एनसीईआरटी''तर्फे परख राष्ट्रीय सर्वेक्षण २०२४ मध्ये रत्नागिरी जिल्ह्याने सहावी आणि नववीमध्ये अनुक्रमे ३ रा व ६ वा क्रमांक पटकावला आहे. त्यातही गणित व भाषा विषयात जिल्ह्याचा नावलौकिक टिकवला आहे; मात्र तिसरीतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. या वर्गाला १३वा क्रमांक मिळाला आहे.
परख सर्वेक्षणात कार्यक्षमता मूल्यांकन, पुनरावलोकन आणि समग्र विकासासाठी ज्ञानाचे विश्लेषण केले जाते. त्यासाठी देशपातळीवर तीन इयत्तांमधील मुलांच्या मूलभूत, पूर्वतयारी आणि मधल्या टप्प्यांतील कौशल्य विकासाचा प्राथमिक पातळीवर आढावा घेण्यात आला. परखचे व्यवस्थापन राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेअंतर्गत असलेल्या राष्ट्रीय मूल्यांकन केंद्राद्वारे केले जाते. त्यात विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे राज्य आणि जिल्हास्तरावर मूल्यमापन होते. त्यानुसार ४ डिसेंबर २०२४ रोजी देशपातळीवर ३ री, ६ वी आणि ९ वीच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण झाले. त्याचा निकाल जाहीर झाला आहे. परख सर्वेक्षणासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील १११ शाळांमधील २ हजार ८३८ विद्यार्थ्यांची निवड केली होती. त्यामध्ये भाषा, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्र, परिसर अभ्यास या विषयांचे सर्वेक्षण करण्यात आले.
परेख सर्वेक्षणात रत्नागिरी जिल्ह्याने शैक्षणिक स्तर चांगला ठेवण्यात यश मिळवले आहे. या उपक्रमात ६वीमध्ये जिल्ह्याने उदित म्हणजेच उत्कृष्ट काम केले आहे, तर ९वीतील विद्यार्थ्यांनी उदय म्हणजेच दुसरी ग्रेड मिळवली आहे; मात्र तिसरीतील विद्यार्थ्यांनी अपेक्षित टक्केवारी मिळवलेली नाही. यामध्ये जिल्ह्याला १३वे स्थान मिळाले आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाचा पाया अजूनही कच्चाच असल्याचा निष्कर्ष काढला जात असून, त्यादृष्टीने भविष्यात नियोजन करावे लागणार आहे. जिल्ह्यात कमी पडलेल्या भागांची माहिती घेण्याचे काम जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण विभागाकडून सुरू आहे. त्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे सहकार्य घेतले जाणार आहे.
------
चौकट १
परख सर्वेक्षणातील जिल्ह्याची स्थिती
* इ. तिसरी (९९० विद्यार्थी)
- भाषा ७३ टक्के
- गणित ६५ टक्के
* इ. सहावी (९२३ विद्यार्थी)
- भाषा ७० टक्के
- गणित ५८ टक्के
* इ. नववी (९२५ विद्यार्थी)
- भाषा ७१ टक्के
- गणित ४५ टक्के
- विज्ञान ४८ टक्के
- समाजशास्त्र ४९ टक्के
कोट
परखच्या सर्वेक्षणामध्ये सहावी, नववीतील विद्यार्थ्यांनी गतवर्षीच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे; मात्र तिसरीतील विद्यार्थ्यांची घसरण दिसत आहे. त्याचा अभ्यास करून पुढील वर्षात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी अध्ययन निष्पत्ती उपक्रमांतर्गत नियोजन केले जाईल.
- नीता कांबळे, प्र. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्र (डाएट)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.