गुणवंतांना १६ ला गोवा सायन्स सेंटर सफर
गुणवंतांसाठी १६ ला
सायन्स सेंटर सफर
कणकवली ः युवा संदेश प्रतिष्ठानतर्फे आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा २०२५ मधील दुसरी व तिसरीतील जिल्हा गुणवत्ता यादीतील प्रथम पाच अशा १० गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरुपात १६ ला गोवा सायन्स सेंटर येथे भेटीसाठी घेऊन जाण्यात येणार आहे. या सहलीचा प्रारंभ १६ ला सकाळी ७ वाजता कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून होणार आहे. सहलीदरम्यान पणजी येथील लायब्ररी, पर्यटनस्थळांना भेटीचा आनंद मुलांना देण्यात येणार आहे. युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संजना संदेश सावंत आणि संस्थापक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या संकल्पनेतून या सहलीचे आयोजन केले आहे. सहलीमुळे शालेय विद्यार्थ्यांना गोवा सायन्स सेंटर सोबतच पर्यटनस्थळांना भेट देता येणार आहे. गोवा सायन्स सेंटर सफरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रांजली पाटील, राघव गावकर, मानस चव्हाण, स्वरुपा मराठे, वेद चव्हाण, शांभवी मोहिते, स्वरा शिंदे, तन्वी भोसले, ऋषभ जाधव, आराध्य बंड यांचा समावेश आहे. यापूर्वी ११ ते १४ जून या काळात चौथी, सहावी, सातवीच्या एसटीएस परीक्षेतील पहिल्या पाच अशा पंधरा गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने ईस्त्रो भेटीसाठी घेऊन जाण्यात आले होते. एसटीएसची पुढील परीक्षा १८ जानेवारीला होणार असून फॉर्म वितरण सुरू झाले आहे.
..........................
सिंधुदुर्गनगरी येथे
२२ ला सैनिक दरबार
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरपिता, वीरमाता व अवलंबिताना यांच्या कुटुंबावरील अन्याय, अत्याचारांसंबंधित व इतर प्रलंबित अडचणी जाणून त्या सोडविण्यासाठी मंगळवारी (ता.२२) दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सैनिक दरबाराचे आयोजन केले असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली. जिल्ह्यातील ज्या माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरपिता, वीरमाता यांच्या कुटुंबावरील अन्याय, अत्याचारांसंबंधित व इतर प्रलंबित अडचणी, महसूल, पोलीस यंत्रणा, नगरपंचायत, पंचायत समितीविषयी कोणत्याही समस्या असल्यास त्या विषयाचे अर्ज १५ ला लेखी स्वरुपात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे सादर करावेत. जिल्ह्यातील ज्या माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरपिता, वीरमाता यांच्या कुटुंबावरील अन्याय, अत्याचारांसंबंधित व इतर प्रलंबित अडीअडचणी, महसूल, पोलीस यंत्रणा, नगरपंचायत, नगरपरिषद, पंचायत समिती विषयी समस्या निवारणासाठी सैनिक दरबाराकरीता उपस्थित राहवे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
...........................
सभासदांच्या गुणवंत
विद्यार्थ्यांना आवाहन
ओरोस ः सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सर्व सभासदांच्या गुणवंत मुलांचा दरवर्षी वार्षिक अधिमंडळ सभेत गुणगौरव केला जातो. वार्षिक अधिमंडळ सभेत ठरल्यानुसार, तालुकास्तरावर गुणानुक्रम दिला जातो. ज्या सभासदांची मुले फेब्रुवारी, मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या १० वी, १२ वी (चारही शाखा) तसेच ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये ६० टक्के पेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झाली आहेत, अशा तालुकास्तरावरील पहिल्या तीन गुणानुक्रमाच्या विद्यार्थ्यांची गुणगौरवासाठी निवड केली जाणार आहे. गुणगौरवपात्र विद्यार्थ्यांना सत्कारासाठी १० ऑगस्टच्या वार्षिक सभेत निमंत्रित केले जाणार आहे. संस्थेच्या ज्या सभासदांची मुले नमूद परीक्षांना किमान ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाली आहेत, अशांनी आपल्या मुला-मुलींच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत व सभासदाचे नाव, कार्यालय, सभासद क्रमांक, फोन नंबर आदी माहितीसह संस्थेकडे ५ ऑगस्टपूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन अध्यक्षा वर्षा मोहिते यांनी केले आहे.
.......................
निवृत्ती वेतनधारकांसाठी
सिंधुदुर्गनगरीत बैठक
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील राज्य शासनाच्या व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या अडचणींच्या निराकरणासाठी जिल्हा कोषागार कार्यालयाने तिमाही बैठक आयोजित केली आहे. ही बैठक बुधवारी (ता.१६) सकाळी ११.३० वाजता जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत, सीब्लॉक, तळमजला, दालन क्रमांक १२४, सिंधुदुर्गनगरी येथे होणार आहे. निवृत्तीवेतनधारक त्यांच्या कुटुंबातील लाभार्थ्यांना बँक, शासनाच्या सेवा-सुविधांशी संबंधित येणार्या अडचणींवर उपाययोजनांबाबत चर्चा होईल. निवृत्तीवेतनधारक संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी व बँक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. संबंधित निवृत्तीवेतनधारकांनी तक्रारी, हरकतींसह उपस्थित राहण्याचे आवाहन अप्पर कोषागार अधिकारी संजय घोगळेंनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.