क्राईम

क्राईम

Published on

दागिणे चोरी प्रकरणी
पाली येथे सुनेवर गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील पाली-मोहितवाडी येथे सुनेने रोख रक्कमेसह ३ लाख ६२ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसात सुनेविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना गुरूवारी (ता. १०) सकाळी बाराच्या सुमारास पाली-मोहितवाडी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्ताराम राजाराम मोहित (वय ५९, रा. मोहितवाडी पाली, रत्नागिरी) यांच्या मुलाशी लग्न झाल्यानंतर सुनेने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून गुरूवारी त्यांच्या घरातील त्यांच्या बेडरूममध्ये असलेल्या लोखंडी कॉटखाली ठेवलेल्या पत्र्याच्या कुलूपबंद पेटीचे कुलूप काढून त्यामध्ये ठेवलेले ६० हजार रुपये रोख रक्कमेसह ३ लाख ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पळवले. या प्रकरणी दत्ताराम मोहित यांनी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली.
-----------
आरोग्यमंदिर येथून
मोटारीची चोरी
रत्नागिरीः शहरातील मारूती मंदिर ते साळवीस्टॉप जाणाऱ्या रस्त्यावर आरोग्यमंदिर येथे दुकानाच्या समोर लावलेली मोटार चोरट्याने पळवली. संशयित चोरट्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (ता. ९) रात्री दहाच्या सुमारास आरोग्यमंदिर येथे घडली. फिर्यादी बशीर मुसा काझी (वय ५८, रा. एमआयडीसी झाडगाव, रत्नागिरी) हे मोटार (क्र. एमएच-०८ एजी २१६६) घेऊन साळवीस्टॉप येथे घरगुती कामासाठी निघाले होते. औषधे घ्यायची असल्याने ते मिल्लतनगरमार्गे आरोग्यमंदिर येथे आले. तेथे लॉरेन्स अॅन्ड मेयो या दुकानासमोर, पानवलकर कॉलनी आरोग्यमंदिर येथे गाडी उभी करून घाईगडबडीमध्ये चावी गाडीला ठेवून रस्त्याच्या पलीकडील बाजूला असलेल्या दुकानात औषधे घेण्याकरिता गेले. तेथे औषधे खरेदी करून झाल्यानंतर आरोग्यमंदिर येथे गाडीजवळ आले असता त्यांना गाडी दिसून आली नाही. या प्रकरणी बशीर काझी यांनी शहर पोलिसात तक्रार दिली.
----------------
वाहतुकीस अडथळा,
३ चालकांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरीः शहरातील कुवारबाव, गवळीवाडा ते धनजीनाका, मच्छीमार्केट ते चर्चरोड येथे वाहतुकीस अडथळा होईल, असे वाहन पार्क केले. या प्रकरणी शहर पोलिसात तीन संशयित चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रवींद्र महादेव जाधव (वय ४६, रा. सैतवडे, रत्नागिरी), भाग्यवान संतोष कवितके (वय ४१, रा. माळनाका, रत्नागिरी), अनिल तानू कावणकर (वय ४६, रा. अडूर, ता. गुहागर, रत्नागिरी) अशी संशयित चालकांची नावे आहे. या घटना गुरूवारी (ता. १०) दुपारी दीड ते सायंकाळी सहाच्या सुमारास कुवारबाव, धनजीनाका, चर्चरोड येथील सार्वजनिक रस्त्यावर निदर्शनास आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित रवींद्र जाधव यांनी टेम्पो ट्रॅव्हल्स (क्र. एमएच-०८ इडब्ल्यू ५४९५) दुपारी दीड वाजता कुवारबाव येथील इंडियन ऑइल पेट्रोलपंपसमोर अडथळा होईल, अशी लावून ठेवली. भाग्यवान कवितके यांनी पिकअप् गाडी (एम.एच -०८ डब्ल्यू ५१४९) ही धनजीनाका रस्त्यावर तर अनिल कावणकर यांनी टेम्पो (क्र. एमएच-०८ डब्ल्यू ६५९९) मच्छीमार्केट ते चर्चरोड जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होईल, असे वाहन पार्क केले. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल महेंद्र खापरे, वैभव नार्वेकर, प्रमोद कांबळे यांनी शहर पोलिसात तक्रार दिली.
------------
मद्यधुंद अवस्थेतील
तीन संशयितांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरीः जयगड परिसरातील सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत व मद्यपान करणाऱ्या तीन संशयितांविरुद्ध जयगड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. अनंत दुळाजी मांजरेकर (वय ६६, रा. वाटद वाघोकोडावाडी, रत्नागिरी), प्रकाश यशवंत पावरी (वय ५४, रा. गणेशवाडी जयगड, रत्नागिरी), संदेश सूर्यकांत बलेकर (वय ३२, रा. कांबळेलावगण, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना गुरूवारी (ता. १०) दुपारी दोन ते रात्री पावणेआठच्या सुमारास वाटद-मिरवणेफाटा, गणेशवाडी-जयगड व वाटद -खंडाळा बसस्थानक या ठिकाणी निदर्शनास आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित मांजेकर हे मद्यधुंद अवस्थेत असताना आढळले. प्रकाश पावरी मद्यपान करताना निदर्शनास आले तर संदेश बेलकर हे मद्यधुंद अवस्थेत असताना सापडले. या प्रकरणी पोलिस हवालदार प्रसाद सोनावले, पोलिस शिपाई प्रितेश लोटणकर यांनी जयगड पोलिसात तक्रार दिली.
--
मटका जुगारावर
पोलिसांचा छापा
रत्नागिरी ः शहरातील परटवणे तिठा येथील बंद टपरीच्या आडोशाला विनापरवाना मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. साहित्यासह ३ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शहर पोलिसात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संतोष यशवंत मयेकर (वय ५१, रा. काळबादेवी, मयेकरवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरूवारी (ता. १०) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास परटवणे तिठा येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित हा विनापरवाना मटक-जुगार चालवत होता. त्याच्याकडून साहित्यासह ३ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हेडकॉन्स्टेबल अमित कदम यांनी शहर पोलिसात तक्रार दिली.
------------
पुणे येथील वृद्धेचा
आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः गुरूपौर्णिमेला तालुक्यातील नाणीजधाम येथे गेलेली वृद्ध महिला आजारी पडली. उपचारासाठी तिला ग्रामीण रुग्णालय पाली येथे दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. अनिता गोपीनाथ मडके (वय ५९, रा. जगताप बिल्डिंग ता. हवेली, जि. पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना गुरूवारी (ता.१०) सकाळी सव्वादहाच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय पाली येथे घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com