रानभाज्यांनी दिला महिला शेतकऱ्यांना आर्थिक आधार

रानभाज्यांनी दिला महिला शेतकऱ्यांना आर्थिक आधार

Published on

-rat१२p१४.jpg -
P२५N७७०२६
चिपळूण : शहरातील चिंचनाका भागात रानभाज्यांची विक्री करताना महिला शेतकरी.
-----
रानभाज्यांचा महिला शेतकऱ्यांना आधार
चिपळूणसह कामथे घाटात विक्री ; औषधी गुणधर्मामुळे चांगला भाव
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ : पावसाळा सुरू होताच रानावनात तयार होणाऱ्या विविध प्रकारच्या रानभाज्यांची आवक वाढली आहे. ग्रामीण भागातील महिला शहरातील रस्त्याच्या कडेला बसून या भाज्यांची विक्री करत आहेत तर काही घरोघरी फिरून भाजीविक्री करत आहेत. त्यातून महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
चिपळूण तालुक्याचा पूर्वेचा परिसर हा डोंगराळ आहे. निसर्गरम्य असलेल्या परिसरात पावसाळ्यात नैसर्गिक रानभाज्या उगवतात. यात कोरल, चवळीभाजी खापरा, अंबाडी, शेवाळे, मायाळू, आळूची पाने, शेवग्याच्या शेंगा, माठ भाजी, कुळूची भाजी, कोरड, बांबू नाळे, कवळी, माठ, टाकळा, लोत, शेवली, तेरा, कडूकंद, फांग, चाईचा मोहर, बोखरीचा मोहर, टेहरा, वायरटे, रानकंद मोखा, वाघाटा, दिघवडी, भूईफोड, उळशाचा मोहर, कंटोली अशा विविध भाज्यांचा समावेश आहे. अनेक भाज्यांना औषधी गुणधर्म असल्याने खवय्यांकडून मोठी मागणी असते. त्यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या महिला रानभाज्या रानावनात फिरून गोळा करून त्या शहरात येऊन विकतात, तसेच कामथे घाटात रस्त्यांच्या कडेला जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांमधील प्रवाशांना सहज दिसतील, अशा प्रकारे मांडून विक्रीसाठी बसून आपला रोजगार मिळवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
करटुले, चिचुर्डे आदींची किलोच्या दराने विक्री होते. कळवंडे, मिरजोळी, पाचाड, कामथे, गोवळकोट, जुवाड, उकताड या भागातील महिला भाजी विक्रीसाठी चिपळूणला येतात.

चौकट
जंगलतोडीमुळे प्रमाण घटले
मागील काही वर्षांपासून जंगल व डोंगरपट्ट्यात अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे जंगलपट्टा हा कमी होऊ लागला आहे. रानावनात उगवणाऱ्या रानभाज्यांचे प्रमाण कमी झाले आहे. सुरुवातीला अगदी जवळच्या रानात गेले तरीही रानभाज्या दिसून येत होत्या. आता पूर्ण जंगलपट्टा फिरून रानभाज्या गोळा कराव्या लागत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.

कोट
रानभाज्या विक्रीतून दिवसाला साधारणपणे पाचशे ते सहाशे रुपये मिळतात. हा रोजगार हंगामी स्वरूपाचा आहे. त्यासाठी कोणते भांडवल लागत नाही. गावातून एसटीने चिपळूणला येतो. भाजीविक्री झाल्यानंतर पुन्हा एसटीने घरी जातो. पाऊस नियमित झाल्यास रानभाज्या उगवण्याचे प्रमाण वाढेल.
- सोनाली चव्हाण, पाचाड, भाजीविक्रेती

कोट
पावसाळ्यात आम्ही रानभाज्या गोळा करण्यासाठी सकाळीच मिरजोळीच्या डोंगरात जातो. जवळपास दोन ते चार तास फिरल्यानंतर १० ते २० जुड्यांपर्यंत भाजी मिळते. विक्रीतून दिवसाकाठी सुमारे २०० ते ३०० रुपये मिळतात. संपूर्ण हंगामभर दररोज मिळणाऱ्या या रकमेचा मोठा आधार उदरनिर्वाहासाठी होतो.
- भारती कदम, मिरजोळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com