आम्ही कधी जागे होणार ?
rat१३p७.jpg-
N७७२०३
डॉ. प्रशांत परांजपे
इंट्रो
महाराष्ट्रात पर्यावरण आणि पर्यटन या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जात असतानाच दुसऱ्या बाजूने महाराष्ट्रातील कोकणकिनारपट्टीचा कोळसा करण्याचा विडा अजाणतेपणी उचलल्याचे चित्र दिसत आहेत. यामध्ये बदल होणे अत्यावश्यक आहे. अन्यथा २०५० नंतर आपण आपल्याच हाताने विनाशाचा महामार्ग उभारण्यात अग्रेसर राहू. आता प्रत्येकाने ठरवायचे आहे की राम मार्गाने जायचे की वाम मार्गाने...!
- डॉ. प्रशांत परांजपे, दापोली
-----
आम्ही कधी जागे होणार ?
महाराष्ट्रात दोन गावांना जागतिक पर्यटनाचा दर्जा मिळण्याची तयारी सुरू असतानाच दुसऱ्या बाजूने हरितमय आच्छादन कमी करण्याचा सपाटा; रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली अनेक ठिकाणी सुरू असल्याचे विदारक चित्र आहे. नैसर्गिक पर्यटनात वाढ करण्याकरता एका बाजूने महाराष्ट्र शासन कृषी पर्यटन, निसर्ग पर्यटन अशा योजना राबवत आहे आणि दुसऱ्या बाजूने जी निसर्ग संपन्नता आहे, तिच्यावरच घाला घातला जात आहे.
पर्यटनावर आधारित विकास साधायचा असेल तर, निसर्ग संवर्धनावर भर दिला पाहिजे. पर्यटन आणि निसर्ग संवर्धन करताच आर्थिक वृद्धीचे प्रत्यंतर आपल्याला महाबळेश्वरला गेल्यावर नक्कीच येते. महाबळेश्वरला पर्यटक का आकर्षित होतात ० कारण तेथील थंड हवा, आल्हाददायी असे निसर्ग संपन्न वातावरण, गच्च झाडीने भरलेले डोंगर आणि दरी. हेच असल्याचे आपल्या लक्षात येईल. या ठिकाणी कोणत्याही पर्यटन स्थळावर झाडांना कोयती लावण्यास मनाई आहे. जंगले वाढवायची असतील तर त्यांना स्वायत्तता देणं आवश्यक आहे. मात्र आपण झाड घरात लावण्याचा हट्ट करतो आणि त्यांना संकुचित बनवून टाकतो. आज महाबळेश्वरचे पर्यटन पाहीले तर तिथे होणारी प्रचंड गर्दी, वृक्ष कटाई, रस्ता रुंदीकरण या गोष्टी दिसतात. जर हेच चित्र कोकणात दिसले तर, येथे येणाऱ्या लाखो पर्यटकांची संख्या पुन्हा हजारात व्हायला वेळ लागणार नाही. महाबळेश्वर हे एक उत्तम उदाहरण आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या दापोलीची परिस्थितीही काही वेगळी नाही. एका बाजूला भारतातील पहिले सागरी पर्यटन स्थळ, जागतिक वारसा असलेले किल्ले सुवर्णदुर्ग आणि आता येऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यटन दर्जाच्या ब्लू फ्लॅग मानांकनाकरिता निवड झालेल्या दोन गावांची लक्षवेधी नोंद. भारतामधील काही निवडक गावे ही ब्लू फ्लॅग मानांकनासाठी निवडली गेली. त्यामध्ये महाराष्ट्रात फक्त दोन गावांची निवड झाली, ते भाग्य कोकणाला लाभले आहे. या मानांकनासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील लाडघर आणि कर्दे ही दोन गावे घेतली गेली आहेत. या मानांकनाचा मुख्य उद्देश किंवा त्याचा पाया हा निसर्ग संवर्धन, स्वच्छता, शाश्वत पर्यावरण, स्वच्छ किनारा आणि स्वच्छ पाणी हाच आहे. हे मानांकन मिळवण्याकरता अनेक काठिन्य पातळ्यांवरून येथील गावांना जावे लागणार आहे. त्यासाठी येथील ग्रामस्थ, नागरिक तयारीला लागले आहेत. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. मात्र असे असतानाही विकासाच्या नावाखाली याच तालुक्यात बेधुंदपणे वृक्ष कटाई सुरू झाली आहे. तालुक्याचे प्रवेशद्वार गलिच्छतेने नटलेले आहे. काही ठिकाणी वृक्षांचे प्रत्यारोपण सुरू असल्याचे दिसून येते, मात्र या प्रत्यारोपण केल्यानंतरच्या वृक्षांची जगण्यातची एकंदरीतच टक्केवारी पाहिली तर जागतिक मानांकन मिळाल्यानंतर येणाऱ्या लाखो परदेशी पर्यटकांच्या समोर काय चित्र असेल याचा विचार प्रत्येक सुजाण नागरिकांनी करणे आणि शासनाने करणं अत्यावश्यक आहे.
विकास म्हणजे फक्त रुंद रस्ते नाही. विकास म्हणजे खड्डे मुक्त आणि सुरक्षित रस्ते असा विचार करणे अत्यावश्यक आहे. कारण शेकडो वर्षांपूर्वी रस्त्याच्या बाजूला लावलेली झाडे, काही तासात नेस्तनाबूत करून तिथे निसर्गावर अत्याचार करत सर्वत्र सपाटीकरणाच सपाटा सुरू आहे. हे करताना भीक नको पण, कुत्रा आवर असे म्हणण्याची वेळ सामान्य नागरिकांवर आली आहे. कारण ज्या ठिकाणी पूर्वीचा चांगला रस्ता होता, तिथे रुंदीकरणाच्या नावाखाली अनेक वर्ष अतिशय सौंदर्याने नटलेला आणि खड्डे विरहित असलेला मार्ग हा कष्टप्राय असा मार्ग बनलेला आहे. आंबेनळी घाटही पाच दिवस बंद ठेवावा लागला. कारण डोंगर रस्त्यावर धावून आला. मानवाच्या अत्याचाराचे हे प्रत्यंतर आहे. मानवाने निसर्गावर अत्याचार करण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे निसर्ग कोपला आहे. तो पदोपदी आपला चुकीचा मार्ग अडवतो आहे; तरीही मानवाला जाग येत नसल्याचे दुर्दैवी चित्र दिसून येते आहे. स्थिरता हवी असेल तर, धीर धरणे आवश्यक आहे. थोडासा लांबचा मार्ग अवलंबणे गरजेचे आहे. कोणताही जवळचा मार्ग (शॉर्टकट) हा नेहमीच घातक असल्याचे अनेक उदाहरणावरून लक्षात येते. १९६० च्या दशकात जन्माला आलेल्या प्लास्टीक कॅरी बॅग ने सुमारे पन्नास वर्षांपूर्वी उत्तम बाळसे घेतले आणि हीच इझी टू यूज प्लास्टीकची कॅरीबॅग ही वापरायला सोपी वाटली आणि तिने मानवाच्या आणि निसर्गाच्या गळ्याभोवती कधी फास आवळला हे आपल्याला कळलेच नाही. हे अत्यंत बोलके आणि ताजे उदाहरण आहे. प्लास्टिकच्या अतिरिक्त वापरामुळे आज मानवाच्या रक्तामध्ये, मेंदूमध्ये आणि गर्भाशयापर्यंत प्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण (मायक्रो कण) हे गेल्यामुळे मानवाच्या प्रकृतीवर विकृत असा परिणाम घडलेला दिसून येतो आहे. ज्या पद्धतीने मानवाचे आरोग्य बिघडते आहे, त्याच पद्धतीने निसर्गाचे आरोग्यही बिघडलेले आहे. विकासाच्या दिशा बदलणं अत्यावश्यक आहे, अन्यथा आपली दशाच होणार आहे.
समुद्रानेदेखील जमिनीकडे आगेकूच करण्यास सुरुवात केली आहे. कोकणातील गुहागर, केळशी, आडे, मुरुड आदी ठिकाणी समुद्राने जमीन गिळंकृत केल्याचे लक्षात येईल. तरीही आम्ही जागे होणार नाही. निसर्गावरील अनन्वित अत्याचार असेच सुरू राहिले तर २५० नंतर मानवाचे जीवन अतिशय कष्टप्राय होणार आहे. किंबहुना संपुष्टाच्या दिशेने अतिशय वेगवान अशी चाल सुरू होणार आहे. ही धोक्याची घंटा आम्ही वारंवार निदर्शनास आणून देत आहोत. त्यामुळे आता प्रत्येकाने निसर्ग संरक्षण हेच आमचे प्रथम उद्दिष्ट मानून, माझ्याकडून या निसर्गावर कोणत्याही प्रकारचे अत्याचार होणार नाहीत, जलप्रदूषण, जमीन प्रदूषण, वायू प्रदूषण यामध्ये माझ्याकडून कोणताही प्रकारचा हस्तक्षेप होणार नाही. हे मी टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करेन, अशी प्रत्येकाची धारणा होणे आता काळाची गरज आहे.
-----
(लेखक शाश्वत पर्यावरण विकास विषयातील डॉक्टरेट पदवीधर आहेत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.