युवकांचा शेतीत सहभाग आवश्यक
77254
युवकांचा शेतीत सहभाग आवश्यक
सुबोधिनी परब; आंबडोस पावनवाडीत ‘श्री’ लागवडीचे प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १३ ः शेतीला व्यवसायाची जोड व युवकांचा शेतीमधील सहभाग वाढावा, असे आवाहन आंबडोस सरपंच सुबोधिनी परब यांनी गावातील पावणवाडी येथे आयोजित भात पीक श्री लागवड शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना केले. आंबडोस पावनवाडी येथे नारायण नाईक यांच्या प्रक्षेत्रावरती युएनडीपीजीसीएफ व मालवण तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे युएनडीपीजीसीएफ अंतर्गत भात पीक श्री लागवड शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता.
सरपंच सौ. सुबोधिनी परब यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी युएनडीपी जिल्हा समन्वयक रोहित सावंत, मालवण उप कृषी अधिकारी डी. डी. गावडे, आंबडोस ग्रामपंचायत अधिकारी गणेश नलावडे, तालुका पिक विमा प्रतिनिधी प्रद्युम्न माईंनकर व प्रनिल नार्वेकर, प्रगतशील शेतकरी सुरेश साळकर, गोविंद धुरी, नांदरुख पोलिसपाटील सिद्धेश साळकर, कृषी सेवक श्रीमती एस. आर. खोत तसेच प्रशिक्षणार्थी शेतकरी उपस्थित होते.
यावेळी युएनडीपी जिल्हा समन्वयक रोहित सावंत यांनी युएनडीपीजीसीएफ अंतर्गत आयोजित या प्रशिक्षणाचे प्रस्ताविक मांडताना महत्त्व सांगितले. यावेळी त्यांनी श्री पद्धतीचे महत्त्व, फायदे अधोरेखित केले. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी श्री भात लागवड पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन केले. उपकृषी अधिकारी गावडे यांनी श्री भात लागवड पद्धतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना समजावून सांगितले. यामध्ये चटई रोपवाटिका, ९ ते १२ दिवसातील रोपांची नियंत्रित लागवड, दोन रोपांमधील व दोन रोपांच्या ओळीतील अंतर किती असावे? खताचे व पाण्याचे योग्य व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत अधिकारी नलावडे यांनी, श्री पद्धतीने भात लागवडीचे महत्त्व अधोरेखित केले. प्रगतशील शेतकरी सुरेश साळकर व गोविंद धुरी यांनीही विचार व्यक्त केले. पिक विमा प्रतिनिधी प्रद्युम्न माईंनकर यांनी चालू वर्षातील खरीप पिकांच्या विमा योजनेची माहिती दिली. तसेच श्री पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक केले. कृषी सेवक श्रीमती खोत यांनी सूत्रसंचालन केले.