माचाळ, पर्यटनाचा सुकाळ

माचाळ, पर्यटनाचा सुकाळ

Published on

rat13p11.jpg
77263
लांजाः धुक्यात लपटलेली माचाळ.
rat13p13.jpg
77265
माचाळः येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी उभे केलेले सूचना फलक.
- rat13p14.jpg-
77266
कचरा टाकण्यासाठी बसविण्यात आलेली कचरा संकलन शेड.
- rat13p15.jpg-
77267
माचाळ येथील नयनरम्य दृश्य.
rat13p12.jpg-
77264
माचाळ गावात जाण्यासाठी झालेला रस्ता.
----------------
इंट्रो
संपूर्ण राज्यात उत्तम पर्यटनस्थळ अशी ओळख झालेल्या लांजा तालुक्यातील ‘माचाळ’ या पर्यटन गावात सध्या वर्षा पर्यटनासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं येऊ लागले आहेत. दर शनिवार आणि रविवारी माचाळच्या टेकडीवर स्थानिकांबरोबरच परजिल्ह्यातील पर्यटक हजेरी लावत आहेत. समुद्र सपाटीपासून सुमारे ४ हजार उंचीवर निसर्ग सौंदर्याने नटलेला हा परिसर सतत धुक्याने वेढलेला असतो. डोंगरावरील हिरवीगार झाडी, नागमोडी रस्ते, गारेगार हवा पर्यटकांना आकर्षित करते. पायथ्यापासून थेट माचाळ टेकडीपर्यंत डांबरी रस्ता झाल्यामुळे वाहन तिथपर्यंत घेऊन जाणे अधिकच सोयीचे झाले आहे. त्यामुळे यंदा पर्यटकांची गर्दी अधिकच होत आहे. निसर्गसंपन्न माचाळ ४०० वर्षांपुर्वीच्या इतिहासाचे साक्षीदारही आहे. पर्यटक वाढू लागल्याने माचाळवासीयांना रोजगाराचे साधन निर्माण झाले असून तेथील सौदर्य जपण्याची व जबाबदारीही तितकीच वाढलेली आहे....!
- रवींद्र साळवी, लांजा
-------
विलोभनीय माचाळचे सौंदर्य जपुया
वर्षा, साहसी धार्मिक पर्यटनाला उत्तम ; कस लावणारा ट्रेक

लांजा शहरापासून ३२ किलोमीटर अंतरावर माचाळ हे गाव आहे. समुद्रसपाटीपासून ४००० फुट उंचीवर असलेले हे माचाळ गाव म्हणजे सह्याद्रीच्या टोकावर एक आडवे रानमाळच. जे तब्बल १५०० एकर जमीन क्षेत्रात विस्तारलेले आहे. लांजा तालुक्यातील केळवली गावातून माचाळकडे जाताना वळणावळणाच्या घाटातून जाताना हिरव्यागार परिसराने कुणीही सुखावून जाईल असेच आहे. महाबळेश्वर, चेरापुंजी या भागाप्रमाणेच माचाळमध्ये पाऊस पडतो. त्यामुळे या गावाला मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. घाटातील डुक्करकडा या ठिकाणावरुन दोन्ही बाजूने निसर्ग न्याहाळता येतो.
आता जिथे घाट फोडला आहे, तिथुनच माचाळच्या टेकडीवर जाताना निसर्गाने आपले मिनिटामिनिटाला पालटलेले रुप पाहायला मिळते. पावसाची एक सर आली की खाली दिसणारी गावे दाट धुक्यात दिसेनाशी होतात. इथली सजीवसृष्टी, जैवविविधता अभ्यासाचा विषय ठरू शकतो. माचाळमधील एक भाग तर पूर्णपणे कडीपत्त्याचे जंगलच आहे. छोटे-मोठे ओढे, वहाळ पार करताना इथे लाल खेकडे दिसतात. इथल्या वहाळात रतु नावाचा छोटा मासा दिसतो. एक काळजी घेण्यासारखा जीव इथे आहे, जो रक्तपिपासू किडा आहे. त्याचे नाव जळू आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल सात दशकाहून जास्त काळ कोकणातील एका खेड्याला रस्त्यासाठी वाट पाहावी लागली. संपूर्ण जग कोरोनासोबत लढत असताना या गावात रस्ता झाला व विकासपर्वाला सुरवात झाली आहे.
----
- rat13p16.jpg-
77268
मुचकुंद ऋषींची गुहा

मुचकुंद ऋषींच्या गुहेचे आकर्षण

पावसाच्या डाव्या बाजूला पश्चिमेकडे किमान अर्धा तास चालत गेल्यावर मुचकुंद ऋषींची गुहा लागते. गुहेकडे जाताना वाटेत मुचकुंदी नदीचे उगमस्थान असलेले कुंड आहे. गुहेकडे चालत जाताना पायाला जळू चिकटून रक्त शोषून कधी मोकळ्या होतात, हे कळत नाही. म्हणून चालताना काळजी घ्यावी लागते, महाभारतात क्रोधिष्ट आणि आगीचा गोल्छा म्हणून प्रसिद्ध पावलेल्या मुचकुंद ऋषींच्या गुहेजवळ गेल्यावर कालिया दानवाला भगवान श्रीकृष्णाने मुचकुंद ऋषींद्वारे भस्मसात केले होते. त्या कथेच्या आठवणीला उजाळा मिळतो. या दानवाला ज्या गुहेत मुचकुंद ऋषींनी भस्मसात केले, त्या गुहेचा ग्रामस्थांनी जीर्णोद्धार केला असून तेथे श्रीकृष्ण आणि मुचकुंद ऋषींच्या मूर्ती उभारल्या आहेत. तेथे महाशिवरात्रीला होणाऱ्या उत्सवाला मोठ्या संख्येने भाविक भेट देतात. या भागातून दिसणारे विलोभनीय सौंदर्य आणि सूर्यास्त भुरळ घालणारा आहे.
----

साहसी पर्यटनही शक्य

माचाळला गिर्यारोहण, रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग, ट्रेकिंग, कॅम्पिंग, राफ्टिंगसारखे साहसी खेळ सुरू करता येऊ शकतील. माचाळचे पठार नैसर्गिक गोल्फ कोर्सच आहे. पूर्वापार सह्याद्रीच्या दुर्गम प्रदेशात घोडेस्वारी हे प्रवासाचे साधन होते. तेच साधन पर्यटकांना आकर्षण करण्यासाठी महत्वाचे ठरेल. सध्या मुंबई, पुण्यासारख्या महानगरी वातावरणात वाढलेल्या मुलांना खेडे कसे असते, हे दाखवण्याचा ‘व्हिजिट व्हिलेज’ हा पर्यटनप्रकार विकसित होत आहे. यासाठीही माचाळ उत्तम पर्याय ठरेल, असे पर्यटन अभ्यासक विजय हटकर यांनी सांगितले.
-----

रोजगार संधीही उपलब्ध

माचाळच्या पायथ्याशी वसलेल्या शिपोशी गावातील शहनवाज सारंग हा युवक माचाळवासीयांसाठी आधार बनला असून माचाळवासीयांसह माचाळला जाणाऱ्या पर्यटकांची ने-आण करण्यासाठी मातोश्री ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून योग्य मोबदला घेत तो सुविधा पुरवित आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर माचाळला रस्ता पोहचल्यानंतर अवघड वळणावळणाच्या या घाटरस्त्यावर शहनवाज सहजपणे गाडीने प्रवास वाहतूक करीत असतो. या घाट रस्त्याचे पूर्ण डांबरीकरण झाले नसल्याने शक्यतो माचाळला येणाऱ्या पर्यटकांनी माहिती घेणे योग्य ठरेल. माचाळ भागातील नागरिकांना पायथ्याशी वसलेल्या केळवली गावात सोडणे व परत माचाळला पोहचविणे हे काम करता करता शहनवाज आता पर्यटकांनाही माचाळला सोडतो, सोबतच माचाळची परिपूर्ण माहिती त्याला असल्याने तो पर्यटनदूताचे कामही करतो. त्याच्यासोबत त्याचा दुसरा भाऊ फारूखही माचाळ-केळवली या मार्गावर वाहन व्यवस्थेत त्याला मदत करतो.
--------
77283
माचाळ विशाळगड ट्रेकवरील पाऊलवाट

माचाळ-विशाळगड घाटवाटातील ‘ट्रेक’

विशाळगडाहून खाली कोकणात उतरण्यासाठी भरपूर घाटवाटा आहेत, त्यातील बऱ्याच घाटवाटांमधून ट्रेकर्स ट्रेक पण करतात. पण विशाळगड -माचाळ हा यातील सर्वात लोकप्रिय ट्रेक असून माचाळवरुन कोकण दरवाजातून घोड्याची टाप मार्गे विशाळगडला जाता येते. पश्चिम महाराष्ट्रातून येणारे सह्यवीर विशाळगडवरुन माचाळला ट्रेक करत भेट देणे पसंत करतात व माचाळला येऊन माचाळ गाव, मुचकुंद ऋषीची गुहा, स्वर्गीय सुंदर खोरेनिनको खोरे, याचा आनंद घेतात. कोकणातून, म्हणजेच माचाळच्या दक्षिणकडे एक दरी उतरून विशाळगडाच्या कोकण दरवाजापाशी साधारण दीड ते दोन तासात आरामात पायी पोहोचता येते. ही अगदी व्यवस्थित मळलेली घाटवाट आहे. या वाटेचा उपयोग गावकरी अजून गडाकडे जाण्यासाठी करतात. काही गावकरी दूध विकण्यासाठी तिकडे जातात, काही रेशन भरण्यासाठी किंवा गडावर नोकरीसाठी जाण्या येण्यासाठी या वाटेचा उपयोग करतात. वाटेत जाताना वातावरण एकदम आल्हाददायक असते, पावसाळा असल्याने कायम ऊन, पाऊस धुके यांचा खेळ चालू असतो आणि त्यामुळे ट्रेक रमणीय होतो.
-------
एक नजर
- माचाळ-विशाळगड-माचाळ घाटवाट ट्रेक
- घाटमाथ्यावरचे गाव: माचाळ
- ऐतिहासिक खुणा : वाटेत घडीव दगडाच्या पायऱ्या, कोकण दरवाजा, कोकण दरवाजाअगोदर खाली एक एक गुहा आहे, जी वर गडावर निघते, पण सध्या बुजलेली आहे., तटबंदी, वाघजाई मंदिर
- मुक्कामाची सोय : माथ्याजवळ माचाळ गावात किंवा गडावर
- वेळ : तीन तास (दीड तास जाण्यास आणि दीड तास येण्यास लागतात)
----
चौकट
पर्यटकांचा धुडगूस

माचाळ येथे वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या मद्यधुंद हुल्लडबाज पर्यटकांकडून तेथील निसर्ग सौंदर्याला गालबोट लावण्याचे प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर लांजा पोलिसांकडून बेशिस्त पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे हुल्लडबाज बेशिस्त पर्यटकांची धावपळ उडाली होती. माचाळ येथे येणारे पर्यटक मद्य पिऊन धुडगूस घालतात, मद्याच्या बाटल्या फोडून वाटेत टाकतात. खाण्याचे पदार्थ रस्त्यात फेकतात. तसेच मद्यप्राशन केलेल्या पर्यटकांकडून आपल्या कुटुंबीयांसह येणाऱ्या पर्यटकांना तसेच ग्रामस्थांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत असतो. पर्यटनाच्या नावाखाली येणाऱ्या पर्यटकांकडून अश्लिल चाळे, ग्रामस्थांना दादागिरी करून दाखवणे, वस्तूंची अवास्तव मागणी करत धमकी देणे. तेथे असणाऱ्या मुचकुंदी ऋषींच्या गुहेजवळ मद्याच्या बाटल्या टाकून पवित्र ठिकाण अपवित्र करण्याचे कृत्य सुरू असते. या गैरप्रकारांना माचाळवासीय कंटाळले आहेत. गैरवर्तन करणाऱ्या आणि निसर्ग सौंदर्य बिघडवण्याचे प्रकार करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी माचाळ ग्रामस्थांच्या वतीने सातत्याने होत होती. त्याची तत्काळ दखल घेत पोलिसांनी माचाळ येथे धडक कारवाई केली.
-----

स्वच्छतेसाठी फलक

पालू ग्रामपंचायतीने माचाळ येथे पर्यटकांसाठी सूचना फलक लावले आहेत. तसेच स्वच्छता राखण्यासाठी कचरा संकलन शेडही उभारली आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यंटकांनी निसर्गसौंदर्याचा आनंद घेताना बेशिस्तपणा केला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात येणार आहे. याबाबतची सूचना फलकाद्वारे केली आहे. पालू ग्रामपंचायतीने माचाळ येथे येणाऱ्या पर्यटकांनी निसर्गसौंदर्याचा आनंद घेताना कोणत्याही पद्धतीने तेथील सौंदर्याला गालबोट लागणार नाही, याची दक्षता घ्यावी अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे फलक लावण्यात आले आहेत.
--------
चौकट
जमीन खरेदी-विक्री व्यवहार बंद

माचाळ या गावातील जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार शासनाकडून थांबविले गेले आहेत. या गावातील सर्वाधिक जमीन काही वर्षांपूर्वी धन धांडगे, श्रीमंताने कवडीमोल भावाने खरेदी करून ठेवली आहे.
------

....हे करणेही गरेजेचे !

ग्रामीण लोकजीवनासह पावसाळ्यात वर्षा पर्यटन तसेच उन्हाळ्यात साहसी पर्यटनाचे थ्रील माचाळला अनुभवता येते. मात्र त्यासोबत आणखी काही सुविधा दिल्या तर पर्यटकांसाठी अनोखा अनुभव ठरु शकतो. प्रवेशद्वार लक्षवेधी भगवान श्रीकृष्ण आणि मुचकुंद ऋषींचा भव्य पुतळा, कलामहोत्सवांचे आयोजन, ग्रामीण संस्कृतीचे आणि येथील स्वर्गीय निसर्गाची अनुभूती देणारे कल्पक संग्रहालय, माचाळच्या विस्तीर्ण पठारावरील विविध ठिकाणे एकमेकांना जोडणे, मुचकुंद ऋषींच्या गुहा परिसरात चित्ररूप सफर घडवून आणणारे ‘गिरीस्थान कलाकेंद्र’ उभारले पाहिजे. ऐतिहासिक व पौराणिक पर्यटनस्थळ म्हणूनही माचाळचा विकास साधता येऊ शकतो. तसेच मुचकुंदी नदी परिक्रमाद्वारे नदीच्या उगमस्थानाच्या माध्यमातून सहलीचे आयोजनही करता येईल, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.
----
कोट १
माचाळ हे हिल स्टेशन म्हणून प्रसिद्धीला येत आहे. कोकणी संस्कृती आणि निसर्ग सौंदर्य अनुभवायला येणाऱ्या पर्यटकांचे स्वागतच आहे. मात्र येथील निसर्गाला बाधा पोहोचणार नाही याची काळजी पर्यटकांनी घ्यावी. येथील निसर्ग माझा आहे आणि त्याच्या संवर्धनाची जबाबदारीही माझी आहे, या भावनेतून पर्यटकांनी यावे आणि निसर्गाचा आस्वाद घ्यावा.
- शहानवाज सारंग, पर्यटकदूत, माचाळ
---------
कोट २
माचाळ गावात येणाऱ्या पर्यटकांनी निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटावा. परंतु बेशिस्तपणे वागणे, घाण किंवा कचरा करून येथील निसर्ग सौंदर्याला गालबोट लावणे असे प्रकार करु नये. याबाबत ठिकठिकाणी सूचना फलक लावले आहेत. त्याचबरोबर कचरा संकलन शेडही उभारलेल्या आहेत. त्याचा वापर पर्यटकांनी करावा.
- सागर गाडे, उपसरपंच, पालू ग्रामपंचायत
----
कोट ३
माचाळ येथे येणाऱ्या पर्यटकांनी पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. तसेच तेथील ग्रामस्थांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली पाहीजे. पर्यटकांनी स्वतः जबाबदारीने वागले पाहीजे. पर्यटन स्थळाचे नावलौकिक टिकून राहावे याची काळजी घ्यावी, अन्यथा बेशिस्त पर्यटकांवर कडक कारवाई करण्यात येईल.
- निळकंठ बगळे, पोलिस निरीक्षक, लांजा पोलिस ठाणे
----
कोट ४
गतवर्षी निसर्गरम्य माचाळमध्ये आम्ही तिथल्या ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी सापड लोककला महोत्सवाचे आयोजन केले होते. दोनशे वर्षांपूर्वीचे कोकण पाहण्यासाठी माचाळ गाव सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र माचाळ गिरीस्थानाचा विकास करताना स्वतंत्र ग्रामपंचायत होणे आवश्यक आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन माचाळचा स्वतंत्र विकास आराखडा मंजूर करावा.
- सुभाष लाड, अध्यक्ष, राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई
---
कोट ५
कोरोना काळात माचाळमध्ये रस्ता तयार करण्यात आला. त्यामुळे गिरीस्थानी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई-पुण्याहून ही मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. पाऊस आणि थंडी या दोन्ही हंगामात मोठ्याप्रमाणात येथे पर्यटन चालते. याठिकाणी पर्यटक प्लास्टिकचा कचरा करतात. पर्यटकांनी माचाळमध्ये आनंद घेण्यासाठी येताना नैसर्गिक शुद्धता व सात्विकता जपावी. लांजा तालुक्याच्या अर्थकारणाला दिशा देण्याची ताकद माचाळ पर्यटन स्थळांमध्ये असून त्याचा नियोजनबद्ध विकास व्हायला हवा.
- बंटी गाडे, सामाजिक कार्यकर्ता
--------
चौकट
लांजा पर्यटन संस्थेच्या माचाळ गिरीस्थान विकासासाठी प्रमुख मागण्याः
* माथेरानच्या धर्तीवर विकासाचे प्रारूप तयार करणे
* माचाळ वस्तीला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा हवा
* स्वतंत्र रेशन धान्य दुकानाची व्यवस्था हवी
* लांजा ते माचाळ एसटी बस व्यवस्था सुरू करा
* माचाळच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑडिटोरियमची निर्मिती
* गिरीस्थान स्वागत कक्ष व लोककला केंद्र निर्मिती करा
* शासकीय विश्रामगृहाची उभारणी करा
* गाव वर्तुळाकृती तटबंदी व ऐतिहासिक संग्रहालय उभारा
* भगवान श्रीकृष्णाचे भव्य मंदिर निर्मिती
* पर्यटन व लोककला महोत्सवाला जिल्हा नियोजनमधून निधी द्या
* रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग, ट्रेकिंग आदी साहसी खेळांसाठी प्रोत्साहन द्या
* ग्राम पर्यटन म्हणून माचाळ मॉडेलची उभारणी गरजेची
* महिला बचत गट, स्थानिक खाद्य संस्कृती यांना प्रोत्साहन
* माचाळमधील मातीच्या जुन्या घरांना हेरिटेज हाऊस
* मुचकुंद ऋषी आश्रम परिसराचे सुशोभीकरण व विद्युतीकरण
* माचाळहून विशाळगडकडे जाणाऱ्या कोकण दरवाजा मार्ग येथील खिंडीत साकवाची उभारणी
* भिश्याचा कडा, कोडबन, दसमाई कडा वीराची टोपी सुशोभीकरण.
* विशाळगड-माचाळ जोडदुर्गांपैकी माचाळदूर्ग
* केळवली ते माचाळ रस्त्याचे काँक्रिटीकरण
* माचाळमधील डीपीक्षमता वाढवणे
* भोजवाडी धावडेवाडीत पाणी व्यवस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com