शाळांमध्ये कौशल्य विकासाचे शिक्षण देऊ

शाळांमध्ये कौशल्य विकासाचे शिक्षण देऊ

Published on

77273


शाळांमध्ये कौशल्य विकासाचे शिक्षण देऊ

पालकमंत्री राणे : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचा वर्धापन दिन

सकाळ वृत्तसेवा
कनेडी, ता. १३ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासह नोकरी मिळणे महत्त्वाचे आहे. यासाठी कौशल्य विकासाचे धडे प्रत्येक शाळेमध्ये दिले जातील, असे प्रतिपादन पालकमंत्री नीतेश राणे यांनी आज येथे केले. कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईच्या ७१ व्या वर्धापन दिनाच्या उद्‍घाटनप्रसंगी श्री. राणे बोलत होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा संचालक संदेश सावंत, माजी अध्यक्षा संजना सावंत, संस्थेचे सेक्रेटरी शिवाजी सावंत, संचालक डॉ. प्रदीप सावंत, खजिनदार प्रकाश सावंत आदी उपस्थित होते. श्री. राणे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये कोणतेही राजकारण खपवून घेणार नाही. कारण विद्यार्थी हा जिल्ह्याच्या विकासाचा पाया आहे. येत्या काळात नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. त्या नोकऱ्यांच्या अनुषंगाने राज्य शासन आयटीआयमध्ये विशेष कौशल्याचे उपक्रम राबवित आहे. तसेच प्रत्येक शाळेमध्ये कौशल्य विकासाचे धडे देणे ही आपली जबाबदारी आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण मिळायला पाहिजे. यासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची जबाबदारी आहे. पालकमंत्री म्हणून ती जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे कनेडी गट शिक्षण संस्थेच्या दर्जेदार सभागृहासाठी २५ लाखांचा निधीही दिला असून, या संस्थेच्या माध्यमातून सुरू झालेले शालेय शिक्षण हे निश्चित दर्जेदार आहे. या संस्थेने अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून माझी फार अपेक्षा आहे. शाळांमध्येही आता एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. आधुनिक पद्धतीचे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्याला भविष्याच्या वाटचालीकडे सक्षम बनवण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. जिल्ह्याचा विकास गतीने होत आहेत. विविध विकासकामे सुरू आहेत. कोकणासाठी सर्वांत मोठे वाडवण बंदर होत आहे. या बंदराच्या माध्यमातून ज्या नोकऱ्या उपलब्ध होतील. त्या आपल्या स्थानिकांना मिळाल्‍या पाहिजेत, असा आमचा प्रयत्न आहे. संस्थेने मागील ७१ वर्षांत जे कार्य केले तो मोठा वाटा शिक्षण क्षेत्रात आहे.
संदेश सावंत म्हणाले, ‘‘या संस्थेला खासदार नारायण राणे यांनी वेळोवेळी आर्थिक मदत केली आहे. राणेंच्या सहकार्यातूनच ही संस्था यशाकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे राणेंचा या संस्थेवर मोठा आशीर्वाद आहे. त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत.’’ दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विविध क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांनाही पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्‍यात आले. प्रसाद मसूरकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रभाकर सावंत यांनी आभार मानले.
----
कोकण विभागात शिक्षक भरती हवी!
सतीश सावंत म्हणाले, ‘‘कनेडी गट शिक्षण संस्थेने अनेक उपक्रम राबविले म्हणूनच संस्थेला जिल्ह्यात ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमात पहिला क्रमांक मिळाला. विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे धडेही देत आहोत. ग्रामीण भागातील संस्थांमध्ये अनेक समस्या आहेत. विशेष म्हणजे शिक्षक भरती ही कोकण विभागात झाली पाहिजे. यासाठी पालकमंत्री राणे यांनी प्रयत्न करावेत. संस्थांना अनुदान मिळत नाहीत. सध्या जी पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती सुरू आहे. यामुळे राज्यातून शिक्षक यात संधी घेतात. त्यामुळे परजिल्ह्यातील उमेदवाराला स्थानिक भाषेतून विद्यार्थ्यांना समजून सांगणे अवघड जाते. त्यामुळे स्थानिक उमेदवार जर शिक्षक म्हणून मिळाले तर संस्थांना फायदा होईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com