कोळोशी-हडपीड प्रशाळेमध्ये विद्यार्थ्यांची दंत चिकित्सा

कोळोशी-हडपीड प्रशाळेमध्ये विद्यार्थ्यांची दंत चिकित्सा

Published on

कोळोशी-हडपीड प्रशाळेमध्ये
विद्यार्थ्यांची दंत चिकित्सा
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. १४ः असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमाच्या वतीने शिक्षण प्रसारक मंडळ कोळोशी हडपीड, मुंबई संचलित माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी हडपीड येथे मोफत दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास चांगला प्रतिसाद लाभला.
दिविजा आश्रमामार्फत सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून पंचक्रोशीतील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत दातांची तपासणीचा हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी दंतचिकित्सक डॉ. किसन गारगोटे व डॉ. कृतेश गारगोटे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थी, कर्मचारी व ग्रामस्थांची तपासणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्यावर उपचार केले. याप्रसंगी वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक संदेश शेटे यांनी वृद्धाश्रमामार्फत परिसरातील विद्यार्थ्यांना ज्या सुविधा देणे शक्य आहे, त्या देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. डॉ. गारगोटे यांनी समाजभावनेतून ही सेवा करत असल्याचे सांगितले. शाळा समिती अध्यक्ष किशोर राणे यांनी या शिबिरास भेट देऊन वृद्धाश्रमाच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी वृद्धाश्रमाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. मुख्याध्यापिका सौ. गर्जे यांनी दिविजा वृध्दाश्रम, डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे आभार मानत वृद्धाश्रमाच्या पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या.

Marathi News Esakal
www.esakal.com