कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ठाकरे येणार

कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ठाकरे येणार

Published on

कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ठाकरे येणार
ऑगस्टमध्ये ‘कोकण परिक्रमा’ः आगामी निवडणुकीची तयारी
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १४ः लोकसभेनंतर विधानसभेला पराभवाला सामोरे जावे लागलेल्या ठाकरे शिवसेना आता शिवबंधन कोकण परिक्रमा यात्रेतून पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः ९ ऑगस्टला क्रांतीदिनी रायगड किल्ल्यावरुन या यात्रेची सुरुवात करणार आहेत. रायगड, रत्नागिरी येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे शिवसेना गट यांच्यात युती होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पराभवाने मनोधैर्य खचलेल्या ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हा दौरा कितपत ऊर्जा टाकू शकणार? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.
गेल्या वर्षभरापासून ठाकरे शिवसेनेला कोकणामध्ये उतरती कळा लागली. विधानसभा निवडणुकीनंतर अनेकजण शिवसेना शिंदे गटाकडे आणि भाजपमध्ये सामील झाले. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी हे ठळक उदाहरण आहे. ठाकरे शिवसेनेमध्ये वेगवेगळ्या पदावर पोहोचलेले अनेकजण आजही नाराज आहेत. कार्यकर्त्यांमध्ये फारसा रस नाही. विशेषतः रायगड रत्नागिरीमध्ये नाराजीचा सूर अधिक आहे. त्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये अनेक आंदोलने झाली. माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये शिवसेना टिकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळातील माजी आमदार राजन तेली, परशुराम उपरकर हे ठाकरे शिवसेनेत दाखल झाल्यानंतर या पक्षाला उभारी येईल, अशी शक्यता होती. परंतु, अद्याप तसे काही झालेले नाही. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे कार्यकर्ते आकर्षित झालेले नाहीत. किंबहुना गावागावात त्यांचे कार्यकर्ते भाजपकडे आकर्षित होताना दिसत आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी तशी आघाडीच उघडल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यामध्ये आगामी काळात ग्रामपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. ही प्रक्रिया सुरूही झाली आहे. लवकरच प्रभागनिहाय आरक्षण ही निश्चित होईल. त्यामुळे आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन दिवसापूर्वी मुंबईतील शिवसेना भवन येथे कोकणातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. माजी आमदार नाईक, श्री. उपरकर, सतीश सावंत आदी पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीमध्ये शिवबंधन कोकण परिक्रमा यात्रेचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. या माहितीनुसार उद्धव ठाकरे हे गणेश उत्सवापूर्वी कोकणाचा दौरा उरकून घेणार आहेत. कोकणातील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी रायगड ते सिंधुदुर्ग अशी ही परिक्रमा यात्रा आहे. या यात्रेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही तालुक्यामध्ये दोन टप्प्यांमध्ये जाहीर बैठकांची शक्यता आहे. काही पक्षप्रवेशही नियोजित आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडी म्हणून लढा देणार की ठाकरे शिवसेना स्वतंत्र लढणार? याबाबतही चर्चा होणार आहे.

चौकट
महायुतीचे आव्हान शिवसेना पेलणार का?
जिल्ह्याच्या इतिहासामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेसनंतर शिवसेनेने १९९२ पासून २००५ पर्यंत सत्ता कायम ठेवली. याचे कारण जेथे नारायण राणे तेथे सत्ता असे समीकरण तयार झाले. आता राजकीय गणिते बदलली असली तरी राणे कुटुंबाचा वरचष्मा कायम आहे. यावेळी शिवसेना शिंदे गट आणि भाजप या मित्र पक्षात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिक संख्याबळाची सुप्त स्पर्धा राहणार आहे. जिल्ह्यात भाजपची संघटना तुलनेत जास्त असली तरी त्यांच्याकडे एकतर शिवसेना शिंदे गटाकडे दोन आमदार आहेत. यामुळे जागा वाटपात शिंदे शिवसेनाचा आवाज बुलंद असणार आहे. या दोघांमध्ये युती झाल्यास मुख्य स्पर्धा ठाकरे शिवसेनेशी असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com