कणकवलीत रविवारी विद्यार्थी गुणगौरव
कणकवलीत रविवारी
विद्यार्थी गुणगौरव
सावंतवाडीः सिंधुदुर्ग जिल्हा कऱ्हाडे ब्राह्मण संघ सावंतवाडीतर्फे रविवारी (ता.२०) सकाळी १० वाजता (कै.) सुमित देवस्थळी सभागृह आर्या दुर्गा मंदिर वागदे (ता. कणकवली) येथे जिल्ह्यातील ज्ञातीतील माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यास कऱ्हाडे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गणेश गुर्जर उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे व वक्ते वेदमूर्ती सचिन भाटवडेकर असून ‘दैनंदिन जीवनातील अध्यात्म’ या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहे. याप्रसंगी या वर्षीपासून संघामार्फत सुरू केलेला (कै.) ललिता हळबे आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण सुद्धा होणार आहे. (कै.) ललिता हळबे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी त्रिवेणी थिटे संस्कृत शिक्षिका माणगाव हायस्कूल यांची निवड केली आहे. गुणगौरव सोहळ्यानंतर संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. या गुणगौरव सोहळ्यासाठी ज्ञातीतील बहुसंख्य लोकांनी उपस्थिती दर्शवावी. कार्यक्रमाला सहकुटुंब आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कऱ्हाडे ब्राह्मण संघ सावंतवाडीचे अध्यक्ष प्रदीप जोशी यांनी केले आहे.
--------------
पीओपी मूर्तींना
वाढती मागणी
सावंतवाडीः यंदा ऑगस्टमध्येच गणेशचतुर्थी आली असून दीड महिना शिल्लक असल्याने गणेशमूर्ती शाळाही सुरू झाल्या आहेत. मातीच्या तयार केलेल्या गणेशमूर्तींपेक्षा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना मागणी अधिक आहे. कोल्हापूर तसेच पनवेल, मुंबई आदी भागांतून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आता गणेशशाळेत दाखल होत आहेत. गणेशमूर्ती घडविणारे कलाकार सध्या शेती व बागायतीच्या कामात गुंतले आहेत. अवघ्या काही दिवसांवर गणेशचतुर्थी उत्सव आल्याने मूर्ती शाळा गजबजू लागल्या आहेत. यंदा रंग तसेच वीज दरातील वाढीमुळे गणेशमूर्तींच्या किंमतीत वाढ होणार आहे. कलाकार व शाळांना शासनामार्फत आता अनुदानही देण्याची तरतूद आहे. सध्या मूर्तिकारांची जिल्हास्तरीय संघटना स्थापन झाली असून संघटनेमार्फत गणेशमूर्ती कशा बनवायच्या, याचे प्रात्यक्षिकही मुलांना दाखविले जात आहे. जिल्ह्यात जवळपास हजारहून अधिक मूर्ती शाळा आहेत. पूर्वी माती तयार करून गणेशमूर्ती घडविल्या जात होत्या; पण आज तयार गणेशमूर्ती शाळांमध्ये पाहायला मिळत आहेत.
.................
तृणधान्य लागवडीचे
आवळेगावमध्ये धडे
कडावलः आवळेगाव येथे तालुका कृषी अधिकारी (कुडाळ) यांच्या वतीने राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत पीक पद्धतीवर प्रशिक्षण मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी भास्कर चौगले यांनी शेतकर्यांना पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व, लागवड पद्धती आणि त्यांचे फायदे याबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी नाचणी बियाणे पेरणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कृषी अधिकारी अमोल करंदीकर यांनी मृदा परीक्षणाबाबत मार्गदर्शन केले. उप कृषी अधिकारी श्री. वाडेकर यांनी शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. सहायक कृषी अधिकारी प्रिया खरवडे यांनी शेतकऱ्यांना ‘फार्मर आयडी’ काढून घेण्याबाबत मार्गदर्शन केले.
...................
वैद्यकीय अधिकारी
नियुक्तीसाठी प्रस्ताव
ओटवणेः सिंधुदुर्ग जिल्हा कारागृह येथे वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यासह सावंतवाडीतील जिल्हा कारागृहासाठी रुग्णवाहिका मिळण्याकरिता जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अभिनिक्षक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी ओरोस जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संजय मयेकर, सावंतवाडी जिल्हा कारागृहाचे अधीक्षक सतीश कांबळे व दोन्ही कारागृहाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी कारागृहाची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या. अधीक्षक मयेकर, सतीश कांबळे यांनी कारागृहाच्या व्यवस्थापनाबाबत माहिती दिली.
....................
कणकेवाडी शाळेत
रानभाजी महोत्सव
वेंगुर्लेः मठ कणकेवाडी शाळेमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्रीचा उपक्रम घेण्यात आला. या प्रदर्शनास विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. पालकांच्या मदतीने विविध रानभाज्या प्रदर्शनात मांडल्या. कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयश्री सकपाळ, नामदेव सावंत, ईशा गावड, ऋतुजा परब, श्रीमती भगत, श्रीमती सावंत आदी पालक तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते. शिक्षक रामा पोळजी यांनी सर्वांचे स्वागत व प्रस्तावना केली. मुख्याध्यापक वीरधवल परब यांनी रानभाज्यांचें आहारातील महत्त्व सांगितले. शिक्षक प्रकाश भोई व राजश्री घोरपडे यांनी मेहनत घेतली.
...................
सर्वेक्षणात सहभागाचे
नागरिकांना आवाहन
ओरोसः विकसित भारतच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार विकसित महाराष्ट्र-२०४७ साठी एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करीत आहे. नागरिकांच्या आकांक्षा प्रतिबिंबित होण्यासाठी नागरिक सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणाद्वारे नागरिकांना सहभागी होण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्र-२०४७ च्या व्हिजनला आकार देण्यासाठी शासनाकडून आमंत्रित करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात सात सोपे प्रश्न विचारले आहेत. आपण ऑप्शन्स निवडू शकता, लिहू शकता आणि आवाज रेकॉर्ड करू शकता. जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.