क्राइम

क्राइम

Published on

मोटार झाडावर
आदळून दोघे जखमी
रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा येथे मोटार झाडावर आदळून अपघात झाला. या अपघातामध्ये दोघेजण जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सुरवील रघुनाथ पुरळकर (२३) व सुरभी रघुनाथ पुरळकर (वय ४९, दोन्ही रा. पुरळ ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना रविवारी (ता. १३) रात्री दहाच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरवील हा मोटार घेऊन पनवेल ते देवगड असे जात होते. या वेळी मोटारीत सुरभी पुरळकर यांच्यासह अन्य नातेवाईकही होते. रविवारी रात्री चालकाचा मोटारीवरील ताबा सुटून ती रस्त्याच्या कडेला झाडावर आदळली. या अपघातात सुरवील व सुरभी पुरळकर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिसचौकीत नोंद करण्यात आली आहे.

रहदारीस अडथळा
करणाऱ्यांवर गुन्हा
रत्नागिरी ः शहराजवळील शिरगाव-मुस्लिम मोहल्ला येथे अरुंद रस्त्यावर दुचाकी पार्क करून वाहतूक व रहदारीस अडथळा करणाऱ्या स्वाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैजल दाऊद मुजावर (वय ४०, रा. शिरगाव- मुस्लिम मोहल्ला, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १३) सायंकाळी शिरगाव-मुस्लिम मोहल्ला येथील अरुंद रस्त्यावर निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित फैजल मुजावर यांनी दुचाकी मुस्लिम मोहल्ला येथील मुजावर किराणा दुकानासमोर पार्क केली. तेथील अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीस व रहदारीस अडथळा निर्माण झाला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल विजय आंब्रे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून नोटीस बजावली आहे.

सार्वजनिक ठिकाणी
मद्य पिणाऱ्यांवर गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील खडपेवठार खाडीकिनारी व जलतरण तलाव, साळवीस्टॉप येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्याऱ्या चार मद्यपींविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुनिर कासम भाटकर (वय ५९), रामबचन प्रल्हाद चव्हाण, सहाबुद्दीन सय्यदअली शेख (वय ३१), गौरव संतोष भुते (वय २५) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना शनिवारी (ता. १२) सायंकाळी साडेसहा ते रात्री आठच्या सुमारास खडपेवठार, साळवीस्टॉप येथे निदर्शनास आल्या. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रशांत पाटील, शरद कांबळे, उमेश पवार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संदेश चव्हाण यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून नोटीस बजावली आहे.

घसरून पडलेल्या
वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी ः साळवीस्टॉप येथील चौपदरीकरण रस्त्यातून चालत जाणारा प्रौढ पाय घसरून पडला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. काशिनाथ कल्लाप्पा जोगळेश्वर (वय ४०, रा. साळवीस्टॉप झोपडपट्टी, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १२) घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काशिनाथ जोगळेश्वर हे साळवीस्टॉप येथील रस्त्याने चालत जात असताना पाय घसरून पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या मित्राने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com