महामार्ग ठेकेदाराला नोटीस काढा

महामार्ग ठेकेदाराला नोटीस काढा

Published on

swt1431.jpg
77524
सिंधुदुर्गनगरी ः येथे खासदार नारायण राणे यांनी मुंबई-गोवा महामार्ग दुरावस्थेबाबत बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

महामार्ग ठेकेदाराला नोटीस द्यावी
नारायण राणे यांचे दुरावस्थेबाबत आदेश; सकाळच्या बातमीची दखल
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १४ ः मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात व त्यातून जाणारे बळी, जखमींची संख्या वाढत आहे. याबाबत खासदार नारायण राणे यांनी गंभीर दखल घेतली. त्या ठेकेदाराला तातडीने नोटीस काढा तसेच खड्डे भरून सुस्थितीत मार्ग करा, असे आदेश त्यांनी महामार्ग संदर्भात आयोजित बैठकीत आज दिले.
रायगड आणि रत्‍नागिरी जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था अत्‍यंत बिकट झाली आहे. त्‍याअनुषंगाने ‘सकाळ’ने ‘चाकरमान्यांचा प्रवास यंदाही खड्ड्यातून’ असे वृत्त प्रसारीत केले होते. त्‍याची गंभीर दखल घेत खासदार राणे यांनी महामार्ग सुस्थितीत ठेवण्याचे निर्देश महामार्ग अधिकाऱ्यांना दिले आहेत. महामार्ग धोकादायक झाल्‍याच्या अनुषंगाने खासदार राणे यांनी आज सिंधुदुर्गनगरी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, सार्वजनिक बांधकाम विभाग महामार्ग प्राधिकरण या विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्री. राणे म्हणाले, ‘‘यंदा पावसाळ्यापूर्वी महामार्ग निर्धोक होणे अपेक्षित होते. मात्र, मेच्या मध्यापासूनच मुसळधार पावसाला सुरवात झाली. यात मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड आणि रत्‍नागिरी जिल्ह्यातील कामे अपूर्ण राहिली आहेत. सतत पाऊस होत असल्‍याने ठिकठिकाणी भले मोठे खड्डे पडले असून वाहनांना अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. महामार्गावर पाणी साचत आहे तसेच खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. महामार्ग व त्यावरील खड्डे तातडीने कसे भरता येतील? तो कसा सुस्थितीत ठेवता येईल? याचे तातडीने नियोजन करावे. जो ठेकेदार याला जबाबदार आहे, त्याला नोटीस काढा. निकृष्ट दर्जाचे हे काम झाले असून त्याबाबत ठेकेदाराला जबाबदार धरा.’’

चौकट
नवे साकव बांधताना गुणवत्ता तपासा
जिल्ह्यातील अनेक साकव देखील नादुरूस्त झालेली आहेत. हे साकव देखील प्राधान्याने दुरूस्त करावेत जेणेकरुन नागरिक आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. साकवांबाबत नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत असे काम करा. नवीन साकव बांधत असताना त्याची गुणवत्ता तपासून ते उत्कृष्ट असतील याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश देखील श्री. राणे यांनी प्रशासनाला दिले.

चौकट
जिल्हांतर्गत रस्त्याचीही कामे पूर्ण करा
मुंबई-गोवा, तळेरे-वैभववाडी या महामार्गासह प्रमुख जिल्हा मार्गांचीही यंदाच्या पावसात दुरवस्था झाली आहे. या सर्व रस्त्यांची दुरूस्तीची कामे गणेशोत्सवापूर्वी काम मार्गी लावा. चतुर्थीत येणाऱ्या चाकरमान्यांना त्रास होऊ नये यासाठी सर्व समस्या दूर करा. चतुर्थी सणात जिल्ह्यात दाखल होणाऱ्या नागरिकांना आणि पर्यटकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचनाही श्री. राणे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com