‘लंपी’ रोगाच्या नियंत्रणासाठी प्रशासन सक्षम
77688
‘लंपी’ रोगाच्या नियंत्रणासाठी प्रशासन सक्षम
रवींद्र खेबुडकर; जिल्ह्यात अद्याप ८८ जनावरे बाधित
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १५ ः ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात २९८ जनावरांमध्ये लंपी रोगाची लक्षणे आढळली आहेत. पैकी २१० जनावरे बरी झाली असून अद्याप ८८ जनावरे बाधित आहेत, तर २ जनावरे दगावली आहेत. पशुपालकांनी न घाबरता जनावरांची काळजी घ्यावी, जिल्हा परिषद प्रशासन या आजारावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम आहे,’’ अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली.
‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये लंपी या आजाराची लक्षणे जनावरांमध्ये दिसून आली होती. त्या वेळी सुमारे ४००० जनावरे बाधित झाली होती, तर १२७ जनावरे दगावली होती. २०२३-२४ मध्ये या आजाराने शंभरहून अधिक जनावरे दगावली होती. मात्र, गतवर्षी या आजाराची लक्षणे दिसून आली नाहीत. हा आजार संसर्गजन्य असल्याने आजारी जनावरे एकत्रित ठेवल्यास अन्य जनावरांना बाधा होऊ शकते. हा आजार गायवर्गीय जनावरांमध्ये दिसून येतो. यात जनावरांची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन भूक मंदावते. जिल्ह्यात ७२ हजार ६०० जनावरे गायवर्गीय असून पैकी ६९ हजार ३१७ जनावरांना आतापर्यंत लसीकरण केले आहे. जिल्ह्यातील २४० गावांमध्ये ‘लंपी’ची जनावरांना लागण दिसून आली. त्यामध्ये २९८ जनावरे बाधित झाली. पैकी २१० जनावरे उपचारांनंतर बरी झाली असून अद्यापही ८८ जनावरे उपचारांखाली आहेत, तर दोन जनावरे (वासरे) दगावली आहेत,’’ असे खेबुडकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुधाकर ठाकूर उपस्थित होते.
----------
कोट
मालवण तालुक्यातील दोन गावांना व्यक्तिशः भेट दिली असून सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले आणि मालवण या तालुक्यांमध्ये लंपी आजाराची लागण अधिक प्रमाणात आहे. जिल्हा परिषद प्रशासन आणि पशुसंवर्धन विभाग या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. पशुपालकांनी जनावरांमध्ये लंपीची लक्षणे दिसताच तत्काळ पशुदवाखान्याशी संपर्क साधावा.
- रवींद्र खेबुडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
...................
‘पशुदवाखान्यांतील रिक्त पदे भरणार’
‘‘जिल्ह्यात १०२ पशुदवाखाने असून त्यातील विविध पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी शासनाची जाहिरात निघाली आहे. राज्यात २८०० पदे भरण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील १०२ दवाखान्यांमध्ये १ पदवीधर, १ पदविकाधारक आणि १ शिपाई असे तीन कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जनावरांची चांगल्या प्रकारे काळजी घेणे शक्य होणार आहे. जिल्ह्यातील पशुपालकांनी जनावरांची काळजी घ्यावी. आवश्यक असल्यास जनावरांचे लसीकरण करावे,’’ असे आवाहन खेबुडकर यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.