-नमन लोककलेतील कलाकार हेच खरे सुपरस्टार

-नमन लोककलेतील कलाकार हेच खरे सुपरस्टार

Published on

नमन कलेतील कलाकार खरे ‘सुपरस्टार’
जितेंद्र महाडिक ः सम्राट पुरस्काराने लोककलावंतांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १५ ः कोकणातील नमन लोककला जपणारे कलाकार दिवसा काम आणि रात्री नमनकलेतून लोकांचे मनोरंजन करत असतात. रात्री रंगमंचावरती असणारा वगनाट्यातील राजा हा दिवसा शेतात घाम गाळत असतो. त्यांना या कलेतून कोणतेही व्यावसायिक उत्पन्न मिळत नाही; पण एक मानसिक समाधान मिळत असते म्हणूनच नमन लोककला जपणारे कलाकार हेच खरे ''सुपरस्टार'' असल्याचे मनसेचे उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी लोककलावंत यांच्याप्रती आदराचे मत व्यक्त केले.
चिपळूण येथील माटे सभागृहामध्ये शाहीर जितेंद्र महाडिक निर्मित शिवशंभो नमन मंडळ संगमेश्वर या नमन मंडळाच्यावतीने काही लोककलावंतांचा ''नमन लोककला सम्राट'' पुरस्काराने गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात जितेंद्र चव्हाण बोलत होते. या कार्यक्रमाला श्रीपाद शिंदे, उमेश महाडिक, बाबाजी कदम, टोपरे, मोरे, भिकाजी चोगले, पत्रकार भाई कुळे, गोपाळ करंडे आणि इतर मान्यवर मंडळीसुद्धा उपस्थित होती. या वेळी ते म्हणाले, शाहीर महाडिक यांनी अतिशय मेहनत घेत बारा गावातले बारा कलाकार एकत्र करून शिवशंभू नमन मंडळाची स्थापना केली आहे. त्यांनी गेल्या दोन वर्षात ५९ कार्यक्रम केले आहेत. अतिशय संघटनात्मक काम करत त्यांनी आपल्या नमन मंडळाची वाटचाल केली आहे. याच नमन मंडळातून अनेक लोककलावंत भूमिका साकारत आहेत. खऱ्या अर्थाने या लोककला जपणे आणि त्यातून प्रबोधन करणे, हा मूळ या लोककलांचा हेतू आहे. हा हेतू सार्थक करण्यासाठी अशी ध्येयाने झपाटलेली मंडळी दिवसा काम आणि रात्री नमन मंडळाचे कार्यक्रम करत असतात. अशा नमन मंडळांना कोणतीही अडचण आली तर आपण नेहमी त्यांच्या पाठीशी असू, असे सुद्धा त्यांनी आश्वासन दिले. लोककला जपणारा कलावंत हा रसिकांचे मनोरंजन करून या कलेतून प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत असतो. दिवसा काबाडकष्ट करायचे आणि रात्री कार्यक्रमाला जायचे, पुन्हा सकाळी उठून रोजचा कामधंदा करायचा, अशी त्यांची दिनचर्या सुरू असते म्हणूनच खऱ्या अर्थाने रात्री रंगमंचावरती वावरणारे कलाकार हे दिवसा उन्हातान्हात घाम गाळत असतात. त्यामुळेच आमच्यासाठी खरे सुपरस्टार हे आमचे नमनातील कलाकार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक संजय कांबळे यांनी तर सूत्रसंचालन शाहीर शाहीद खेरडकर यांनी केले. आभार महाडिक यांनी मानले.

चौकट
यांचा केला गौरव
लोककलावंतांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यात शिवशंभो नमन मंडळातील कलावंतांचा समावेश आहे. तीन कलावंतांचा नमन लोककला सम्राट पुरस्कार देऊन गौरव केला. त्यामध्ये गेली अनेक वर्षे मृदुंगवादन करणारे सीताराम करंडे व सुभाष चोगले यांना सम्राट पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. गुहागर तालुक्यातील काळसूर कौंढर येथील विनेश तांबे यांना नमन लोककला सम्राट हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com