-गेमिंगच्या पलीकडे जीपीयूचे महत्व : डिजिटल युगाचा खंबीर पाया

-गेमिंगच्या पलीकडे जीपीयूचे महत्व : डिजिटल युगाचा खंबीर पाया

Published on

टेक्नो..........लोगो
(२ जुलै टुडे ३)
गेमिंगच्या पलीकडे जीपीयूचे महत्व:
डिजिटल युगाचा खंबीर पाया

जीपीयू हे नाव घेताच बहुतेक लोकांच्या डोळ्यासमोर गेमिंग आणि आकर्षक ग्राफिक्स येतात. खरंतर, ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट म्हणजे जीपीयू. सुरुवातीला संगणकाच्या स्क्रीनवर जास्तीत जास्त परिणामकारक आणि जलद ग्राफिक्स सादर करण्यासाठी तयार करण्यात आले; मात्र आज जीपीयू केवळ गेमिंगपुरता मर्यादित राहिलेला नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता, वैज्ञानिक संशोधन, वैद्यकीय विश्लेषण, ऑटोमेशन, डाटा सायन्स आणि अगदी मोबाईल अ‍ॅप्सपर्यंत जीपीयू हे तंत्रज्ञानाचे शक्तीकेंद्र बनले आहे.
-rat१५p२७.jpg-
25N77654
-प्रा. स. द. लाटकर,
घरडा अभियांत्रिकी महाविद्यालय
------
*जीपीयू म्हणजे काय?
जीपीयू हे एक विशेष प्रकारचे प्रोसेसिंग युनिट आहे जे एकाचवेळी अनेक समांतर कामे करण्यासाठी डिझाइन केलेले असते. पारंपरिक सीपीयूमध्ये (सेंट्रल प्रोसेसिंग युनिट) मोजके कोअर असतात, जे सीमित प्रमाणातच मल्टीटास्किंग करू शकतात. त्याच्या तुलनेत जीपीयूमध्ये शेकडो ते हजारो लहान कोअर असतात, जे एकत्रितपणे समान प्रकारची कामे अत्यंत वेगाने पार पाडतात. जीपीयूची ही रचना समांतर प्रक्रिया (parallel processing) क्षमतेवर आधारित असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर डाटा प्रक्रिया जसे की, प्रतिमा रेंडरिंग, व्हिडिओ प्रोसेसिंग, हवामान अंदाज, वैज्ञानिक सिम्युलेशन्स आणि एआयचे प्रशिक्षण अधिक जलद व कार्यक्षमतेने करता येते. त्यामुळे जीपीयू आधुनिक संगणकीय तंत्रज्ञानाचा एक अत्यावश्यक भाग बनला आहे.
दैनंदिन जीवनातील जीपीयू तुम्ही जरी गेम खेळत नसला तरीही तुमच्या स्मार्टफोन, संगणक किंवा स्मार्टटीव्हीमध्ये जीपीयू कार्यरत असतो. जेव्हा तुम्ही एचडी व्हिडिओ ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता, डिजिटल मॅपचा वापर करता किंवा व्हिडिओ कॉलदरम्यान पार्श्वभूमी अस्पष्ट करता तेव्हा ही सगळी प्रक्रिया सुरळीत आणि वेगवान होण्यासाठी जीपीयू महत्त्वाची भूमिका बजावतो. आधुनिक अ‍ॅप्लिकेशन्स जीपीयूच्या सहाय्याने अधिक कार्यक्षम बनतात. स्मार्टफोनमधील चेहऱ्याची ओळख, पोर्ट्रेट फोटो मोड तसेच अ‍ॅप्सची गती सुधारणे या सगळ्यामागे जीपीयूचीच भूमिका असते तसेच, गाड्यांमधील स्वयंचलित ब्रेकिंग प्रणाली, मार्गदर्शन प्रणाली आणि आधुनिक डॅशबोर्ड हे सुद्धा जीपीयूच्या मदतीने चालतात.

*जीपीयू आणि कृत्रिम बुद्धिमत्ता
एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता)च्या प्रशिक्षण आणि कार्यक्षमतेसाठी जीपीयू अत्यंत उपयुक्त ठरतो कारण, त्याच्या समांतर प्रक्रिया क्षमतेमुळे मोठ्या प्रमाणातील डाटा जलदवेगाने प्रक्रिया करता येतो. जरी सीपीयू किंवा टीपीयूसारखी पर्यायी साधने वापरली जात असली तरी जीपीयू हे आज एआय क्षेत्रातील सर्वाधिक प्रभावी साधन मानले जाते. एखाद्या एआय मॉडेलला प्रशिक्षण देण्यासाठी लाखो डाटा पॉइंट्स आणि कोट्यवधी गणनांची आवश्यकता असते. जीपीयू हे काम जलदगतीने आणि अचूकतेने पार पाडतो. त्यामुळे एआय क्षेत्रातील सर्वात मोठा पाया जीपीयू आहे.

*औद्योगिक क्षेत्रात जीपीयूचे योगदान
जीपीयूचा उपयोग केवळ वैयक्तीक संगणकापुरता मर्यादित नसून, उद्योगधंद्यांमध्येही त्याचा वापर झपाट्याने वाढतो आहे. उत्पादनक्षेत्रात रोबोटिक आर्म्सना नियंत्रण देणे, औद्योगिक निरीक्षणासाठी मशिन व्हिजन प्रणाली विकसित करणे तसेच गुणवत्ता नियंत्रणासाठी प्रतिमा विश्लेषण करणे. या सर्व कामांमध्ये जीपीयू आवश्यक ठरतो. बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात जीपीयूचा वापर फसवणूक ओळखण्यासाठी रिअल टाइम अल्गोरिदम चालवण्यात होतो. वाढत्या स्मार्ट सिटी प्रकल्पांमध्ये जीपीयू वापरून वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षाप्रणाली, ऊर्जा वितरण यांचे विश्लेषण आणि नियंत्रण शक्य होते. जीपीयू आधारित प्रणाली अत्यंत जलद निर्णय घेऊ शकतात त्यामुळे वेळ व संसाधनांची बचत होते.
भविष्यकाळातील शक्यता जीपीयू तंत्रज्ञानाचा विकास अजून थांबलेला नाही. भविष्यात क्वांटम संगणक प्रणालींसोबत जीपीयूची भागीदारी होऊ शकते तसेच, वैद्यकीय संशोधनात जीपीयू वापरून नव्या औषधांचा शोध, रोगनिदान प्रणाली आणि वैयक्तीक उपचारयोजना विकसित करता येणार आहेत. हवामान बदलाचा अभ्यास, अंतराळ संशोधन आणि अगदी कृषी तंत्रज्ञानातही जीपीयू केंद्रस्थानी येत आहे.

*निष्कर्ष
पूर्वी केवळ ग्राफिक्ससाठी वापरला जाणारा जीपीयू आज प्रत्येक डिजिटल क्षेत्रात आवश्यक झाला आहे. एआय, वैज्ञानिक संशोधन, आरोग्यसेवा, उद्योग आणि शिक्षण सगळीकडे जीपीयूचा वापर झपाट्याने वाढतो आहे. भविष्यात जीपीयू हे आधुनिक जगाचे अनिवार्य अंग ठरणार आहे, हे निश्चित.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com