''कुडाळातून सायंकाळी सरंबळ बस सुरू करा''

''कुडाळातून सायंकाळी सरंबळ बस सुरू करा''

Published on

''कुडाळातून सायंकाळी
सरंबळ बस सुरू करा''
कुडाळः सरंबळ इंग्लिश स्कूलच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळा सुटल्यानंतर लगेचच सायंकाळी ५.३० वाजता सरंबळ येथून कुडाळला येण्यासाठी सुटणारी बस फेरी सुरू करावी, अशी मागणी सरंबळ शाळेतील सर्व शिक्षक व ग्रामस्थांनी कुडाळ आगारप्रमुख रोहित नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद केले आहे की, सरंबळ इंग्लिश स्कूलची वेळ सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत आहे; मात्र शाळा सुटल्यानंतर सायंकाळी सातपर्यंत सरंबळ येथून कुडाळला येणारी एकही बस उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. या अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, सुरक्षेची चिंता आणि वेळेचा अपव्यय वाढत आहे. विशेषतः कुडाळ व आजूबाजूच्या गावांमधून सरंबळ येथे शिक्षणासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ही बससेवा अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या गैरसोयीचा विचार करून मुख्याध्यापक अनिल होळकर, संस्थेचे सरचिटणीस राजेंद्र परब, शाखा अध्यक्ष जयप्रकाश गावडे, चिटणीस प्रसाद साटम, नंदू परब तसेच शाळेतील सर्व शिक्षक व ग्रामस्थांच्या पुढाकाराने तसेच सरंबळ ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आगारप्रमुखांना निवेदन देण्यात आले.
.....................
सिमेंट पाईपमुळे
रस्ता धोकादायक
कुडाळ ः पणदूर-घोटगे मार्गावर क़डावल पोस्ट कार्यालयानजीक पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहत असल्याने या पाण्याचा निचरा होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्ता खोदून सिमेंट पाईप बसविले आहेत; परंतु हे पाईप रस्ता पातळीपेक्षा सहा इंचावर बसविले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी आतापर्यंत दुचाकींचे अपघात होऊन पाच- सहाजण जखमी झाले आहेत. बांधकाम विभागाच्या या कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. त्वरित उपाययोजना करून मार्ग सुस्थितीत करावा, अशी मागणी केली जात आहे. या रस्त्यावर पावसाचे पाणी साचत होते. त्या पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्ता खोदून सिमेंट पाईप बसविण्यात आले. खोदाई कमी झाल्यामुळे पाईप रस्ता पातळीपेक्षा वर आले आहेत. त्यामुळे तेथे गतिरोधकाचे स्वरुप आले आहे. वाहनचालकांना या उंच झालेल्या भागाचा अंदाज येत नाही. त्यामुळे मोटार, दुचाकी, रिक्षा आदी वाहनांना हादरा बसतो. दुचाकीस्वारांचा दुचाकीवरील ताबा सुटून वारंवार अपघात होत आहेत. बांधकाम विभागाने हे पाईप बाहेर काढून पुन्हा खोदाई करून बसवावेत, अशी ग्रामस्थ व वाहनधारकांची मागणी आहे.
.......................
नामदेव महाराज समाधी
सोहळा २२ रोजी
कणकवलीः शिंपी समाज एक्यवर्धक संघाच्या वतीने मंगळवारी (ता. २२) श्री संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळा आयोजित केला आहे. या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष सुहास वरुणकर यांच्या कणकवली येथील घरी श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी १०.३० वाजता श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, ११.३० वाजता ज्ञाती भगिनींचा भजनाचा कार्यक्रम, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४.३० वाजता ज्ञाती भगिनींचा सांस्कृतिक कार्यक्रम, ७ वाजता गुणगौरव, बक्षीस वितरण व सत्कार समारंभ, रात्री ८ वाजता कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.
...........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com