कृत्रिम वाळू धोरण कागदावरच

कृत्रिम वाळू धोरण कागदावरच

Published on

कृत्रिम वाळू धोरण अद्याप कागदावरच
अनेक त्रुटी ; नद्यांचे जतन अन् माफिराज उखडून टाकण्याचे प्रशासनासमोर आव्हान
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १५ : राज्यातील नैसर्गिक वाळूच्या वारेमाप उत्खननामुळे नद्यांचा जीव घोटला जात आहे तसेच, या वाळूमधून माफियाराज उभे ठाकले. त्यामुळे नद्यांचे जतन आणि माफियाराज मुळापासून उखडून टाकण्यासाठी शासनाने कृत्रिम वाळू धोरण अवलंबले आहे. या धोरणांतर्गत सर्व प्रकारच्या बांधकामामध्ये कृत्रिम वाळूचा वापर वाढवताना पुढील तीन वर्षांत नैसर्गिक वाळूचा वापर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवले; परंतु, या नवीन धोरणात अनेक त्रुटी असल्याने ते लागू करताना गौणखनिज विभागाच्या नाकीनऊ आले आहे. परिणामी, दीड महिन्यापासून हे धोरण कागदावरच रखडले आहे. नदी व खाड्यातील वाळूगटाचे लिलाव झालेले नाही. कृत्रिम वाळूधोरणही अजून अंमलात आलेले नाही. त्यामुळे नद्यांचे जतन आणि माफियाराज मुळापासून उखडून टाकण्याचे आव्हान सरकारसमोर आहे.
कृत्रिम वाळूधोरणात अडीच ते पाच एकरचे क्षेत्र क्रशरचालकांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उपलब्ध करून दिले जाईल. या जागेत क्रशरचालकांना खोदाईतून मिळालेल्या दगडापासून वाळू तयार करायची आहे. ठराविक खोदाईनंतर ती जागा जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करून नवीन जागेसाठी अर्ज करणे बंधनकारक असणार आहे तसेच, कृत्रिम वाळूच्या रॉयल्टीत सवलत देण्यासंदर्भात सरकार सकारात्मक भूमिकेत आहे; मात्र धोरणात अनेक बाबींची सुस्पष्टता नसल्याने त्याचा प्रारंभ कोठून करायचा या विवंचनेत अधिकारी सापडले आहेत.
-----------
चौकट
जिल्ह्यात ५० क्रशरला परवानगी
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ५० क्रशरचालकांना परवानगी दिली जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री बावनकुळे यांनी केली होती. रत्नागिरी जिल्ह्यात किती क्रशरला परवानगी मिळेल, हे स्पष्ट नाही. कृत्रिम वाळूच्या एका क्रशरसाठी दीड कोटींचा खर्च अपेक्षित असून, त्यात सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असेही आश्‍वासन बावनकुळे यांनी दिले आहे; परंतु सरकारी मदत अनुदान स्वरूपात मिळणार आहे का? हे स्पष्ट नाही.

चौकट
कृत्रिम वाळूचे धोरण राबवताना
डोंगरांच्या खोदाईला प्रतिबंध करणे गरजेचे असणार आहे. सध्याच्या क्रशरचालकांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. यंत्रणा उभी करण्यासाठी क्रशरचालकांना मदत करावी लागणार आहे. विशिष्ट खोदाईनंतर त्या जागेत तलाव विकसित करण्यात येणार आहे.

कोट
कृत्रिम वाळूचे धोरण प्राप्त झाल्यानंतर ते सर्व तहसीलदार यांना अंमलबजावणी करण्यासाठी पाठवण्यात आले; मात्र या धोरणात काही प्रश्न आहेत. त्या संदर्भात वरिष्ठ पातळीवरून अजून आम्हाला स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे पुढे काही सूचना केलेल्या नाहीत.
- अभिजित शेट्ये, मंडळ अधिकारी खनिकर्म विभाग, रत्नागिरी
-----------
कोट
कृत्रिम वाळूधोरण राबवण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क करा, असे व्यावसायिकांना सांगितले आहे. आमच्याकडे व्यावसायिक चौकशी करत आहेत. कुणीही अर्ज केलेला नाही. जे येतील त्यांना आम्ही सहकार्य आणि मार्गदर्शन करू.
- प्रवीण लोकरे, तहसीलदार, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com