चिपळूण-पालकमंत्र्यांनी झाकल्या, शेखर निकमानी उघड केल्या
पालकमंत्र्यांनी झाकल्या, शेखर निकमांनी उघड केल्या
मुंबई- गोवा महामार्गाच्या समस्या; परस्पर विधाने ठरली चर्चेचा विषय
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १६ ः जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम ९३.१८ टक्के पूर्ण झाल्याचा दावा करत महामार्गावरील प्रश्न झाकण्याचा प्रयत्न केला. मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी महामार्गाच्या दर्जाहीन कामाबाबत पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून पालकमंत्र्यांनी झाकलेल्या समस्या उघड केल्या. महायुती सरकारमधील दोन लोकप्रतिनिधींची परस्पर विधाने सध्या चर्चेचा विषय ठरली आहेत.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम मागील सोळा वर्षापासून रखडले आहे. महामार्गाचे काम पूर्ण होत आले असले तरी रस्त्याला तडे जाणे, संरक्षक भिंती कोसळणे, भराव टाकून तयार केलेला रस्ता खचणे, उड्डाणपूल खचणे अशा नव्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी महामार्गाची पाहणी करून हे काम लवकरात लवकर पूर्ण कसे होईल यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. संगमेश्वरमध्ये महामार्गाच्या कामातील अडथळ्यांवर पर्याय सुचवले. त्यानंतर पत्रकारांना माहिती देताना त्यांनी या महामार्गाचे काम 93.18 टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला. डिसेंबरअखेर पूर्ण होईल. मात्र अधिवेशन सुरू झाल्यानंतर सरकारमधील आमदार शेखर निकम यांनी महामार्गावरून लक्षवेधी मांडत आमचा हा महामार्गच पूर्ण ब्लॅक स्पॉट आहे, असे बेधडक विधान करून नाराजी व्यक्त केली. इतकंच नाही तर यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत आमदारांची बैठक घ्यावी, अशी मागणीही निकम यांनी केली.
यावर उत्तर देताना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सकारात्मकता दर्शवत, या मुद्द्यावर सर्व आमदारांसोबत एकत्र बैठक घेतली जाईल याचे पत्र गडकरी यांनाही दिले जाईल असे सांगितले आहे. आमदार यांनी महामार्गाच्या रखडलेल्या कामांबाबत लोकांची अस्वस्थता, जीवितधोके आणि वाहतुकीतील अडथळे यावर अधिवेशनात मुद्दा उपस्थित करून पालकमंत्र्यांनी झाकलेले विषय पुन्हा उघडण्याचा प्रयत्न केला.
----------
कोट
पालकमंत्री राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून काम करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्याबद्दल दुमत नाही. पण अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडून सरकारचे लक्ष वेधून घेणे गरजेचे होते. मी हा प्रश्न मांडल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर बैठक झाली तर राहिलेले प्रश्न लवकर मार्गी लागतील.
- शेखर निकम, आमदार
---------------
कोट
आमदार शेखर निकम यांनी शहरातील नाल्यावरील अतिक्रमण, महामार्ग रुंदीकरणामुळे विस्थापित होणारी चिपळूण शहराची पाणी पुरवठा योजना, भूमिगत वीज वाहिन्या व सीएनजी गॅस पाईपलाईन कामाच्या चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या कामांची चौकशी लावावी. ही कामे चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे भविष्यात कुणाचा तरी बळी नक्की जाईल.
--नित्यानंद भागवत, विभागप्रमुख, शिवसेना चिपळूण
........... खान........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.