हा तर एका समर्पित जीवनाचा अंत
77925
हा तर एका समर्पित जीवनाचा अंत
दीपक केसरकर ; विकास सावंत यांना आदरांजली
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ ः महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री (कै.) भाईसाहेब सावंत यांचे सुपुत्र विकासभाई सावंत यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. शिखर बँकेचे उपाध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक तसेच जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून त्यांनी मोठे कार्य केले होते. विशेषतः भाईसाहेबांचा शिक्षणाचा वारसा त्यांनी समर्थपणे सांभाळला. आपल्या सर्व शैक्षणिक संस्थांना त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. शाळा हाच त्यांचा ध्यास होता. त्यामुळे विकासभाईंच्या निधनाने ‘एका समर्पित जीवनाचा’ अंत झाल्याची भावना माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.
येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केसरकर यांनी सावंत कुटुंबाशी असलेल्या त्यांच्या निकटच्या व कौटुंबिक संबंधांना उजाळा दिला आणि विकासभाईंच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई आदी उपस्थित होते.
आमदार केसकर म्हणाले, ‘‘(कै.) भाईसाहेब सावंत आणि विकासभाई सावंत यांच्याशी निकटचे व कौटुंबिक संबंध होते. त्यांनी कधीही मंत्र्यांचा मुलगा असल्याचा बडेजाव केला नाही. ते एक साधे आणि समर्पित जीवन जगले. मात्र, अवेळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या कार्याची या जिल्ह्याला गरज होती. कोकणात पुढील काळात जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी काही परदेशी कंपन्यांबरोबरही बोलणी सुरू आहेत. माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांचे या जिल्ह्यावर पूर्ण लक्ष आहे, पालकमंत्री नीतेश राणे हे जिल्ह्याच्या विकासासाठी अहोरात्र झटत आहेत आणि आमदार नीलेश राणे यांचेही वेळोवेळी सहकार्य लाभत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे कोकणावर विशेष प्रेम असल्याने भविष्यकाळात कोकण एका वेगळ्या दिशेने वाटचाल करेल.’’ दरम्यान, पुढील काळात गावागावांत जाऊन जनतेसाठी वेळ देणार असल्याचे आणि सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले या तिन्ही तालुक्यांमध्ये एका शासकीय कार्यालयात बसून जनतेची भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. माझे पुढील सर्व जीवन हे जनतेसाठी समर्पित आहे, असेही ते म्हणाले.
-----------------
‘समृद्धी’चा ‘शक्तिपीठ’ करण्याचा प्रयत्न करू
‘शक्तिपीठ’बाबत कोल्हापूरचे प्रश्न वेगळे आहेत. तेथील शेतकऱ्यांना जमिनीचे भाव वाढवून हवे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या भागात शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते, तो भाग वगळून आता नव्या जागेतून हा महामार्ग नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा महामार्ग रेडी बंदराला जोडला जावा आणि मुंबई-गोवा महामार्गालाही जोडावा, यासाठी प्रयत्नशील असून, त्यादृष्टीने नवीन सर्व्हे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान न होता ‘समृद्धी’चा हा ‘शक्तिपीठ’ महामार्ग होण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन श्री. केसरकर यांनी यावेळी दिले.
----------------
वाढदिनीचे सर्व कार्यक्रम रद्द
विकास सावंत यांच्या निधनाने माझ्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघातील जनतेने आयोजित केलेले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. या दुःखदप्रसंगी मी त्यांच्या सदिच्छांचा स्वीकार करू शकत नाही. मतदारसंघातील जनतेचे माझ्यावर निश्चितच भरपूर प्रेम आहे, त्यामुळे त्यांच्या सदिच्छा नेहमीच माझ्या पाठीशी आहेत आणि म्हणूनच तब्बल चारवेळा त्यांनी आतापर्यंत आमदार म्हणून निवडून दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.