दापोली -हर्णैमध्ये पावसाळ्यातील अवैध मासेमारीने संताप

दापोली -हर्णैमध्ये पावसाळ्यातील अवैध मासेमारीने संताप

Published on

rat16p19.jpg
77912
दापोलीः पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने स्थानिक मच्छीमार मासेमारीसाठी जाऊ शकत नसल्याने त्याचा फायदा परप्रांतीय मच्छीमार उठवतात.
-----------------
हर्णैमध्ये अवैध मासेमारीने स्थानिकांचा संताप
कारवाईसाठी केवळ एकच गस्ती बोट; परप्रांतीय ट्रॉलर, फास्टर नौंकाकडून मासेमारी
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १६ ः कोकण किनारपट्टीवर मान्सून दरम्यान मासेमारीस शासनाने बंदी घातली असली तरी, समुद्रात जोरदार उधाण आणि वादळी परिस्थितीचा गैरफायदा घेत परप्रांतीय ट्रॉलर आणि मलपीच्या फास्टर नौका सर्रास मासेमारी करताना दिसत आहेत. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांमध्ये प्रचंड संताप आहे. दापोली तालुक्यातील हर्णै बंदरासमोर सध्या दिवसेंदिवस या अवैध मासेमारीची समस्या गंभीर होत चालली असून शासनाने त्वरित हस्तक्षेप न केल्यास स्थानिक मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, असा इशाराही मच्छीमारांकडून देण्यात आला आहे.
दापोली तालुक्यातील हर्णै हे कोकणातील एक प्रमुख मासेमारी बंदर असून, या ठिकाणी ९०० ते १००० स्थानिक नौकांमार्फत पारंपरिक पद्धतीने मासेमारी होते. मात्र याच किनाऱ्याच्या अगदी ४-५ नॉटिकल मैल अंतरावर परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर मासेमारी करत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहे. यामुळे स्थानिक मच्छीमारांचा हक्काचा हिस्सा परप्रांतीयांच्या हाती जात असून त्याचा थेट परिणाम येथील मच्छीमारांच्या रोजीरोटीवर होत आहे.
स्थानिक मच्छीमारांनी यापूर्वीही अनेकदा जिल्हा प्रशासन, मत्स्यव्यवसाय विभाग तसेच शासनाकडे निवेदने सादर केली आहेत. परंतु अद्याप शासनाकडून ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. रत्नागिरी जिल्ह्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाकडे सध्या केवळ एकच फायबरची गस्ती नौका असून ती जयगड खाडीत तैनात आहे. पावसाळ्यात समुद्रात प्रचंड उधाण असते. वातावरण ढगाळ व वादळी असल्याने फायबर नौकेला समुद्रात पाठवणे कठीण ठरते. त्यामुळे कारवाई करणे अशक्य होते.
दोन दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील करंजा, कोरलाई येथील हायस्पीड ट्रॉलर हर्णे किनाऱ्यालगत सतत दोन दिवस मासेमारी करत असल्याचे स्थानिक मच्छीमारांनी निदर्शनास आणले. करंजा-कोरलाई ट्रॉलरांचा सुळसुळाट झाला होता. किमान १५ ते २० नौका हर्णै बंदरासमोरील समुद्रात मासेमारी करत होत्या. यावेळी पापलेट, सुरमई यांसारखी महागडी मासळी मोठ्या प्रमाणात मारून नेल्याचा अंदाज मच्छीमारांकडून व्यक्त करण्यात आला. यावेळी मच्छीमारांनी मत्स्यव्यवसाय विभागाशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, यंत्रणा कमकुवत असल्याने कोणतीही कारवाई होऊ शकली नाही.

चौकट
किमान दोन सुसज्ज नौका हव्यात
दापोलीसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील १९७ किमीच्या समुद्रकिनाऱ्यावर अवैध मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकच फायबरची नौका अपुरी ठरत आहे. म्हणूनच मच्छीमारांनी सरकारकडे किमान दोन सुसज्ज लोखंडी गस्ती नौका तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या नौका हवामान कितीही वाईट असले तरी समुद्रात सहजतेने जाऊन कारवाई करू शकतील. अन्यथा स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर गदा येणार असून कोकण किनाऱ्यावर मच्छीमारांचे प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

चौकट
मच्छीमारांचा आंदोलनाचा इशारा
आता शासनाकडून ठोस निर्णय अपेक्षित आहे. कोकणातील मासेमारीवर परिणाम करणाऱ्या या प्रकाराला आळा घालण्यासाठी, तसेच स्थानिक मच्छीमारांचा हक्क राखण्यासाठी शासनाने तत्काळ हस्तक्षेप करावा, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा येथील मच्छीमार संघटना आंदोलन तर करतीलच, परंतु वेळ पडली तर कायदा देखील हातात घेतील, असा इशारा मच्छीमारांनी दिला आहे.

कोट
दोन दिवसांपूर्वी त्या नौकांवर आम्ही कारवाई करण्यासाठी निघण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु फायबर स्पीड बोट आणि वातावरण वादळसदृश्य असल्याने चालकाकडूनच नौका पाण्यात नेण्यासाठी नकार आला. कारवाईसाठी आणि गस्तीसाठी जिल्ह्याला ही एकच स्पीड नौका आहे. ती अपुरी आणि कमकुवत पडते. या अवैध नौका लोखंडाच्या असतात, त्यामुळे याठिकाणी लोखंडाचीच स्पीडबोट आवश्यक आहे. कारण त्या लोखंडच्या नौकांनी या फायबर बोटीला एकजरी धक्का दिला तरी ही बोट बुडू शकते. मत्स्य व्यवसाय खात्याकडील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तशा बोटींचा प्रस्ताव पाठविला आहे.
- दीप्ती साळवी, मत्स्य व्यवसाय अधिकारी, दापोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com