काँग्रेस नेते सावंतांना अखेरचा निरोप
77963
काँग्रेस नेते सावंतांना अखेरचा निरोप
माजगावात अंत्यसंस्कार; विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून आदरांजली
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ ः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, शिक्षणमहर्षी विकासभाई सावंत यांना आज विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला. माजगाव येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. ते कायमच त्यांच्या कार्यामुळे आणि स्मृतींमुळे लोकांच्या मनात जिवंत राहतील. त्यांच्या निधनाने एका कर्तृत्ववान नेत्याला गमावल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.
विकासभाई सावंत यांचे मंगळवारी (ता.१५) निधन झाले. आज सकाळी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी शहरातील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात ठेवले होते. अंतिम दर्शनासाठी राजकीय, सामाजिक, सहकार तसेच शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे सहकारी, मित्र, कुटुंबीय, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख आणि विकासभाईंच्या आठवणी स्पष्ट दिसत होत्या. उपस्थितांनी त्यांच्या प्रतिमेला तसेच पार्थिवाला पुष्प अर्पण करीत श्रद्धांजली वाहिली. यावेळी सहकाऱ्यांनी विकासभाईंच्या कार्याची आठवण करून दिली. त्यांच्या साधेपणा, समाजासाठीचे त्यांचे योगदान आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी त्यांनी घेतलेली भूमिका या आठवणींना उजाळा दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार राजू शेट्टी यांनी शोक व्यक्त केला.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, माजी नगराध्यक्ष तथा (कै.) भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, जीवनरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक राजू मसुरकर, शिवसेना विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, भाजपचे शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, मराठा समाज जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे, काँग्रेसचे पदाधिकारी रवींद्र ऊर्फ बाब्या म्हापसेकर आदींनी आदरांजली वाहिली. दुपारी १२ वाजता त्यांचे पार्थिव माजगाव येथील त्यांच्या निवासस्थानी नेले. तिथून अंत्ययात्रा सुरू झाली. फुलांनी सजवलेल्या वाहनातून त्यांची अंतिम यात्रा स्मशानभूमीकडे निघाली. त्यांचा मुलगा विक्रांत सावंत यांनी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. यावेळी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, जिल्हा बँक संचालक नीता राणे आदींनी त्यांना आदरांजली वाहिली.
-----
पालकमंत्र्यांकडूनही शोक व्यक्त
पालकमंत्री नीतेश राणे यांनीही विकासभाई यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. दूरदृष्टी असलेला अभ्यासू नेता हरपला अशा शब्दांत त्यांनी शोक व्यक्त केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महिलाध्यक्ष अर्चना घारे-परब यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.