तुळस-पलतडमध्ये दरडींचा घरांना धोका

तुळस-पलतडमध्ये दरडींचा घरांना धोका

Published on

swt1622.jpg
77964
तुळस-पलतडः येशीवाडी येथील ग्रामस्थांच्या घराला लागून असलेली धोकादायक दरड.
swt1623.jpg
77965
सिंधुदुर्गनगरी ः येथे तुळस-पलतड (येशीवाडी) येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री नितेश राणेंना निवेदन सादर केले.

तुळस - पलतडमध्ये दरडींचा घरांना धोका
संरक्षक भिंतीची मागणीः पालकमंत्री राणेंना निवेदन सादर
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १६ः सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढला असून दरडी कोसळण्याचे प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. वेंगुर्ले तालुक्यातील तुळस-पलतड (येशीवाडी) येथील ग्रामस्थांची घरे डोंगराच्या पायथ्याशी असून येथील काही घरांवर दरड कोसळण्याचा धोका असल्याने लवकरात लवकर संरक्षक भींत बांधून मिळावी, अशी मागणी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे तुळस ग्रामस्थांनी केली आहे .
तुळस-पलतड (येशीवाडी) येथील ग्रामस्थ संजय लवू परब यांच्या घराच्या शेजारी डोंगराच्या पायथ्याशी यशवंत महादेव परब, प्रविण एकनाथ परब, कृष्णा सोनू परब या तीन शेतकऱ्यांची घरे आहेत. या घरांच्या शेजारी (डोंगर) दरडींचा भाग असून त्याला भेगा पडल्या आहेत. या दरडींचा काही भाग पाच वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे प्रविण परब यांच्या घरामागच्या पडवीवर कोसळून नुकसान झाले होते.
जिल्ह्यात सद्यस्थितीत पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे या घरांना धोका निर्माण झाला आहे. येथे पिढ्यानपिढ्या रहात असलेल्या कुटुंबाच्या व त्यांच्या घराच्या संरक्षणासाठी या दरडींच्या जागेवर अंदाजे ३५ मीटर लांबीची व सात मीटर उंचीची संरक्षक भिंत बांधण्याची तातडीची गरज आहे. याबाबत तुळस ग्रामपंचायत सरपंचांनाही आठ महिन्यांपूर्वी लेखी निवेदन देण्यात आले होते. यावर मासिक सभेत वाचन होऊन संरक्षक भींत बांधण्यासाठी जमीन दिल्यावर संरक्षक भिंत बांधण्याचा विचार केला जाईल, असे उत्तर सरपंचानी दिले. असे असले तरी यासाठी निधीची गरज असून या संरक्षक भींतीसाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी राजन परब यांनी पालकमंत्री राणे यांची सिंधुदुर्गनगरीतील पालकमंत्री कक्षात प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली असून संरक्षक भिंत बांधण्यासाठी आवश्यक असलेली जमीन देऊ, असे सांगितले आहे.

चौकट
पालकमंत्र्यांकडून दखल
पालकमंत्री राणे यांनी याबाबत गंभीर दखल घेत संबंधित विभागाला सूचना देवून यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल, असे आश्वासन दिले असल्याची माहिती श्री. परब यांनी दिली.

Marathi News Esakal
www.esakal.com