आरोग्य टिकवण्याचे शास्त्र

आरोग्य टिकवण्याचे शास्त्र

Published on

आरोग्यभान ः सजगतेतून निरोगीपणाकडे-------लोगो
(११ जुलै टुडे ४)

आरोग्य ही संकल्पना म्हणजे केवळ व्याधी नसणं म्हणजे आरोग्य असं नाही तर, खऱ्या अर्थाने पूर्ण आरोग्य हे शरीर आणि मन या दोघांचं समतोल असणं हे आहे. ‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं’ हे सूत्र आयुर्वेदात स्पष्ट केलेलं आहे. म्हणजेच निरोगी व्यक्तीचे आरोग्य टिकवणे या गोष्टीला आयुर्वेदाने जास्त महत्व दिले आहे. आपण आपल्या प्रकृतीची योग्य काळजी घेतल्यास अनेक आजारांना आपण दूर ठेवू शकतो. याचाच अर्थ आरोग्यभान असणे म्हणजे स्वतःच्या शरीर, मन आणि जीवनशैलीची जाण ठेवणे. हीच जाण म्हणजे एक प्रकारचा प्रतिबंधात्मक उपाय, जो कोणतीही व्याधी होण्याआधीच आपल्याला सजग करतो.

– वैद्य गायत्री फडके (एम. डी. आयुर्वेद)
वैद्य नचिकेत दीक्षित (एम. डी. आयुर्वेद)

----
आरोग्य टिकवण्याचे शास्त्र


*आरोग्यभान म्हणजे प्रतिबंध
आपण जर वेळेवर खाणे, झोपणे, योग्य व्यायाम, आपल्या प्रकृतीनुसार योग्य आहार घेणे, मानसिक आरोग्याची काळजी घेणे हे कृतीशील पातळीवर केले तर तीच गोष्ट आपल्याला आजारांपासून लांब ठेवते. उदा. मधुमेह, रक्तदाब, स्थूलता या व्याधी सहसा हळूहळू निर्माण होतात. अनेकदा तपासण्यांमध्ये अचानक समोर येतात; परंतु यांची काही लक्षणे नीट लक्ष दिल्यास आपल्याला जाणवू शकतात. जसे वरचे वर थकवा वाटणे, सतत बसून राहावेसे, झोपावेसे वाटणे, काम करायची इच्छा न होणे, उत्साह कमी होणे, पोट जड होणे, मलबद्धता, वारंवार आम्लपित्त होणे, झोपेत अडथळा, वारंवार लघवीची संवेदना इत्यादी; पण वेळेवर लक्षणे ओळखून जीवनशैलीत बदल करून आपण हे व्याधी टाळू शकतो किंवा काही प्रमाणात तीव्रता व उपद्रव कमी करू शकतो.

* आरोग्यभान म्हणजे सजगता ती कशी राखावी?
आजच्या धावपळीच्या युगात आरोग्याकडे दुर्लक्ष होणे फार सामान्य झाले आहे. लहानशा त्रासांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते मोठ्या व्याधीचे रूप धारण करतात. उदा. अपचन, अॅसिडिटी, थकवा हे वारंवार होणारे त्रास पुढे जठरविकार किंवा यकृतविकार दर्शवू शकतात. यासाठी दररोजची आहार वेळ, झोपेची वेळ, शरीराची हालचाल, स्क्रीन टाइम याकडे लक्ष असणे आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण जीवन म्हणजे केवळ दीर्घायुष्य नव्हे तर त्या प्रत्येक क्षणात ऊर्जा, उत्साह आणि मानसिक स्थैर्य टिकवणे, हे आरोग्यभानातूनच शक्य होते.

व्याधी आणि शरीराचे संकेत
आपले शरीर अनेकवेळा सूक्ष्म लक्षणांद्वारे आपल्याला सूचना देत असते, उदा. अचानक वजन कमी होणे, भूक मंदावणे, त्वचेचा रंग बदलणे, अति झोप येणे, डोळ्यांभोवती काळी वर्तुळे, एकाग्रतेचा अभाव. काहीवेळी काही व्याधी जसे की, उच्च कोलेस्टेरॉल, हायपरटेन्शन लक्षणे न देता ही वाढत जातात किंवा खूप वाढल्यावर लक्षणे दर्शवतात.

नियमित तपासण्या आवश्यक आहेत
वय वर्षे ३० नंतर ः रक्तदाब, रक्तातील साखर, थायरॉईड
वय वर्षे ४० नंतर ः कोलेस्टेरॉल, लिव्हर फंक्शन, ईसीजी, बोन डेन्सिटी
महिलांसाठी ः मासिक पाळीतील बदल, पीसीओडी, अ‍ॅनिमिया रक्त तपासणी, स्तन तपासणी
पुरुषांसाठी ः प्रोस्टेट तपासणी, लिव्हर प्रोफाइल आदी.

बालकांच्या वाढीतील आरोग्यभान
आरोग्याचे भान हे सर्वात जास्त आवश्यक बाल्यावस्थेत आहे. या वयात शरीराचा सर्वांगीण विकास होत असतो व पुढे एक उत्तम नागरिक होण्याची पायाभरणी या वयातच होते. त्यामुळे लहान मुलांचे शारीरिक व मानसिक आरोग्याकडे पालकांनी विशेष लक्ष देणे या काळात गरजेचे झाले आहे. शारीरिक वाढीसोबत मानसिक, सामाजिक आणि भावनिक आरोग्याकडेही लक्ष दिले पाहिजे. संतुलित आहार, नियमित दिनक्रम, योग्यवेळी अभ्यास, प्रार्थना व स्तोत्रपठण, स्क्रीनचा मर्यादित वापर, मैदानी खेळ, नियमित झोप, वेळेवर लघवी-शौचाची सवय, वाचन आणि संवाद यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होतो व पुढील आयुष्यात निरोगता कायम ठेवण्यास ही मदत होते.

आरोग्य व आयुर्वेदीय दिनचर्या
आपले शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी आयुर्वेदात दिनचर्या व ऋतुचर्या वर्णन केलेली आहे. आजच्या कालानुरूप यामध्ये योग्य तो बदल करून याचे पालन केल्यास अनेक आजारांना आपण प्रतिबंध करू शकतो.

शरीराला सकाळी मलशुद्धीची सवय लावणे
नियमित अभ्यंग- ही गोष्ट रोज शक्य नसली तरीही सुटीचा दिवस घेऊन नियमितपणे त्या दिवशी तेलाने अभ्यंग करता येतो.
व्यायाम व प्राणायाम, स्वतःचे काम पूर्ण मन लावून करणे.
दैनंदिन संवाद ः कुटुंबीयांशी, मित्रांशी खुलेपणाने संवाद, वेळेवर व ताजा आहार घेणे, शरीराच्या गरजेनुसार योग्य मात्रेत व योग्य तापमानाचे पाणी पिणे. आहारात मधूर, आम्ल, लवण, तिखट, कडू व तुरट अशा सर्व चवींचा समावेश असणे. दिवसा न झोपणे व रात्री जागरण न करणे.
ऋतुनुसार वेळोवेळी पंचकर्माचे शोधन करून घेणे.
आरोग्यभान ठेवण्याची ही सवय लागली तर तीच आयुष्यभराचे बळ बनते म्हणूनच, आरोग्यभान राखणे म्हणजे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर सजगपणे वागणूक ठेवणे होय. तपासणी, औषधे आणि उपचार हे तात्पुरते उपाय आहेत; पण त्याहीपुढे जाऊन सजग जीवनशैली बनवणे ही नवनवीन आजारांना प्रतिबंध करण्यासाठी खरी काळाची गरज आहे.


(लेखक वैद्य गायत्री व वैद्य नचिकेत दीक्षित– एम.डी. आयुर्वेद, पचन व जीवनशैली विकारांमध्ये विशेष कार्यरत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com