-युती न झाल्यास शिंदे शिवसेना स्वबळावर शक्य

-युती न झाल्यास शिंदे शिवसेना स्वबळावर शक्य

Published on

अन्यथा शिंदे शिवसेना स्वबळावर शक्य
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक; वर्चस्वासाठी तयारी
मुझफ्फर खान ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १७ ः रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल पावसाळ्यानंतर वाजण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे प्राबल्य आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषद पुन्हा एकदा शिवसेनेच्या ताब्यात राहण्याची शक्यता आहे. शिंदे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीला सोबत घेणार की, स्वतंत्र जिल्हा परिषद लढवणार याची सर्वांना उत्सुकता आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जाताना शिवसेना शिंदे गट सर्वाधिक जागा मागणार, हे निश्चित आहे. दापोली आणि चिपळूण मतदार संघातून राष्ट्रवादीकडून काही जागांची मागणी होईल; मात्र या दोन्ही पक्षाचे उमेदवार ज्या ठिकाणाहून हमखास निवडून येणार त्या जागा भाजप मागणार, असे बोलले जात आहे. शिंदे शिवसेनेकडून प्रेमाने दिल्या जाणाऱ्या जागांवर राष्ट्रवादी आणि भाजपने समाधान मानले नाही तर जिल्हा परिषद निवडणूक स्वतंत्र लढवण्याची तयारी शिंदेसेनेने केल्याची चर्चा सुरू आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेचा राजकीय इतिहास पाहिला तर १९९७ पासून जिल्हा परिषदेवर शिवसेनेची एकतर्फी सत्ता आहे. १९९२ ते १९९७ या कालावधीत काँग्रेसची सत्ता होती; मात्र त्यानंतर ९७ पासून सलग २८ वर्ष ही जिल्हा परिषद सेनेच्या ताब्यात आहे. राज्यात पंधरा वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते त्या काळात ही रत्नागिरी जिल्हा परिषद शिवसेनेच्या ताब्यात होती. जिल्ह्यात राष्ट्रवादीने बऱ्यापैकी ताकद निर्माण केली होती तरीही जिल्हा परिषद ताब्यात घेता आली नाही. आता शिवसेनेचे दोन भाग झाले आहेत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना मर्यादित तालुक्यांमध्ये आहे; मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपैकी तीन आमदार एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे आहेत. ठाकरे यांच्या शिवसेनेतून विधानसभेची निवडणूक लढवलेले दोन माजी आमदार शिंदे यांच्या शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे रत्नागिरी, राजापूर आणि दापोली विधानसभा मतदार संघात शिंदेसेनेची ताकद मोठी आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण विधानसभा मतदार संघात शिवसेना वाढवण्यासाठी लक्ष दिले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जिल्हा परिषद एकहाती ताब्यात घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रयत्न राहील. या निवडणुकीसाठी प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा तयार झाला असून, त्यांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यावर येणाऱ्या हरकती विचारात घेऊन ही प्रभागरचना अंतिम करण्यात येणार आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गट आणि गणांचा प्रारूप मसुदा जाहीर केला आहे. नव्याने केलेल्या प्रारूप प्रभाग पुनर्रचना संपुष्टात आल्याने पूर्वीच्या गट आणि गणाच्या संख्येत वाढ झाली आहे. पूर्वी ५५ गट आणि ११० गणांची संख्या होती. आता जिल्ह्यात ५६ गट तर ११२ गणांची संख्या असणार आहे. नव्या प्रारूप मसुद्यानुसार गुहागर तालुक्यात एक गट आणि दोन गणांची निर्मिती झाली आहे.
---
कोट
रत्नागिरी जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मानणारा शिवसैनिक आजही तळागाळापर्यंत आहे. या शिवसैनिकांना बळ दिल्यास रत्नागिरी जिल्हा परिषदेत ठाकरे गटाची ताकद कायम राहील. पुढचा काळ कठीण परिस्थितीचा आणि संघर्षाचा आहे. त्यात कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी एकजूट राहणे गरजेचे आहे.
--बाळा कदम, चिपळूण विधानसभा क्षेत्रप्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com