जिल्हा परिषद निवडणुकांच्या हालचाली

जिल्हा परिषद निवडणुकांच्या हालचाली

Published on

swt1713.jpg
78112
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद

जिल्हा परिषद निवडणुकांच्या हालचाली
ऑक्टोबरमध्ये शक्यताः राजकीय मोर्चेबांधणीही वेगवान
विनोद दळवी : सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १७ः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठीची तयारी प्रशासकीय पातळीवरुन सुरु झाली आहे. गणेशोत्सवानंतर या प्रक्रियेला वेग येईल, अशी शक्यता सुत्रांकडून वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकिय पक्षांच्या अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत.
जिल्हा परिषदेवर २० मार्च २०२२ नंतर प्रशासकीय राज सुरु झाले. आता पुन्हा एकदा लोकप्रतिनीधींकडे सत्ता येण्याची शक्यता दृष्टीपथात आली आहे. निवडणूक विभागाने जिल्हा परिषद मतदार आणि पंचायत समिती गण यांच्या आरक्षणाचा प्रारूप आराखडा जाहीर केल्याने या हालचाली स्पष्ट दिसू लागल्या आहेत. कोरोनाची जागतिक महामारी सुरू असल्याचे कारण देत निवडणूक न घेता सहा महिन्यांसाठी प्रशासक नियुक्त केले होते; मात्र प्रत्यक्षात तीन वर्षे आणि चार महिने होत आले तरी प्रशासकच कारभार पाहत आहे. न्यायालयाने याबाबत निर्णय दिल्यानंतर निवडणूक आयोगाने आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरु केली आहे. यासाठी जाहीर प्रभाग रचनांच्या प्रारूप आराखड्यावर ३१ जुलैपर्यंत हरकती मागविल्या आहेत. यानंतर येणाऱ्या हरकतींवर सुनावणी घेऊन अंतिम आराखडा जाहीर करणार आहे. त्यानंतर मतदारसंघ आरक्षण सोडत काढून मतदारांची अंतिम निश्चिती सुरू होणार आहे.
निवडणुका साधारण ऑक्टोबरमध्ये होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काळात गणेशोत्सवासह इतर मोठे सण होऊ घातले आहेत. या काळात ही प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये निवडणुक कार्यक्रम जाहीर होऊन ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.
प्रशासकीय हालचाली सुरु होताच राजकीय पक्षही अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. कार्यकर्त्यांना बळ देण्याबरोबरच प्रत्येक मतदारसंघात ताकद निर्माण करण्यासाठी पक्ष प्रवेश, दौऱ्यांची आखणी सुरु झाली आहे. प्रशासक नियुक्त होण्यापूर्वी जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता होती; मात्र त्यानंतरच्या तीन वर्षांच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यावेळी जिल्ह्याचे खासदार आणि तीन पैकी एक आमदार ठाकरे शिवसेनेचे होते, तर एक आमदार भाजपचा आणि एक आमदार शिंदे शिवसेनेचा होता. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे शिवसेनेच्या खासदार उमेदवारांचा पराभव होऊन भाजप उमेदवाराचा विजय झाला. विधानसभा निवडणुकीत ठाकरे शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून येऊ शकलेला नाही, तर भाजपचा एक उमेदवार आणि शिंदे शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून आले. त्यामुळे राज्यात महायुती असलेल्या भाजप आणि शिंदे शिवसेनेची येथे ताकद आहे. पालकमंत्री सुध्दा भाजपचे आहेत; परंतु राज्यात एकत्र असलेले हे दोन्ही राजकीय पक्ष सध्या जिल्ह्यात एक नंबर कोण? हे ठरविण्यासाठी राजकीय ताकद पणाला लावत आहेत. त्यासाठी संभाव्य जिल्हा परिषद निवडणूक हे प्रमुख माध्यम राहणार आहे. त्यामुळे संघटनेच्या मजबुतीच्या दृष्टीने सक्षम असलेली भाजप आपणच एक नंबर आहोत, असा दावा करीत आहे; पण त्याचवेळी शिंदे शिवसेना स्वतंत्र लढण्यास तयार आहोत, असे सांगून आपला विस्तार वाढविण्याच्या तयारीत आहे.
भाजपच्या प्रदेशाध्यपदी रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती होताच त्यांनी पुन्हा एकदा पक्ष प्रवेशांचा धडाका सुरु केला आहे. मालवणमध्ये ठाकरे शिवसेनेला धक्का देत त्यांनी याची सुरवात केली. विरोधी पक्षातील नाराजांना आपल्याकडे घेचण्यासाठी भाजपकडून व्यूहरचना केली जात आहे. शिंदे शिवसेनेकडून आमदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी संघटना मजबूतीकरणाला गती द्यायला सुरवात केली आहे. तुलनेत ठाकरे शिवसेना सुप्त अवस्थेत आहे. गेल्या निवडणुकांमधील पराभवामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. अनेकजण नव्या पर्यायांच्या शोधात आहेत. त्यांना बळ देण्यासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कोकण परिक्रमा यात्रेची आखणी केली आहे. त्यांच्या नेत्यांनीही स्थानिक स्तरावर लोकांचे विविध प्रश्न घेऊन आंदोलनांचा धडका सुरु केला आहे. एकूणच निवडणुकांची चाहूल लागल्याने प्रशासनाबरोबरच राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत.

चौकट
महायुतीतील जागा वाटप ठरणार गुंतागुंतीचे
दोन आमदार असल्याने शिंदे शिवसेना भाजपकडे जास्त जागांची मागणी करण्याची शक्यता आहे. भाजपकडे जवळपास सगळ्या मतदारसंघात प्रस्थापित उमेदवार आहेत. शिवाय संघटनाही मजबूत आहे. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास या निवडणुकीत भाजप-शिंदे शिवसेना यांच्यात युती होईल का? हा प्रश्न आहे. याचवेळी ठाकरे शिवसेना सुध्दा लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आपले अस्तित्व दाखविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यांनाही या दोन्ही पराभवांनंतर आपली ताकद दाखविण्याची पहिली संधी आहे. शिवसेना-भाजपमध्ये युती झाल्यास त्यांची मुख्य लढत ठाकरे शिवसेनेशी असणार आहे. त्यामुळे तिकिट न मिळालेल्या नाराजांना विरोधी पक्षात पर्याय खुला होण्याचीही शक्यता आहे. काँग्रेस किंवा अन्य दोन्ही राष्ट्रवादी यांची विशेषतः ग्रामीण भागात तेवढी ताकद नाही.

कोट
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. मतदारसंघाचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे. यानंतर हा आराखडा अंतिम होईल. यापुढे सुध्दा निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुढील प्रक्रिया सुरूच राहतील.
- बालाजी शेवाळे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com