-आमदारांचे वर्चस्व की महायुतीची कुरघोडी
-rat१७p६.jpg-
२५N७८१११
गुहागर तालुका
----------
राजकारण----लोगो
आमदारांचे वर्चस्व की, महायुतीची कुरघोडी
गुहागरात पाच गट, १० गण ; फेररचनेनंतरही आव्हान कायमच
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १७ ः असगोली गाव नगरपंचायतीमधून बाहेर पडल्यानंतर झालेल्या रचनेत गुहागरातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटांचे चित्र बदलले आहे. गुहागर पंचायत समितीत पुन्हा ५ जिल्हा परिषद गट व १० गण झालेले आहेत. त्यामुळे फेररचनेनंतर गुहागर मतदार संघात आमदार भास्कर जाधव वर्चस्व राखणार की, महायुती त्यांच्यावर कुरघोडी करणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील राजकीय गणिते २०२४ मध्ये बदलली. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींमध्ये महायुती व महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांवरून काही प्रमाणात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील अंदाज बांधता येऊ शकतात. शृंगारतळी जिल्हा परिषद गटातील तळवली पंचायत समितीत महायुती आणि मविआला मिळालेल्या मतांमध्ये फारसे अंतर नाही. त्यामुळे या पंचायत समिती गणाचा निकाल स्थानिक मुद्दे, उमेदवार यावरच अवलंबून आहे; मात्र याच जिल्हा परिषद गटातील शृंगारतळी पंचायत समिती गटात मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मविआचे पारडे जड होते. महायुतीपेक्षा जवळपास १००० मते मविआने अधिक घेतली. त्यामुळे या गणात मविआची सरशी झाली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. तसे झाल्यास हा जिल्हा परिषद गटदेखील आमदार जाधव सहज खिशात घालू शकतात. असगोली जिल्हा परिषद गटातील अंजनवेल पंचायत समिती गण हा भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा; मात्र मागील काही निवडणुकीत या बालेकिल्ल्याला आमदार जाधव यांनी खिंडार पाडले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील महायुती व मविआतील मतांमध्ये आता जास्त अंतर नाही. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव हे याच जिल्हा परिषद गटातून निवडून आले. त्यानंतर त्यांनी अंजनवेल पंचायत समिती गणावरही लक्ष केंद्रीत केले. त्यातच धोपावे गावाचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मोडकाआगर धरणातून पाणी पुरवण्याची योजनाही आमदार जाधव यांनी मंजूर करून घेतली आहे. हे सर्व मुद्दे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जाधवांच्या बाजूने झुकणारे आहेत. याच जिल्हा परिषद गटातील असगोली पंचायत समिती गणातही आमदार जाधवांचीच सरशी दिसून येते. त्यामुळे असगोली जिल्हा परिषद गटातील मतांचे गणित काहीसे आमदार जाधव यांच्या बाजूने झुकलेले दिसते.
वेळणेश्वर गटात नेत्रा व नवनीत ठाकूर यांचे वर्चस्व आहे. येथे आमदार जाधव यांच्यापेक्षाही ठाकूर दाम्पत्याचा प्रभाव अधिक होता; मात्र नव्या रचनेत नेत्रा ठाकूर यांच्या गटातील गावे विस्कळीत झाली आहेत. त्यामुळे नव्या रचनेतील वेळणेश्वर गणात ठाकूर दाम्पत्याचा प्रभाव किती टिकून राहील, हे पाहणे आवश्यक आहे. सध्या मताधिक्य मविआकडे असले तरीही ते मताधिक्य विजयासाठी पुरेसे नाही. अशीच स्थिती शिर पंचायत समिती गटात आहे. त्यामुळे स्थानिक मुद्दे येथील विजयात महत्त्वाचे ठरू शकतात.
पडवे गटातही माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर यांचा प्रभाव आहे. तो त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही दाखवून दिला आहे. किंबहुना आमदार भास्कर जाधव राष्ट्रवादीत होते तेव्हा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही तालुकाप्रमुख असताना नाटेकर यांनी शिवसेनेचे उमेदवार विजयी करून दाखवले होते. त्यामुळे या गटात नाटेकर यांना उबाठा शिवसेनेने पुन्हा संधी दिली तर गट आणि गणात मविआची सरशी ठरू शकते; मात्र आमदार जाधव या गटातून महेश नाटेकर यांना पुन्हा संधी देणार का, याकडे लक्ष लागलेले आहे. नाटेकर यांना पुन्हा संधी मिळाली नाही आणि नाटेकर यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला तर आमदार जाधव यांना तिथे विजयासाठी मेहनत घ्यावी लागेल.
चौकट
कोंडकारूळ महायुतीसाठी पोषक
कोंडकारूळ गटातील मळण गणात मविआ आणि महायुती दोघांना समान संधी आहे तर कोंडकारूळ गणात आमदारांचा बालेकिल्ला असलेल्या अडूरमध्ये भाजपच्या दोन तरुण कार्यकर्त्यांनी संघटन वाढवले आहे. त्यांच्या मदतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे सहकारी नीलेश दातेही आले आहेत. पालशेतमधील आमदारांची ताकद थोडी कमी झाली आहे. या सर्वांचा विचार केला तर कोंडकारूळ गणात या वेळी महायुतीसाठी पोषक झाला आहे. महायुतीने दोन्ही गणात चांगले काम केले तर कोंडकारूळवर वर्चस्व निर्माण करता येऊ शकते.
कोट
विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून आम्ही एकसंधपणे जोरदार टक्कर दिली. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा एकदा महायुती जोरदार लढत देईल आणि निसटून गेलेल्या विजयाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करेल.
अभय भाटकर,
तालुकाध्यक्ष, भाजप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.