वाडा बंद झाला की, घराला लवकरच कुलूप
rat18p4.jpg
78265
जयंत फडके
बोल बळीराजाचे...लोगो
इंट्रो
राज्याच्या पशुसंवर्धन मंत्र्यांनी पशुपालनाला शेतीचा दर्जा देण्याची घोषणा केली. असं करणारं महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिलंच राज्य आहे. सरकारच्या या निर्णयाचे शेतकऱ्यांनी, पशुपालकांनी स्वागतच करायला हवं. महाराष्ट्रातील दूध उत्पादन क्षमता इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. वाढती शैक्षणिक पातळी, वाढता आर्थिक स्तर, आरोग्यविषयीची जागृती यामुळे दुध, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस यांची वाढती मागणी कायम रहाणार आहे. नवीन धोरणामुळे शेतीसाठी मिळणारे वीज, पतपुरवठा, कर या संबंधीचे फायदे पशुपालनासाठीही उपलब्ध होतील. आता माझा बळीराजा याचा कसा फायदा करून घेतो ते पाहायचे...!
- जयंत फडके,
जांभूळआड, पूर्णगड रत्नागिरी
------------------------------------
वाडा बंद झाला की, घराला लवकरच कुलूप
कोकणात गुरांची संख्या गेल्या काही वर्षांत झपाट्याने कमी होत आहे; मात्र उनाड, बेवारस गुरांचे कळप गावात, शहरात अगदी मोकळेपणाने फिरताना दिसत आहेत. म्हणजे गुरे आहेत; पण मालक नाहीत, अशी परिस्थिती सर्वत्र दिसत आहे. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रावरच कोकण दूध, दुग्धजन्य पदार्थांसाठी अवलंबून आहे. हा मोठा विरोधाभास म्हणायला हवा. गुरे आहेत; पण दूध नाही आणि दुधासाठी आपण दुसऱ्या प्रदेशावर अवलंबून....काय असतील कारणं?
मुळात कोकणात तरी दूध, दही, ताक, तूप, अंडी, मटण या विकत आणायच्या गोष्टीच नव्हत्या....आता इतकं मागं नको जायला; पण अगदी वीस-पंचवीस वर्षापूर्वी प्रत्येकाचा वाडा भरलेला नसला तरी जोताचे दोन बैल किंवा रेडे, गोग्रासाला-घरच्या पुरत्या दुधाला एखादी गाय किंवा म्हैस, प्रेमाने वाढवलेलं मागच्या वेताचं एखादं गोंडस वासरू अशी चार-पाचजणांचं गोधन प्रत्येकाच्या वाड्यात नक्कीच होतं...गोधनच..गाईला तेव्हा धन मानत होतो आपण..; पण यांत्रिकीकरणाचा शाप असा की, जोताला बैलांची गरज राहिली नाही आणि वाड्यातली गुरे हद्दपार झाली. दुधाची पिशवी नाक्यावरच्या दुकानात हवी तेव्हा मिळू लागली. दूधही खरंतर चैनीची गोष्ट कधीच नव्हती; पण एखाद्या गोष्टीची सहज उपलब्धता ही तिचे महत्व कमी करण्यास कारणीभूत होतेच तसेच काहीसं दुधाचंही झालं. आपण स्वयंपूर्ण शेतकरी दुधाच्या बाबतीत कधी परावलंबी झालो, हे आपल्यालाच कळलंच नाही. परसात सहज फिरणारी गावठी कोंबडी कुठच्या भालूनं पळवली देव जाणे. कोरोनादरम्यान वाहतूकव्यवस्था कोलमडली आणि पहिल्यांदाच आपल्याजवळ काय नाहीये, याची जाणीव झाली; पण तोपर्यंत खूप उशीर झालाय. आता गुरं बाळगणारे शेतकरी मूर्ख समजले जातायत. आपण ती न सांभाळण्याची कारणं शोधू लागलोय...
खरंच, दूध हा व्यवसायाचा भाग बनू शकत नाही की, कोकणात दुग्धोत्पादन अशक्य आहे, यावर शेतकऱ्यांचे बाकी कुठेच नसलेलं एकमत आहे. शासकीय दूध योजना ठरवून कोकणात बुडवली गेली. संकरित जनावरांच्या नादात आपण कोकणातील कोकण गीड्डा घालवून बसलोय. डोंगरउतारावर फिरणारी आणि विकतच्या बाजारी खाण्यावर अवलंबून नसलेली कोकणात वाढलेली आणि वेळेला तीन-चार लिटर दूध देणारी गावठी म्हैस आणि गायही आता शोधून सापडत नाही. गावठी कोंबडी आणि अंडी हे आता बोर्ड लावून विकायचे विषय झालेत. जगात कोकणाइतका कोणताच भूप्रदेश स्वावलंबी नव्हता; पण आता दुधाच्या, अंड्याच्या, ब्रॉयलर कोंबड्यांच्या गाड्या घाटावरून कोकणात येताना बघितल्या की, प्रश्न पडतो पशुधन खरंच धन मानतोय आपण? पशुसंवर्धन मंत्र्यांच्या घोषणेनं खरंच, कोकणातील माझ्या बळीराजाला जोडधंद्याची नवी दारं उघडली असं वाटत असेल? अनुदान आणि कर्जप्रकरण यात तो आधीच नागवला गेलाय..अधिकाऱ्यांच्या टार्गेटवर "गो" पेक्षा "धन" वरच्या पातळीवर आहे. मग, खरंच स्वस्त वीज, शेतीच्या योजना, कर्ज, कमी व्याजदर आणि मुख्य म्हणजे शासकीय खात्याचा आपलेपणा या साऱ्यातून माझ्या बळीराजाला नवी उमेद मिळेल?
चिपळूण परिसरात वाशिष्ठीनं थोडा आशेचा किरण दाखवलाय; पण त्यानं घराघरात असलेलं गोधन परत पूर्ववत होईल, हे शक्य नाही. वैयक्तीक निरीक्षण सांगतं वाडा बंद झाला की, घराला कुलूप लागायला फार काळ लागत नाही. आपण काळाच्या ओघात काय गमावतोय हे मागे वळून बघायला आपल्याला वेळ नाही; पण वाडा हा बळीराजाच्या शेतीचा आत्मा आहे, हे विसरून चालणार नाही.
(लेखक प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकरी आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.