कणकवलीत २२ ला रोजगार मेळावा
कणकवलीत २२ ला
रोजगार मेळावा
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग व कणकवली कॉलेज कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा मंगळवारी (ता. २२) कणकवली कॉलेज येथे आयोजित केला आहे. जिल्ह्यातील उद्योजक व उमेदवारांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त येरमे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योजकांना आवश्यक कुशल मनुष्यबळ प्राप्त करुन देण्यासाठी जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील नामांकित उद्योजक, इंडस्ट्रीजना या रोजगार मेळाव्यात आमंत्रित केले आहे. उद्योजकांनी पोर्टलवर पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये आपली रिक्तपदे अधिसूचित करावीत. जिल्ह्यातील नोकरी साधक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित पदासाठी ऑनलाईन अर्ज करावे. तसेच २२ ला कणकवली कॉलेज येथील मेळाव्यात शैक्षणिक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
----------------
‘बाल आशीर्वाद’चा
संदेश पूर्णपणे खोटा!
सिंधुदुर्गनगरी ः ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ या नावाने सोशल मीडियावर प्रसारित होत असलेला संदेश पूर्णपणे खोटा असून, महिला व बाल विकास विभागाकडून अशी कोणतीही योजना राबविण्यात येत नाही, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अशा फसव्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी केले आहे. या प्रकारच्या फसव्या संदेशांमध्ये १ मार्च २०२० नंतर दोन्ही पालक अथवा एक पालक मृत्यू झाला आहे व बालकांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील २ मुलांना बाल सेवा योजनेत दरमहा ४ हजार रुपये मिळणार आहेत व त्याचे फॉर्म तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत. अर्ज भरून जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा परिवीक्षा अधिकारी यांच्याकडे सादर करावे, असा मजकूर प्रसारित करण्यात येत आहे. अशी कोणतीही योजना नसून त्यास बळी पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
--------------
क्रीडा स्पर्धांसाठी
तालुकास्तरीय बैठका
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यांच्यातर्फे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासंदर्भात तालुकास्तरीय बैठकींचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी दिली. या बैठकीचे वेळापत्रक असे ः २२ ला देवगड, वैभववाडी, कणकवली तालुक्यांसाठी (स्थळ : कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय), २३ ला सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्लेसाठी (स्थळ ः कळसुलकर विद्यालय, सावंतवाडी), २४ ला मालवण, कुडाळसाठी (स्थळ ः रघुनाथ देसाई विद्यालय, मालवण). या बैठकीमध्ये शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाबद्दल तसेच शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय क्रीडा योजनांची माहिती देण्यात येणार आहे. या बैठकीस संबंधित तालुका क्रीडा समन्वयक, तसेच सर्व कनिष्ठ महाविद्यालय आणि प्रशालांतील क्रीडा शिक्षकांनी सकाळी १० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केले आहे.
---------------
वर्दम हायस्कूलचे
शिष्यवृत्तीत यश
मालवण : पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सौ. ई. द. वर्दम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीमध्ये प्रशालेचे एकूण सहा विद्यार्थी चमकले आहेत. ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ताधारक अथर्व माधव, अथर्व मेस्त्री, रोहन धारपवार, सायली पाताडे, संचिता मसदेकर, चित्रा परब या विद्यार्थ्यांनी यश संपादन करून शाळेच्या प्रगतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक होत आहे. तसेच मुख्याध्यापक व्ही. एन. कुंभार, संस्थेचे अध्यक्ष अनिल कांदळकर आदींनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.