जयप्रभा स्टुडिओची जागा शेतकऱ्यांच्या नावावर करावी
११६३७
आमदार क्षीरसागर यांनी ‘जयप्रभा’ची जागा द्यावी
निमशिरगाव ग्रामस्थांची मागणी ः ‘शक्तिपीठ’विरोधातील शेतकऱ्यांचे सरपंचांना निवेदन
जयसिंगपूर, ता. १८ : शक्तिपीठ महामार्गाला सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे; मात्र आमदार राजेश क्षीरसागर गैरसमज पसरवत आहेत. क्षीरसागर यांना शक्तिपीठ महामार्गास जमीन पाहिजे असल्यास त्या बदल्यात त्यांनी त्यांच्या मालकीची जयप्रभा स्टुडिओमधील जागा शेतकऱ्यांच्या नावावर करण्याची मागणी निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकऱ्यांनी आज केली.
शिरोळ तालुक्यातील ज्या गावांतून शक्तिपीठ महामार्ग जातो, तेथील ७० टक्के शेतकऱ्यांचे समर्थन असल्याची माहिती आमदार क्षीरसागर यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिली. तसे सात-बाराही दाखविले. मुळातच आमच्या गावातून रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग, सांगली-कोल्हापूर राज्य महामार्ग, सांगली - कोल्हापूर बायपास रोड, रेल्वे महामार्ग, निमशिरगाव - दानोळी प्रमुख जिल्हा मार्ग तसेच प्रस्तावित बोरगाव - इस्लामपूर मार्ग, प्रस्तावित रेल्वे दुहेरीकरण एवढे रस्ते व रेल्वे मार्ग जात आहेत. यामुळे नवीन शक्तिपीठ महामार्ग झाल्यास शेकडो एकर जमीन संपादित जाणार आहे. यामुळे अनेक कुटुंबे भूमिहीन झाल्यावर भविष्यातील पिढीला जमिनी शिल्लक राहणार नाहीत. निमशिरगावातील सर्व बाधित शेतकऱ्यांनी एकत्रित येत शक्तिपीठ महामार्गास कडाडून विरोध केला.
बाधित सर्व शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांचे नाव, गट नंबर शक्तिपीठ महामार्गास विरोध असल्याचा फलक हातात धरून एकमताने विरोध केला. माजी सरपंच शिवाजी कांबळे, शांताराम कांबळे, प्रदीप पाटील, राजगोंडा पाटील, शंकर पाटील, विक्रम चौगुले, अजित पाटील, अविनाश कोडोले, अमोल पाटील, ग्रामपंचायत सदस्य स्वस्तिक पाटील, सुधाकर पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
जेवढी घ्याल तेवढीच
‘जयप्रभा’तील जमीन द्या
सरपंच अश्विनी गुरव यांना निवेदन देऊन सदरचे निवेदन बाधित शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पाठविले. राजेश क्षीरसागर यांच्या भूमिकेमुळे संतप्त शेतकऱ्यांनी जेवढी जमीन शक्तिपीठ महामार्गास जाणार आहे, तेवढीच जयप्रभा स्टुडिओतील जमीन आमदार राजेश क्षीरसागर शेतकऱ्यांच्या नावावर करत असतील तर खुशाल जमिनी घ्याव्यात, अशी मागणी केली.