राजापूर - रास्त धान्य दुकानांचे चालक आर्थिक संकटात

राजापूर - रास्त धान्य दुकानांचे चालक आर्थिक संकटात

Published on

रास्त धान्य दुकानांचे चालक आर्थिक संकटात
सात महिन्यांचे लाखोंचे कमिशन थकीत ; धोरणातील बदलाने खो
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १८ः रास्त धान्य दुकानदारांचे गेल्या सात महिन्यापासून लाखो रुपयांचे कमिशन थकीत असल्याने दुकानदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्याबाबत सातत्याने शासन, प्रशासन स्तरावर पाठपुरावा करूनही कमिशनचे अनुदान अद्यापही मिळलेले नाही. कमिशनची रक्कम मिळण्याबाबत ‘केवळ आश्वासन अन् तारीख पे तारीख’ अशी स्थिती राहिल्याने घरखर्चासह नोकरदारांचा पगार भागवायचा कसा0 असा सवाल रास्त धान्य दुकानदारांमधून उपस्थित केला जात आहे.
शासनातर्फे रास्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना विविध प्रकारचा धान्यपुरवठा केला जात आहे. कोरोना काळामध्ये धान्य मिळण्यामध्ये रास्त धान्य दुकानदारांची भूमिका महत्वाची ठरली होती. शासनाच्या माध्यमातून धान्यपुरवठा करणार्‍या रास्त धान्य दुकानदारांना मोबदला म्हणून शासनाकडून कमिशन दिले जाते. तालुक्यामध्ये शंभर रास्त धान्य दुकाने कार्यरत असून, त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील गावोगावच्या लाभार्थी रेशनिंग कार्डधारकांना धान्यपुरवठा केला जात आहे. त्या बदल्यात शासनाकडून रास्त धान्य दुकानदारांना मोबदला म्हणून कमिशन दिले जाते; मात्र, नोव्हेंबर, २०२४ पासून मे, २०२५ पर्यंतचे सात महिन्यांचे लाखो रुपयांचे कमिशन दुकानदारांना अद्यापही शासनाकडून मिळालेले नाही. असे असतानाही नैसर्गिक आपत्तीच्या कारणास्तव दुकानदारांनी जून ते ऑगस्ट असे तीन महिन्यांचे धान्य बांधिलकी म्हणून एकाचवेळी लाभार्थ्यांना पोहच केले असून, त्याचीही भर रखडलेल्या कमिशनमध्ये पडली आहे.

चौकट
शासनाच्या दिरंगाईमुळे समस्या
शासनाकडून मिळणारे कमिशन उत्पन्नाचे मुख्य स्रोत असल्याने बहुतांश दुकानदार उदरनिर्वाहासाठी या कमिशनवरच अवलंबून राहिलेले आहेत; मात्र, ७ महिन्याचा कालावधी संपला तरी, कमिशनच्या रक्कमेचा पत्ता नसल्याने या दुकानदारांवर आर्थिक बोजा वाढत चालला आहे. त्याच्यातून, घरखर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन, दुकानांचे भाडे आणि इतर दैनंदिन खर्च भागवताना कसरत करावी लागत आहे. शासनाच्या धोरणात्मक बदलांमुळे आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. यामुळे दुकानदारांमध्ये संभ्रम आणि चिंतेचे वातावरण आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com