दुचाकी चोरी प्रकरणातील आणखी संशयित ताब्यात
दुचाकी चोरी प्रकरणातील
आणखी संशयित ताब्यात
सावंतवाडी, ता. १८ : गोवा टॅक्सीचालक हल्ला प्रकरण आणि सावंतवाडीतील दुचाकी चोरी प्रकरणात सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आणखी एका संशयिताला तुळजापूरमधून ताब्यात घेतले. अजय सुनील भोसले (वय २७, रा. तुळजापूर) असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता २१ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. यापूर्वी याच प्रकरणात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने कर्नाटकातील बंगळूर येथून दोन सराईत संशयितांना अटक केली होती. शंकर मधुकर पवार ऊर्फ हाड्या (वय अंदाजे २५) आणि राजू मधुकर पवार ऊर्फ गुड्या (वय २४, दोघे रा. मोहोळ, जि. सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत. ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नवमी साटम आणि सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे आणि पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली केली.
-----------------
भजनी कलाकार संस्थेची
उद्या मसुरे येथे कार्यशाळा
मसुरे : भजनी कलाकार संस्था, सिंधुदुर्ग या संस्थेची नुकतीच स्थापना केली असून, तिला शासन दरबारी मान्यता मिळाली आहे. या संस्थेची तालुकास्तरीय कार्यशाळा रविवारी (ता. २०) येथील भरतगड इंग्लिश स्कूल, मसुरे मर्डे सभागृहात आयोजित केली आहे. संस्थेचे अध्यक्ष संतोष कानडे यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा होणार आहे. यावेळी मसुरे येथील प्रसिद्ध उद्योजक तथा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष डॉ. दीपक मुळीक-परब, मुंबई येथील उद्योजक तथा ज्येष्ठ कामगार नेते प्रकाश परब, भजन सम्राट तथा मानधन समिती सिंधुदुर्गचे सदस्य भालचंद्र केळुसकर, माजी सभापती तथा मानधन समिती सिंधुदुर्गचे सदस्य अजिंक्य पाताडे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी कलाकार मानधन विमा योजना, कलाकार ओळखपत्र, भजन परंपरा संवर्धन व जतन, भजन कार्यशाळा मार्गदर्शन शिबिर घेणे, कलाकारांसाठीच्या शासकीय योजनांविषयी पाठपुरावा करणे, नवीन सदस्य नोंदणी, ज्येष्ठ कलाकारांना मार्गदर्शन करणे, अशा विविध प्रश्नांसंदर्भात नियोजन करणे या संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. मालवण तालुक्यातील सर्व संगीत, वारकरी भजनी बुवा, पखवाज वादक, तबलावादक, झांज वादक, कीर्तनकार, कोरस, नवोदित कलाकार, अन्य भजन क्षेत्रातील कलाकारांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
-------------------
कणकवलीत आज,
उद्या ‘गुरुवंदना’
आचरा : आदर्श संगीत विद्यालय, कणकवलीतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त १९ व २० ला गुरुवंदना कार्यक्रम कणकवली आदर्श संगीत विद्यालय चौडेश्वरी मंदिरानजीक आयोजित केला आहे. यासाठी प्रमुख पाहुणे कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे उपस्थित राहणार आहेत. यावेळी माध्यमिक विद्यामंदिर, कणकवलीचे मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे, सुरेंद्र ऊर्फ अण्णा कोदे, डॉ. मीनल नागवेकर, डॉ. विनय शिरोडकर, गजेंद्र कृपाळ, डॉ. विवेक रेवडेकर, डॉ. मुक्तानंद गवंडळकर आदी उपस्थित राहणार आहेत. १९ व २० असे दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात प्रथम सत्र १९ ला दुपारी तीन वाजता पखवाज वादक संदीप मेस्त्री यांचे पखवाज वादन होणार आहे. द्वितीय सत्र २० ला सकाळी दहा वाजता तर तृतीय सत्र दुपारी तीन वाजता होणार आहे. यावेळी माजी संगीत शिक्षक विद्यामंदिर, संगीतगुरू बाळ नाडकर्णी, ज्येष्ठ लोककला कलावंत हरिभाऊ भिसे, पखवाज विशारद संदीप मेस्त्री, गायन विशारद श्रुती परुळेकर, कथ्थक विशारद गौरी कामत यांचा यावेळी विशेष सत्कार केला जाणार आहे.
---------------------
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव
मंडळ स्पर्धेसाठी अर्ज करा
सिंधुदुर्गनगरी, ता. १८ : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग, यांच्या वतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५’ चे आयोजन केले आहे. या स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतात. स्पर्धेचे अर्ज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या संकेतस्थळावर उपलब्ध केलेल्या ऑनलाईन पोर्टलद्वारेच २० जुलै ते २० ऑगस्टपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. अपूर्ण अर्ज रद्द ठरविण्यात येतील. जास्तीत जास्त मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार यांनी केले आहे. स्पर्धा निःशुल्क असून, सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन याकरिता राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे याविषयी जनजागृती तसेच जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्य, पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट, ध्वनी प्रदूषणरहीत वातावरण, गणेशभक्तांसाठी केलेल्या सोयीसुविधांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि असेच समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक घडावेत म्हणून प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. याच निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण केले जाईल. २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात जिल्हाधिकारी कार्यालयाने गठीत केलेली जिल्हास्तरीय समिती या स्पर्धेत सहभागी मंडळे किंवा संस्थांच्या उत्सव स्थळाला भेट देतील आणि जिल्हास्तरीय परीक्षण पूर्ण करतील. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे हे चार जिल्हे प्रत्येकी तीन आणि हे चार जिल्हे वगळता अन्य ३२ अशा प्रत्येक जिल्ह्यातून एक यानुसार एकूण ४४ शिफारसी राज्यस्तरीय परीक्षणासाठी स्वीकारल्या जातील. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. राज्यस्तरीय परीक्षणात प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे पाच लाख, २.५ लाख आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच अन्य जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
-----------------
जिल्हा युवा पुरस्कारासाठी
अर्जांसाठी ऑगस्टपर्यत मुदवाढ
सिंधुदुर्गनगरी, ता. १८ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग मार्फत जिल्ह्यातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य कारण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने प्रतिवर्षी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतो. २०२४-२५ साठी जिल्हा युवा पुरस्काराठी अर्ज सादर करण्यासाठी ५ ऑगस्टपर्यंत मुदवाढ दिल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी दिली आहे.
राज्याचे युवा धोरण २०१२ मधील शिफारशीच्या अनुषंगाने शासनाने जिल्हास्तरावरील युवा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा युवा पुरस्कार तीन जणांना दिला जाणार आहे. यात युवक, युवती व नोंदणीकृत संस्था यांचा समावेश असेल. युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागांत केलेले सामाजिक कार्य, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती, जमाती व जनजाती, आदिवासी भाग इत्यादी बाबतचे कार्य, शिक्षण झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थान, तसेच स्थानिक समस्या आदींबाबत पुरस्कार वर्षापासून गत तीन वर्षांत केलेली कामगिरी या पुरस्कारांसाठी विचारात घेतली जाईल. अर्जदाराने अर्ज आवश्यक कागदपत्रे व केलेल्या कार्याचे सबळ पुरावे बंद लिफाफ्यामध्ये ५ ऑगस्ट २०२५ पर्यंत कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत, सिंधुदुर्गनगरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.