हत्तींकडून पुन्हा नुकसानसत्र सुरू
78536
कोलझर ः येथे हत्तींनी केलेले नुकसान.
78537
कोलझर ः येथे शनिवारी दिवसाढवळ्या वस्तीजवळ पोहोचलेल्या हत्तींच्या पाऊलखुणा.
हत्तींकडून पुन्हा नुकसानसत्र सुरू
कोलझरमध्ये उच्छाद; वस्तीजवळ पोहोचल्याने भीती
सकाळ वृत्तसेवा
कोलझर, ता. १९ ः गेले दोन आठवडे शांत असलेला सहा हत्तींचा कळप पुन्हा आक्रमक झाला आहे. त्यांनी काल (ता. १८) रात्री कोलझरमध्ये उतरत बागायतीचे मोठे नुकसान केले. आज दिवसभर हा कळप अगदी वस्तीजवळ ठाण मांडून असल्याने पुन्हा दहशत निर्माण झाली आहे.
या कळपात गणेश व ओंकार हे टस्कर, दोन माद्या आणि दोन पिल्लांचा समावेश आहे. गेले चार महिने हा कळप परिसरात धुमाकूळ घालत आहे. मध्यंतरी तो खडपडे आणि झोळंबे या गावांमध्ये स्थिरावला होता. पावसाचा जोर असलेल्या काळात या कळपाने तेथील डोंगरात मुक्काम ठोकला होता. गेल्या आठवड्यात हा कळप पुन्हा कोलझरमध्ये दाखल झाला. बराचकाळ त्यांचा तेथील डोंगरात मुक्काम होता. गेले आठ दिवस त्यांनी फारसे नुकसान केले नव्हते. सध्या डोंगरात चिवारीचे कोंब व इतर खाद्य उपलब्ध असल्याने ते वस्तीजवळ येऊन बागायतीचे फारसे नुकसान करणार नाहीत, असा अंदाज होता; मात्र काल रात्री हा अंदाज फोल ठरला.
या हत्तींचा कळप मध्यरात्री कोलझर धुपेवाडी येथे असलेल्या रुपेश वेटे यांच्या बागेत उतरला. वन विभागाला त्यांचे लोकेशन मिळाले; मात्र मुसळधार पावसामुळे त्यांना तेथून हटवणे कठीण झाले. तेथे या हत्तींनी नारळाची मोठी झाडे उन्मळून टाकली. त्यानंतर केळींचीही नासधूस केली. यानंतर हा कळप वरच्या बाजूला सरकला. तेथे अनिल अमृत देसाई आणि मेघश्याम गोपाळ देसाई यांच्या मालकीच्या बागायतीत धुमाकूळ घातला. तेथे नारळाची मोठी झाडे उन्मळून तुडवली. या तिन्ही शेतकर्यांचे या आधीही हत्तींनी मोठे नुकसान केले आहे. हत्ती पुन्हा आक्रमक झाल्याने चिंतेचे सावट गडद झाले आहे. गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात हत्ती कर्नाटकच्या दिशेने परतत असल्याचा अनुभव होता. यंदा तो फोल ठरला. अर्धा पावसाळा संपत आला तरी हा कळप कोलझर भागातच राहिल्याने तो येथे कायमस्वरुपी स्थिरावण्याची भीती व्यक्त होत आहे.
...................
भर दिवसा वस्तीजवळ
हत्तींचा हा कळप आज दुपारी अगदी वस्तीजवळ मुक्तपणे वावरत होता. त्यांचा कोलझरमधील कोल्ह्याचे टेंब या भागात वावर होता. तेथे भल्यामोठ्या पाऊलखुणांचा माग स्थानिकांनी पाहिला. वन विभागाचे पथक या भागात कार्यरत आहे; मात्र हत्ती आले तरी त्यांना वस्तीपासून दूर ठेवण्याची फारशी सक्षम यंत्रणा त्यांच्याकडे नाही. त्यामुळे गस्त असूनही त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचा अनुभव स्थानिकांना आला आहे. यामुळे भीती आणखी वाढली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.