अडचणीशिवाय कशेडी बोगदा चाकरमान्यांसाठीचा वायदा

अडचणीशिवाय कशेडी बोगदा चाकरमान्यांसाठीचा वायदा

Published on

सकाळ विशेष

rat20p11.jpg
78719
खेड ः कशेडी बोगद्यामध्ये वेल्डिंगचे कामे करताना कामगार.
rat20p14.jpg-
78722
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा.
rat20p15.jpg
78723
विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे कशेडी बोगदा परिसरात मध्यरात्री अशी स्थिती असते.
-rat20p२4.jpg-
78739
खेड ः बोगदा झाल्यामुळे कशेडी घाटातील जुना मार्ग दुर्लक्षित झाला आहे.
-----------

इंट्रो

कोकणवासीयांना सागरी महामार्ग, नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग अशी अनेक स्वप्ने दाखवली जात आहेत. कोकणातून पर्यटनाच्या माध्यमातून कोट्यवधीच्या उलाढालीचे आराखडे बांधले जात आहेत. पण याच कोकणच्या प्रवेशद्वारावर असलेला कशेडी घाट आणि कशेडी घाटाला पर्याय म्हणून काढण्यात आलेला बोगदा हा अद्यापही वाहतुकीसाठी अडचणीचाच ठरत आहे. या बोगद्यातून वाहतूक सुरू असली तरी या बोगद्यात होणारी पाण्याची गळती, अनेकदा खंडित होणारा विद्युत प्रवाह तसेच बोगद्यातील अंतर्गत रस्त्यांची रखडलेली कामे यामुळे हा बोगदा सतत चर्चेत राहिला आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर याबाबतचा आढावा...
- सिद्धेश परशेट्ये, खेड

अडचणीशिवाय कशेडी बोगदा
चाकरमान्यांसाठीचा वायदा
अडथळ्यांचे आव्हान ; प्रवासातील धोक्यांवर हव्यात उपाययोजना

मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी बोगदा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. सध्या या बोगद्यामधून वाहतूक सुरु असली तरीही त्यात काही तांत्रिक अडचणी आहेतच. त्या सोडविण्यासाठी उपाययोजनाही सुरू आहेत. शास्त्रीय उपायांनी हा कशेडी बोगदा भविष्यातील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी उपयुक्त ठरेल. सुरवातीपासूनच या बोगद्याच्या कामाला दिरंगाई झाली होती. हे काम करताना वापरलेले तंत्रज्ञान जरी उच्च दर्जाचे असले तरीही सद्यःस्थितीत या बोगद्यामध्ये होणारी गळती, ड्रेनेजची व्यवस्था या सगळ्या बाबतीत बोगद्याचे काम पूर्णत्वास कधी जाईल याबाबत साऱ्यांच्याच नजरा लागल्या आहेत. कशेडी बोगद्याला अनेक ठिकाणी गळती लागली असल्याचे उन्हाळ्यातही अनुभवायला मिळाले होते. संबंधित ठेकेदाराकडून बोगद्यात कोसळणारे छोटे धबधबे रोखण्यासाठी सात ते आठ ठिकाणी पत्रे लावले आहेत, तरीही सिमेंटच्या बांधकामातून पाण्याचे फवारे बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून गळतीच्या या घटना गंभीर आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी गतवर्षी तज्ञांकडून पाहणी केल्यानंतर त्यावर ठोस उपाय योजना करुन देखील बोगद्यातील गळती कायम आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा हा दोन किलोमीटरचा आहे. दोन्ही बोगदे वाहतुकीसाठी सहा महिन्यांपासून सुरू करण्यात आले आहेत. दोन्ही बोगद्यातील किरकोळ कामे अद्यापही अपूर्ण आहेत. गतवर्षी च्या पावसाळ्यात कशेडी बोगद्याला गळती लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले. या पावसाच्या पाण्यामूळे वाहन चालक आणि दुचाकीस्वारदेखील त्रस्त झाले आहेत. कशेडी बोगद्यातील गळती थांबविण्यासाठी व थेट वाहनांवर पडणारे पाणी रोखण्यासाठी कशेडी बोगद्याच्या ठेकेदाराने गतवर्षी बोगद्याला गळतीच्या ठिकाणी केलेली उपाययोजना अपुरी ठरत आहे.
---------

सध्या झालेल्या कामातील त्रुटी
*गळतीचे प्रमाण वाढलेले- टनेलमध्ये काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर गळती दिसून आली आहे.
*संपूर्ण ड्रेनेज सिस्टीम अपुरी- काही ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार दिसून आले आहेत.
*स्ट्रक्चरल फिनिशिंग अपूर्ण- काही ठिकाणी काँक्रीटीकरणाची उणीव, प्लास्टर न झालेला भाग आढळतो.
*यंत्रणांचे अधुरे काम- व्हेंटिलेशनआणि लाईटिंग सिस्टीम पूर्ण क्षमतेने कार्यरत नाहीत.
-----

आव्हाने आणि तयारी

*भूगर्भातील पाण्याचे दाब - डोंगरभागातील जलस्रोतांमुळे टनेलमध्ये गळती वाढते आहे.
*डोंगरातील खडकांचा प्रकार - काही भागांमध्ये मऊ खडक असल्यामुळे मजबुतीचा प्रश्न निर्माण होतो.
*तांत्रिक अडचणींसाठी उपाय - जलरोधक लेप, रॉक बोल्टिंग, ग्राउटिंग व डबल लाइनिंग यांसारख्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. सतत निरीक्षणासाठी सेन्सर बसवले गेले आहेत.
--------------

गळतीवर उपाययोजना व विहिरी संशोधन

उपाययोजना
*ग्राउटिंग - गळतीच्या ठिकाणी केमिकल ग्राउटिंगद्वारे फाटलेल्या भागांना भरण्यात आले आहे.
*विहिरी संशोधन - डोंगरावरील १० हून अधिक विहिरींचे स्थानिक भूगर्भशास्त्रज्ञांनी निरीक्षण केले.
तज्ज्ञ भूजल अभ्यासक डॉ. अनिल देशमुख यांनी याठिकाणी पहाणी करत विहिरींच्या खालील जलस्रोत हे टनेलमधील गळतीस कारणीभूत ठरू शकतात. स्थानिक जलचक्र बदलल्याचे स्पष्ट दिसते.” अहवालात भूजल साठ्याचे पुनर्वसन व टनेलपासून काही अंतरावर विहिरीचे संरक्षण गरजेचे असल्याचा निष्कर्ष काढून तशी माहिती संबंधित विभागाला दिली आहे.
-----

rat20p12.jpg-
78720
खेडः कशेडी बोगद्याकडे जाणाऱ्या जोड रस्त्यांवर दरड कोसळत असल्याने बॅरिकेटस् लावण्यात आले आहेत.

टनेल बाहेरील रस्ते कामाची स्थिती

मुख्य प्रवेश व निर्गमन रस्ते पूर्णतः तयार आहेत. बोगद्याला जोडणाऱ्या जोडरस्त्यांचे काम अजून सुरू आहे. ड्रेनेज लाइन, फुटपाथ व डिवायडरचे काम अद्यापही अपूर्णच आहे. जोड रस्त्यावरील पुलांचे काम पूर्णत्वास गेलेले असले तरी त्या पुलाचे संरक्षक कठडे व पुलावरील रस्त्याचे मजबुतीकरण अशी कामे अद्यापही बाकीच आहेत. बोगद्याला जोडणाऱ्या जोडरस्त्यालगत असलेल्या गटाराचे काम अपूर्ण असल्यामुळे डोंगर भागातून येणारी माती थेट रस्त्यावर येत असल्यामुळे मुसळधार पावसात वाहन चालक व दुचाकीस्वारांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर मात करण्याचे आव्हान बांधकाम विभागापुढे आहे. याठिकाणी सतत वाहतूक ठप्प झालीच, तर प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
------

प्रकाशयोजना

एलईडी लाईटिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे. आपत्कालीन लाईट बॅकअप सिस्टीम कार्यान्वित. स्मार्ट सेन्सरद्वारे लाईट्स ऑटो ऑन/ऑफ होतात. असे असले तरी दोन्ही बोगद्यातील प्रकाशयोजना ही पूर्ण कार्यान्वित झालेली नाही. सद्यस्थितीत मध्यरात्रीच्या सुमारास दोन्ही बोगद्यातील प्रकाश योजना अर्धवट स्थितीत सुरू असते.
-----

व्हेंटिलेशन यंत्रणा

या बोगद्यामध्ये व्हेंटिलेशन यंत्रणा कार्यान्वित करताना. जेट फॅन टेक्नॉलॉजी वापरली आहे. प्रत्येक ५० मीटरला हवेचे वहन करणारे फॅन्स लावले आहेत. कार्बन मॉनॉक्साईड आणि ह्यूमिडिटी मोजण्यासाठी सेन्सर्स सक्रिय आहेत.
-----

टनेल बनवताना वापरलेलं तंत्र

* न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (एनएटीएम- New Austrian Tunneling Method) म्हणजे नैसर्गिक खडकाच्या रचनेचा उपयोग करून संरचना तयार करणे होय. त्याच तंत्राचा उपयोग कशेडी बोगदा बनविताना केली गेली आहे.
* शॉटक्रीट (Shotcrete) आणि रॉक बोल्टींग (Rock Bolting) ः टनेलची अंतर्गत सुरक्षा व मजबुतीसाठी टनेल बोरिंग मशिन (Tunnel Boring Machine) वापरलेली नाही. खडकाच्या स्वरूपामुळे काही ठिकाणी ब्लास्टिंग-ड्रिल करण्यात आले आहे. तसेच आतील बाजू मजबूत करण्यासाठी शॉटक्रिट (सिमेंटचा थर विशिष्ट मशिनच्या साह्याने लावणे) केले गेले आहे.
----

टनेलचा फायदा

* कशेडी घाटातील अपघाताचे प्रमाण कमी होईल
* सध्या वाहतुकीच्या वेळेची बचत ४० टक्केवर
* इंधन बचत‌ सरासरी ५० टक्के इंधनाचा वापर कमी होईल
* सुरक्षा वाढेल, पर्यावरणीय दृष्टीनेही फायद्याचे
* दिवसाला ८ ते १० हजार वाहनांची ये-जा
-----

महत्वाची चौकट

कशेडी घाटाची लांबी - १३ किलोमीटर
प्रवासासाठी लागणारा वेळ - ४५ मिनीटे
कशेडी बोगदा मार्गाची लांबी - ९ किलोमीटर
दोन समांतर बोगद्यांची लांबी - २ किलोमीटर
प्रवासासाठी लागणारा वेळ - ४ मिनिटे
-----

rat20p13.jpg-
78721
खेड ः गळतीमुळे बोगद्यात झालेला चिखल.

निसरड्या रस्त्यामुळे दुचाकीस्वारांचा जीव टांगणीला

बोगद्यात गळती सुरू असल्याने रस्ताही चिखलमय झालेला आहे. या निसरड्या रस्त्यावर दुचाकी घसरून होणाऱ्या  अपघातांमुळे वाहनचालकांचा जीव टांगणीवर आहे. दुचाकींना घडणाऱ्या अपघातांमुळे वाहतूक कोंडीत देखील भर पडत आहे. आत्तापर्यंत या बोगद्यातील गळतीमुळे निसरड्या रस्त्यावरून काही चालकांना जीवही गमवावा लागला असून काही जणं जायबंदी झालेले आहेत. पावसाळ्यात ही स्थिती अधिक गंभीर होत आहे. गळतीचे प्रमाण पावसाळ्यात वाढलेले आहे. गणेशोत्सवादरम्यान मुसळधार पाऊस झालाच तर अपघातामध्ये आणखीन भर पडू शकते.
---

पर्यायी मार्गाची स्थिती

सध्या कशेडी घाटाचा वापर सुरू आहे. पावसाळ्यात स्लीपेजमुळे वाहनचालकांना अडचणी निर्माण होत आहेत. घाट रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडलेले दिसून येतात. तर घाटातील भोगाव हद्दीत रस्ता खचलेला दिसून येत आहे. अवघड वळणावर संरक्षक कठड्यांचा अभाव असल्यामुळे या मार्गावरून वाहने हाकणे हे जिकरीचे बनले असून पर्यायी घाट रस्ता यापूर्वीपेक्षा सद्यस्थितीत अधिक धोकादायक बनलेला आहे. बोगद्याला पर्याय असलेल्या कशेडी घाटामध्ये रस्त्यावर डोंगरातून लाल मातीचे ढिगारे कोसळण्यास प्रतिबंध करण्यासाठी स्टील जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. यामुळे घाटातील वाहतूक अचानक दरडी कोसळून ठप्प होणार नाही असा तात्पुरता दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने कशेडी बोगद्यातील किरकोळ कामे पूर्ण करून बोगद्यात होणारी गळती कायमस्वरूपी थांबवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा चाकरमान्यांपुढे मोठे आव्हान राहणार आहे. या बोगद्यात होणाऱ्या अपघातांना राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग जबाबदार राहणार का0 हा प्रश्नच आहे.
-----
कोट
rat20p20.jpg-
78728
पंकज गोसावी

मुंबई-गोवा महामार्गावरील या दोन्ही बोगद्यांत गळतीच्या ठिकाणी राष्ट्रीय बांधकाम विभागाकडून गळती थांबवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली आहे. जवळपास ८० टक्के गळती कमी झाली आहे. संपूर्णपणे गळती बंद होईल. त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे. तसेच विद्युत पुरवठा देखील सुरळीत करण्यात आलेला आहे. मात्र केव्हातरी काही कालावधीसाठी विद्युत पुरवठा खंडित होतो. पण तो पुन्हा सुरळीत होतो. बोगद्यातील अन्य कामासह जोड रस्त्यावरील कामे अंतिम टप्प्यात असून पुढील एक ते दोन महिन्यात जवळपास सर्वच कामे मार्गी लागतील.
- पंकज गोसावी, अभियंता
-----
कोट
rat20p19.jpg-
78727
विनोद चाळके

कशेडी बोगद्यावरील विहीर नजरेआड मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा हा मानवविरहित यंत्रणांच्या माध्यमातून खणण्यात आला आहे. या बोगद्यासाठी जागा निवडताना हलगर्जीपणा झाल्याचा आरोप काही तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. या बोगद्याच्या वरच्या बाजूला एक जिवंत विहीर आहे. या विहिरीमध्ये बारमाही पाणी असते. बोगदा खणल्यानंतरही वरची विहीर तशीच आहे. त्यामुळे या विहिरीकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले का असा प्रश्न उपस्थित होत आहे. आयआयटी तज्ज्ञांकडूनही या विहिरीतील नैसर्गिक जलस्त्रोताची दखल का घेण्यात आली नाही.
- विनोद चाळके, तालुकाध्यक्ष, भाजप
---
कोट
rat20p18.jpg-
78726
प्रसाद गांधी

कशेडी बोगद्यातून वाहने नेताना मध्यरात्रीच्या सुमारास अनेक वेळा विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असून विद्युत पुरवठा सुरळीत पणे होणे आवश्यक आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोगद्यात भर उन्हाळ्यात पाण्याचे झोत कोसळताना दिसून येतात यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
- प्रसाद गांधी, सामाजिक कार्यकर्ते
----
कोट
- rat20p17.jpg-
78725
संदीप शिरावले

कशेडी बोगद्यासह जोड रस्त्यांवर सूचना व मार्गदर्शक फलकांचा अभाव दिसून येतो. जोड रस्त्यावर अनेक ठिकाणी पावसाळ्यात डोंगरमाथ्यावरील दरडी खाली आलेल्या दिसून येतात. जोड रस्त्याला असलेली गटारे अद्यापही अर्धवट स्थितीत असल्यामुळे उंच डोंगर भागातून येणाऱ्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने बोगद्याला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. त्यामुळे या पाण्यातून माग काढताना वाहन चालकांची मात्र दमछाक होत आहे.
- संदीप शिरावले, वाहनचालक
-----
कोट
rat20p16.jpg-
78724
भूषण कारबळ

बोगद्यात भर उन्हाळ्यात गळती सुरू असल्याने झालेल्या चिखलातून दुचाकी चालवताना माझ्या वडीलांचा अपघात झाला. या अपघातात ते कायमचे जायबंदी झाले. शेवटी चार महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले. आमच्या घरचा कर्ता पुरुष गेल्याने आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. परंतु ही वेळ अन्य कुणावर येऊ नये म्हणून राष्ट्रीय बांधकाम विभागाने याकडे वेळीच उपाययोजना करावी.
- भूषण कारबळ, खेड

Marathi News Esakal
www.esakal.com