कणकवलीत अत्याधुनिक ‘सीटी स्कॅन’
79114
कणकवलीत अत्याधुनिक ‘सीटी स्कॅन’
उपजिल्हा रुग्णालयात सुविधा केंद्र; पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २२ ः येथील उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक २४ तास सी.टी. स्कॅन डायग्नोस्टिक्स सेंटर कार्यान्वित झाले आहे. या यंत्रणेचे उद्घाटन पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते आज करण्यात आले. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि क्रिश्ना डायग्नोस्टिक्स लि., पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर हे केंद्र सुरू केले आहे.
कणकवली उपजिल्हा रूग्णालयात बसविलेले हाय-एंड अॅडव्हान्स सी.टी. स्कॅन मशीन डोक्यापासून पायापर्यंतच्या रूटीन तपासण्यांसह थ्रीडी सीटी आणि सीटी अँजिओग्राफी यासारख्या विशेष तपासण्या उपलब्ध करणार आहे. यामुळे रुग्णांना जिल्ह्याबाहेर जाण्याची गरज भासणार नाही. हे केंद्र २४ तास सातही दिवस कार्यरत राहणार आहे. या मशिनद्वारे स्ट्रोक, मेंदूतील रक्तस्राव यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत त्वरित निदान आणि उपचाराची सुविधा प्रदान होणार असल्याची माहिती यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.विशाल रेड्डी यांनी दिली. या सेंटरवरील सर्व तपासण्यांचे अहवाल क्रिश्ना डायग्नोस्टिक्स लि.च्या टेली-रेडिओलॉजी हबद्वारे काही तासांत उपलब्ध होणार आहेत.
सीटी स्कॅन सेवा ही सेवा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी पूर्णतः मोफत असून, इतर रुग्णांसाठी अत्यल्प दरात उपलब्ध आहे. कोविड नंतरच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना सी.टी. स्कॅन तपासणीची गरज आणि उपयुक्तता वाढली आहे. या प्रकल्पांतर्गत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासह राज्यातील इतर ४५ उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालयांमध्येही २४ तास सी.टी. स्कॅन सेवा सुरू केली आहे.
या कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, डॉ. श्याम पाटील, तुषार चिपळूणकर, औषध निर्माता अधिकारी अनिलकुमार देसाई, बँक संचालिका प्रज्ञा ढवण, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, रुग्णालय अधीक्षक विशाल रेड्डी, आरोग्य अधिकारी पूजा इंगवले, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, डॉ. विद्याधर तायशेटे, अण्णा कोदे, संजय कामतेकर, कळसुली सरपंच सचिन पारधीये, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, विजय चिंदरकर, राजन परब आदी उपस्थित होते.
---
अत्याधुनिक मशीनचे वैशिष्ट्य
- डोक्यापासून पायापर्यंतच्या रूटीन तपासण्यांसह थ्रीडी सीटी आणि सीटी अँजिओग्राफी यासारख्या विशेष तपासण्या
- रुग्णांना जिल्ह्याबाहेर जाण्याची गरज भासणार नाही
- केंद्र २४ तास सातही दिवस कार्यरत राहणार
- आपत्कालीन परिस्थितीत त्वरित निदान आणि उपचाराची सुविधा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.