नेमळेतील पूल वर्षात खचला
79140
नेमळेतील पूल वर्षात खचला
वाहतुकीस धोका; अनेक गावांना जोडणारा दुवा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ ः कुडाळ, तळवडे आणि सावंतवाडी तालुक्यांना जोडणारा तसेच अनेक गावांना वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला नेमळे-गावडेवाडी ताडमाड येथील मुख्य पूल अवघ्या एका वर्षातच खचला आहे. वर्षभरापूर्वीच दीड कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या पुलावर सध्याच्या पावसामुळे मोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांना जीवघेणी कसरत करत प्रवास करावा लागत आहे. यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.
नेमळे-तळवडे मार्गावरील हा पूल परिसरातील अनेक गावांना जोडणारा मुख्य दुवा आहे. विद्यार्थी, नोकरदार आणि सामान्य नागरिक दररोज याच पुलावरून ये-जा करतात. मात्र, नवीन बांधकाम होऊनही अवघ्या वर्षभरातच पुलाची दुरवस्था झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळ्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली आणि धोका अधिक वाढला आहे. रात्रीच्या वेळी आणि कमी प्रकाशात वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज घेणे कठीण होत असून, त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत नेमळे ग्रामपंचायतीने संबंधित विभागाला पुलाच्या डागडुजीसाठी पत्रव्यवहार केला आहे. ग्रामस्थांनी आणि वाहनचालकांनी प्रशासनाकडे तातडीने या पुलावरील खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
----------
करोडो रुपये खर्चूनही स्थिती बिकट
करोडो रुपये खर्चून बांधलेल्या पुलाची एवढ्या कमी वेळात ही अवस्था झाल्याने बांधकामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक प्रशासनाने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन पुलाची दुरुस्ती करावी, जेणेकरून भविष्यातील मोठे अपघात टाळता येतील आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.