न्हावेलीत बिबटे, गवे थेट वस्तीत

न्हावेलीत बिबटे, गवे थेट वस्तीत

Published on

N79205
79197


बिबटे, गवे थेट न्हावेलीतील वस्तीत

‘सीसीटीव्ही’त कैद; रात्री-अपरात्री घराबाहेर पडणे धोक्याचे

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ ः न्हावेली गावात बिबट्या आणि गव्यांचा भरवस्तीत मुक्त संचार वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वन्य प्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी शिंदे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख तथा न्हावेलीचे उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, न्हावेली आणि परिसरात वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. यातच सोमवारी (ता. २१) रात्री न्हावेली ग्रामपंचायत परिसरात भर वस्तीत बिबट्या फिरताना तेथील एका ग्रामस्थाच्या अंगणात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला. यामुळे ग्रामस्थांमध्ये कमालीची भीती पसरली आहे. बिबटे आणि गवे थेट भरवस्तीत फिरू लागल्याने ग्रामस्थांना रात्री-अपरात्री घराबाहेर पडणेही धोक्याचे झाले आहे.
अलीकडेच मळेवाड-कोंडुरा येथे बिबट्याने ग्रामस्थांवर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच, न्हावेली गावात थेट घरांच्या अंगणात बिबट्याचा वावर दिसून आल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. यापूर्वीही गावातील काही शेतकऱ्यांच्या जनावरांवर बिबट्याने हल्ले केले असून, त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वन विभागाकडून अशा घटनांमध्ये तुटपुंजी नुकसान भरपाई देऊन प्रकरणे मिटविली जातात; पण वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात एखाद्या माणसाचा जीव गेल्यास वन विभाग तो भरून देणार का, असा सवाल पार्सेकर यांनी निवेदनातून उपस्थित केला आहे. यावेळी विठ्ठल परब, अनिकेत धवण उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com