हत्तींसमोर वनविभागाची गस्त निष्क्रिय
79432
हत्तींसमोर वनविभागाची गस्त निष्क्रिय
‘लोकेशन’ मिळेना; थेट वस्तीवर दहशतीची टांगती तलवार
कोलझर, ता. २३ ः हत्तींच्या वाढलेल्या मुक्कामासह मुसळधार पावसामुळे वनविभागाची गस्त निष्क्रिय ठरत आहे. त्यामुळे परिसरात हत्तींचा वावर कोणत्याही क्षणी थेट वस्तीत होण्याच्या शक्यतेने दहशतीची टांगती तलवार निर्माण झाली आहे. नुकसानीची तीव्रताही वाढली आहे. हत्तींचा कळप गेली चार महिने कोलझरसह शिरवल, तळकट आणि झोळंबे या तीन गावांमध्ये ठाण मांडून आहे. यात सर्वाधिक काळ कोलझर आणि तळकट भागात त्यांचा उच्छाद सुरू आहे. साधारण दीड महिन्यांपूर्वी आणखी एक कळप येथे आल्याने दोन टस्करांसह हत्तींची संख्या सहावर पोहोचली आहे. नव्याने आलेला ‘गणेश’ हा टस्कर अधिक आक्रमक असल्याने हे संकट आणखी गडद झाले. सध्या त्यांचा मुक्काम कोलझरमध्ये असून नुकसान वाढतच आहे.
या कळपाला थोपवण्यासाठी वनविभागाने गस्त सुरू केली आहे. जवळपास २४ तास त्यांचे पथक या भागात कार्यरत असते. मात्र, हत्तींचा उपद्रव जसजसा वाढत गेला, तशी ही गस्त ढिली पडू लागली आहे. आता तर पावसात वनविभाग गस्तीबाबत पूर्ण संभ्रमात असल्याची स्थिती आहे. पावसाआधी ड्रोनचा वापर करून हत्तींचे ‘लोकेशन’ शोधले जात असे. त्याआधारे हत्तींना नुकसानीपासून थोपवण्यासाठी प्रयत्न तर केले जायचे. पावसात ‘लोकेशन’ मिळणे कठीण बनले आहे. वनविभागाकडील दोनपैकी एक ड्रोन नादुरुस्त झाला. उपलब्ध ड्रोन पावसामुळे वापरता येत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे हत्ती नेमके आहेत कुठे, हे गस्तीपथकाला समजत नाही. दुसरीकडे, हत्तींचा हा कळप अगदी स्वैरपणे कधीही वस्तीत घुसून नुकसान करू लागला आहे. वनविभागाचे पथक कोलझर आणि तळकट मधील ठरावीक ठिकाणीच बसून असते. त्यामुळे हत्ती एकीकडे आणि गस्त तिसरीकडे, अशी अवस्था आहे.
हा कळप अचानक कधीतरी डोंगरातून खाली उतरतो. तो अगदी थेट वस्तीपर्यंत येऊन बागायती उद्ध्वस्त करतो. दोन दिवसांपूर्वी या कळपाने कोलझरमधील श्रीधर देसाई यांच्या घराला लागून असलेल्या बागेत धुडगूस घातला. आठ दिवसांत झालेले बरेचसे नुकसान अगदी वस्तीतील आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीती आणखी वाढली आहे. या सगळ्यातून लवकर मार्ग काढावा, अशी मागणी जोर धरत आहे.
--------------
...अशाही अफवा
या कळपाला कोलझर परिसरातून अन्य भागांत नेण्यासाठी मोहीम राबवावी, अशी मागणी चार महिन्यांपासून सुरू आहे. वनविभागाने त्यात फारसे लक्ष घातलेले नाही. या हत्तींना परत जाण्यासाठी केर मार्गे तिलारी आणि खडपडे मार्गे चंदगड असे दोन रस्ते आहेत. गेल्या महिनाभरात हे हत्ती खडपडे येथे बऱ्याचदा गेले. दोन दिवसांपूर्वी ते शिरवल धरणाच्या पलिकडेपर्यंत गेले होते. यावेळी त्यांना परतीच्या मार्गाला लावण्यासाठी मोहीम राबवायला हवी होती, अशी अपेक्षा स्थानिक व्यक्त करत आहेत. याबाबत उलटसुलट चर्चाही सुरू आहेत. वनविभाग आणि त्यात कार्यरत पथकाला हे हत्ती याच भागात स्थिरावलेले सोयीचे असल्याने त्यांना परतवून आणले जात असल्याच्या अफवाही सुरू आहेत. स्थानिक मात्र या सगळ्यात हतबल झाले आहेत.
---------------
कोट
दोडामार्ग तालुक्यात हत्तींकडून शेतकऱ्यांच्या शेती, माड बागायतींचे नुकसान लक्षात घेता वनविभागाकडून त्यांना रोखण्यासाठीची यंत्रणा २४ तास त्या भागात कार्यरत आहे. मात्र, पावसाळा असल्याने यंत्रणेमध्ये काही अडचणी येत आहेत. ड्रोनसारखी यंत्रणा पावसात निकामी ठरत आहे. मात्र, हत्तींना रोखण्यासाठी आमची यंत्रणा १०० टक्के प्रयत्न करत आहे. ग्रामस्थांकडूनही काही माहिती मिळाल्यास त्या ठिकाणी आमची यंत्रणा पोहचेल व तशाप्रकारची उपायोजना आखेल.
- मिलिश शर्मा, उपवनसंरक्षक, सिंधुदुर्ग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.