ठाकरे शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर

ठाकरे शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर

Published on

ठाकरे शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर
वेंगुर्लेतील वादः आधीच संभ्रमात असलेली संघटना आणखी खोलात
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २४ः विधानसभेतील पराभवानंतर अस्तित्वासाठी झुंजणाऱ्या ठाकरे शिवसेनेला आता अंतर्गत गटबाजीशीही सामना करावा लागत आहे. येथे झालेल्या दाव्या प्रतिदाव्यातून याची प्रचिती आली. या सगळ्यामुळे या पक्षाची उरली सुरली संघटनाही खचण्याची भिती राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
विधानसभेतील पराभवाचा कोकणात सगळ्यात मोठा फटका ठाकरे शिवसेनेला बसला. विधानसभेआधी भाजपला आव्हान देणारा पक्ष म्हणून ठाकरे शिवसेनेकडे पाहिले जात आहे; मात्र पराभवाने संघटना विस्कळीत झाली. पहिले काही दिवस वरिष्ठ नेत्यांकडूनही संघटना सावरण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. नंतर शिंदे शिवसेना आणि भाजपकडून ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळवण्याचा धडाकाच सुरू झाला. आता उरल्या सुरल्या संघटनातही संभ्रमाची स्थिती आहे. यातून उघड गटबाजीचे दर्शन घडू लागले आहे. याचा प्रत्यय वेंगुर्ले तालुक्यात आला.
याची सुरूवात जमिन प्रकरणावर आवाज उठवण्यावरून झाली. ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दाभोली येथील कथीत जमीन प्रकरणावरून वेंगुर्ले येथे जाहीर केलेल्या आंदोलनाकडे ठाकरे गटाच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जवळपास सर्वच पदाधिकाऱ्यांसह स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिकांनीही पाठ फिरवली. तत्पूर्वी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी या सगळ्या संदर्भात पत्रकारपरिषदही घेतली. यातून हा अंतर्गत संघर्ष उघड झाला. गेल्या काही दिवसांपासून दाभोली येथील जमीन खरेदीवरून स्थानिक जमीन मालक व जमीन खरेदीदार यांच्या वाद आहे.
जमीन खरेदी करणाऱ्यांनी बाहेरील महिला आणून स्थानिक जमीन मालक महिलांना मारहाण केल्याचा आरोप करत हे प्रकरण वेंगुर्ले पोलिस स्थानकात नेण्यात आले; मात्र याला ८ दिवस उलटूनही गुन्हे दाखल झाले नसल्याने १ जुलैला माजी आमदार नाईक यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्याला धडक देत जाब विचारला. त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर मारहाण झालेल्या कुटुंबियांची पुन्हा तक्रार दाखल करून घेत या प्रकरणी एकूण १० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. नाईक यांनी यात स्थानिकांना भक्कम पाठिंबा दिला होता.
यानंतर श्री. नाईक व माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पुढील आंदोलनाची दिशा ठरवली. याच आंदोलनाचा भाग म्हणून ठाकरे शिवसेनेतर्फे वेंगुर्ल्यातील सबरजिस्ट्रार कार्यालयावर मोर्चा नेण्याचे नाईक व उपरकर यांनी जाहीर केले होते; मात्र या आंदोलनाला स्थानिक ठाकरे शिवसेनेच्या तालुकाप्रमुख यशवंत परब यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप दबक्या आवाजात सुरू झाला. यातच आंदोलनाच्या आधी ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धूरी यांनी वेंगुर्ला तालुक्यातील जे जे काही विषय असतील ते संघटनेच्या माध्यमातून निश्चितच सोडवले जातील. यामध्ये वरिष्ठांनी हस्तक्षेप करून गैरसमज करू नये.
याबाबत फार मोठी नाराजी तालुकाप्रमुख यांच्यासहित कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली आहे. येणाऱ्या काळात जे काय करायच असेल ते संघटनेच्या प्रोटोकॉलप्रमाणे होईल. अशा प्रकारचा हस्तक्षेप जर कोण करत करून पक्षाची शिस्त बिघडण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे संबंधित विषय नेण्यात येईल असे जाहीर वक्तव्य केले. यावरून ठाकरे शिवसेनेत दोन गट पडल्याची जोरदार चर्चा होती.
या गटबाजीचा प्रत्यय २१ जुलैला वेंगुर्ले येथे झालेल्या आंदोलनात आला. नाईक यांनी वेंगुर्लेत पुकारलेल्या आंदोलनाच्याच वेळात वेंगुर्ले तालुका ठाकरे शिवसेनेच्या वतीने स्वच्छतेत कोकणात प्रथम आलेल्या येथील पालिकेच्या अधिकारी व स्वच्छता कर्मचारी यांचा सत्कार कार्यक्रम ठेवला. याला ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख धुरी, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, तालुकाप्रमुख यशवंत, माजी जिल्हाप्रमुख तुषार सापळे उपस्थित होते.
याचवेळी असलेल्या नाईक यांनी पुकारलेल्या आंदोलनाला अर्थातच हे सगळे अनुपस्थित राहिले. नाईक यांनीही मुत्सद्दीपणे हा विषय हाताळतानाच यावर कसलेच भाष्य केले नाही. दुय्यम निबंधकांना ग्रामस्थांवर झालेल्या अन्यायाबाबतचे निवेदन सादर केले. माजी आमदार उपरकर यांनीही वेंगुर्लेत येण्याचेच टाळले. त्यामुळे ठाकरे गटात सुरू असलेला हा कलगीतुरा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपकडून संघटना वाढीसाठी अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश सुरू आहेत. यात ठाकरे शिवसेना सर्वाधीक टार्गेटवर आहे. अशा स्थितीत ही उघड होणारी गटबाजी संघटनेसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
दरम्यान, या संदर्भात माजी आमदार वैभव नाईक यांना संपर्क साधून तुमच्यात मतभेद आहेत का? असे विचारले असता त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले. दाभोली येथील शिरोडकर कुटुंबियांवर अन्याय झाला आहे. त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्हाप्रमुख बाबुराब धुरी यांच्याशी संपर्क साधला असता, हा संघटनेतील अंतर्गत विषय आहे. कोणतेही मतभेद नाहीत, असे सांगत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

चौकट
गटबाजी न परवडणारी
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. महायुतीकडून याची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. शिंदे शिवसेना आणि भाजप पक्ष पातळीवर या निवडणुकीत आपली ताकद संख्यात्मकदृष्ट्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. या दोन्ही पक्षात इच्छुकांची संख्या जास्त आहे. महायुती झाली तर जागा वाटपाचा मोठा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत महायुतीची मुख्य लढत ठाकरे शिवसेनेशी असणार आहे. या लढतीसाठी पक्षाला सावरण्याचा आव्हान ठाकरे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसमोर असणार आहे. त्याआधीच चव्हाट्यावर येणारी ही गटबाजी संघटनेला परवडणारी नसेल, अशी भावना सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com