सिंधुदुर्गात आढळल्या तीन दुर्मीळ वनस्पती

सिंधुदुर्गात आढळल्या तीन दुर्मीळ वनस्पती

Published on

79640
79641
79642
79643
79644
79645

सिंधुदुर्गात आढळल्या तीन दुर्मीळ वनस्पती
रावराणे महाविद्यालयाकडून शोधः जिल्ह्याच्या वनसंपदेत मोठी भर
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २४ः येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्रा. पैठणे आणि त्यांच्या दोन विद्यार्थीनींनी चिकट मत्स्याक्षी, भुईचाफा, गाठी तुळस (रानतुळस) अशा तीन दुर्मिळ वनस्पती शोधून त्याची नोंद वनस्पती संशोधन संस्थांकडे केली आहे. २५ वर्षानंतर जिल्ह्यात या वनस्पती आढळून आल्याने जिल्ह्याच्या वनसंपदेत मोठी भर पडली आहे.
सिंधुदुर्ग हा नैसर्गिक साधनसंपन्नतेने नटलेला प्रांत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळून येते. आतापर्यत १२०० हून अधिक वनस्पतींची नोंद झालेली आहे. परंतु, आता त्यामध्ये नव्याने तीन दुर्मिळ वनस्पतीची भर पडणार आहे. येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. विजय आश्रुबा पैठणे, महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थीनी सारिका बाणे आणि योगेश्री केळकर यांनी भुईचाफा (Kaemferia rotunda L.), चिकट मत्स्याक्षी (Staurogyne glutinosa Wall. ex C.B.Clarke Kuntze), गाठी तुळस (रानतुळस) (Hyptis capitata Harley) या तीन दुर्मीळ वनस्पती शोधल्या आहेत. २०१५ पासून विविध वनस्पतींचा शोध, त्याची चिकित्सा सुरू होती. त्यातून या तीन वनस्पतीचा शोध लागला आहे. भुईचाफा ही वनस्पती विद्यार्थ्यानी सारिका बाणे हिला शिवडाव (ता.कणकवली) येथे दिसून आली. २५ वर्षानतंर ही वनस्पती कोकणात आढळून आली आहे.
या संशोधनाचा गौरव जीवशास्त्रातील उपयोजित संशोधन संस्था अहमदाबाद (Applied Research in Life Sciences-जून २०२५, अहमदाबाद) या आंतरराष्ट्रीय पुस्तकात करण्यात आला आहे. भारतामध्ये या प्रजातीच्या ८ प्रकार आढळतात. महाराष्ट्रात या वनस्पतीचा आधी फक्त पुणे परिसरात उल्लेख होता. विद्यार्थिनी योगेश्री केळकर हिला चिकट मत्स्याक्षी ही वनस्पती आढळून आली. नावीन्यपूर्ण आणि दुर्मिळ वनस्पती दिसून आल्याने तिने ती प्रा. पैठणे यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी राज्यात या आधी या वनस्पतीची नोंद नसल्याचे स्पष्ट झाले. भारतात या प्रजातीच्या १४ प्रकारांपैकी दोन फक्त महाराष्ट्रात होत्या. ही वनस्पती पूर्वी बिहार, केरळ, ओरिसा, उत्तर प्रदेश या राज्यांत होती. आता महाराष्ट्रातही हिची भर पडली आहे. हे संशोधन जरर्नल ऑफ इकॉनॉमिक टॅक्सोनॉमिक बॉटणी (Journal of Economic Taxonomic Botany-सप्टेंबर २०२४, राजस्थान) या नामांकित जरर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
गाठी तुळस ही वनस्पती अर्थात रानतुळस ही हुमरमळा (ता.कुडाळ) येथे प्रा. पैठणे यांना आढळून आली. पूर्वी या वनस्पतीची नोंद फक्त आंदमान-निकोबार, केरळ, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि गोवा (मोलेम नॅशनल पार्क) येथे होती. महाराष्ट्राच्या वनसंपदेत या प्रजातीची ही पहिली नोंद ठरली आहे. हे संशोधन इंटरनॅशनल जरर्नल ऑफ रिसर्च (International Journal of Advance Research-एप्रिल २०२४, इंदोर, मध्यप्रदेश) मध्ये प्रकाशित झाले आहे. या तिन्ही वनस्पतींचे शुष्क नमुने आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या ''हर्बेरियम'' मध्ये ठेवलेले आहेत. यामुळे भविष्यातील अभ्यासकांना या दुर्मीळ वनस्पती थेट पाहता येणार आहेत. प्रा. पैठणे आणि दोन्ही विद्यार्थीनींचा संस्थेचे अध्यक्ष विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com