कोत्रेवाडी ग्रामस्थांचे १४ ऑगस्ट पासून आंदोलन
कोत्रेवाडी ग्रामस्थ करणार उपोषण
डंपिंग ग्राउंडला विरोध; मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २४ ः जोरजबरदस्तीने वाडीवस्तीलगत राबवण्यात येणाऱ्या डंपिंग ग्राउंड व नगरपंचायत प्रशासनाविरोधात कोत्रेवाडी ग्रामस्थांच्यावतीने १४ ऑगस्टपासून बेमुदत साखळी उपोषण छेडण्यात येणार आहे.
दरम्यान, वारंवार अर्ज, विनंती तसेच आंदोलनं, उपोषणेही करूनही प्रशासन आपला हट्ट सोडत नसल्याने नागरिकांनी पुन्हा उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही देण्यात येणार आहे.
लांजा नगरपंचायतीच्यावतीने कोत्रेवाडी येथे डंपिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित आहे. कोणत्याही शासकीय निकषात न बसणारी अशी ही जागा असतानाही नगरपंचायतीकडून आचारसंहितेच्या काळात या ग्राउंडसाठी जागा खरेदी करण्यात आली होती. हा प्रकल्प अगदी लोक वस्तीलगत म्हणजे लोकवस्तीपासून अगदी १८० ते २०० मीटरवर असून, कोणताही अधिकृत पोहोचमार्ग नसतानाही तो राबवला जात आहे. त्याचा त्रास भविष्यात येथील वाडीवस्तीला होईल, हे लक्षात घेऊन येथील नागरिकांनी गेले चार वर्षे डंपिंग ग्राउंडविरोधात रणशिंग पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर डंपिंग ग्राउंड हटावसाठी ग्रामस्थांच्यावतीने ८ जुलैला एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. या उपोषणाची प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नव्हती. या पार्श्वभूमीवर कोत्रेवाडी ग्रामस्थांच्यावतीने पुन्हा एकदा साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला जाणार आहे. नगरपंचायत जोरजबरदस्तीने हा प्रकल्प राबवू पाहत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. कोत्रेवाडी ग्रामस्थांना देशोधडीला लावण्याचा लांजा नगरपंचायतीच प्रयत्न असून, त्यांचा हा कुटील डाव आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.