वाढत्या आत्महत्यांमुळे सिंधुदुर्गची प्रतिमा मलीन
80084
वाढत्या आत्महत्यांमुळे
सिंधुदुर्गची प्रतिमा मलीन
डॉ. परुळेकर ः कारणे शोधण्याची गरज
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः सिंधुदुर्गात आत्महत्या वाढत असून, यामुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन होत आहे. जिल्ह्यात वाढलेल्या आत्महत्यांच्या घटनांना जबाबदार कोण? प्रचंड वाढलेली बेरोजगारी, ड्रग्जचा विळखा ही तर कारणे नव्हेत ना?, असा प्रश्न डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी उपस्थितीत केला आहे.
श्री. परुळेकर यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांमध्ये १०० टक्के निकाल देणाऱ्या आणि महाराष्ट्रात सर्वाधिक गुणवत्ता दाखवणाऱ्या जिल्ह्यामध्ये सातत्याने आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे, हे एक गंभीर आणि विरोधाभासी चित्र आहे. बेरोजगारीमुळे आलेले वैफल्य हेच आत्महत्येचे प्रमुख कारण बनले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यात सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग केंद्रीय मंत्रिपद अडीच वर्षे असताना, किती युवक-युवतींना उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण आणि आर्थिक प्रोत्साहन मिळाले किंवा किती छोटे उद्योग सुरू झाले, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. याव्यतिरिक्त, जिल्ह्यात ड्रग्जचा (अमली पदार्थांचा) अवैध धंदा तेजीत असल्याचे बोलले जात आहे. अंमली पदार्थांचा वाढता वापर हे देखील आत्महत्यांचे एक प्रमुख कारण मानले जात आहे. या अवैध धंद्याला कोणाचा आशीर्वाद आहे, हा प्रश्नही चर्चेत आहे. जिल्ह्यात शेकडो महिला गोव्यातील वेश्याव्यवसायात अडकल्या असून, दिवसेंदिवस युवकांच्या आत्महत्या वाढत आहेत. एकेकाळी वैचारिक आणि सुजाण नागरिकांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्गची प्रतिमा या घटनांमुळे मलीन होत आहे.’