‘स्मार्ट मीटर’ सक्तीविरोधात जाब विचारणार
80086
‘स्मार्ट मीटर’ सक्तीविरोधात जाब विचारणार
निशांत तोरसकर; ‘सावंतवाडी महावितरण’वर उद्या धडक
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः महावितरण कंपनीने लादलेल्या स्मार्ट मीटर सक्तीविरोधात ठाकरे शिवसेनेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. स्मार्ट मीटर ग्राहकांवर जबरदस्तीने लादले जाऊ नयेत, अशी मागणी करत सोमवारी (ता.२८) सकाळी ११ वाजता महावितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाकरे शिवसेनेचे शहर संघटक निशांत तोरसकर यांनी आज ही माहिती दिली.
श्री. तोरसकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, स्मार्ट मीटरमुळे वीज बिल तिप्पट ते चौपट येत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. वीज कायद्यानुसार स्मार्ट मीटरची सक्ती कोणीही करू शकत नाही. हे मीटर मोफत नसून, केंद्राकडून केवळ ९०० रुपये अनुदान मिळत आहे आणि उर्वरित खर्च ग्राहकांवर लादला जात आहे. तसेच, प्रति युनिट ३० पैसे अतिरिक्त आकारले जात असल्याने वीज बिलात मोठी वाढ होत आहे. संबंधित खासगी कंपनीला हे कंत्राट दिल्यानंतर याबाबत संशय बळावला आहे. विधानसभा निवडणूक याच पैशातून झाली आहे असा संशय आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘सोमवारी सकाळी ११ वाजता महावितरण कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवण्याची मागणी केली जाईल. यासोबतच ग्राहकांना येणाऱ्या भरमसाठ बिलांबाबत आणि वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याबाबतही प्रश्न विचारले जाणार आहेत.’’ यावेळी शहराध्यक्ष शैलेश गवंडळकर, उपजिल्हा संघटक शब्बीर मणीयार आणि समिरा खलील आदी उपस्थित होते.
----------------
एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन
श्री. तोरसकर यांनी महावितरणाच्या लपंडावाकडे लक्ष वेधले. दैनंदिन दहा वेळा वीज खंडित होत असल्याने व्यावसायिक आणि सामान्य ग्राहकांचे मोठे नुकसान होत आहे. भुयारी मार्गातून वीज वाहिन्या टाकण्याचा प्रकल्प मंजूर होऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने तो परत गेला, असेही त्यांनी सांगितले. यावेळी वीज ग्राहक संघटना, नागरिक, सर्व पक्षीय पदाधिकारी व ग्राहकांनी एकजुटीने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.