भराव, दरडी घसरण्यावर स्टेपिंग पद्धतीचा उतारा
80296
भराव, दरडी घसरण्यावर स्टेपिंग पद्धतीचा उतारा
अभियंता पंकज गोसावीः घाटातील पाण्याचा निचरा होण्यासाठी नियोजनद्ध प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १५ःपरशुराम घाटात पावसामुळे गॅबियन वॉलच्या दुरुस्तीच्या कामात अडथळा येत आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतरच या कामाला चालना मिळेल. घाटातील पाण्याचा निचरा होण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जात आहेत. स्टेपिंग पद्धतीने पाण्याचा निचरा झाल्यानंतर भराव, अथवा दरडी घसरण्याचे प्रकार घडणार नाहीत असा विश्वास राष्ट्रीय महामार्ग विभागाचे शाखा अभियंता पंकज गोसावी यानी व्यक्त केला.
जोरदार पावसाने मुक्काम कायम ठेवला असल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील धोका वाढला आहे. यावर तात्पुरती उपाययोजना म्हणून दरडीकडील मार्ग पूर्णपणे बंद करून दुसऱ्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू ठेवली आहे. त्याशिवाय गॅबियन वॉलचा भराव वाहून जात असल्याने तेथे प्लॅस्टिकचे आच्छादन टाकले आहे. परंतु वाढत्या पावसामुळे दुरुस्तीच्या उपाययोजना करण्यात अडथळा येत असून, पावसाचा जोर कमी होताच दुरुस्ती केली जाणार आहे, अशी माहिती पंकज गोसावी यांनी दिली.
परशुराम घाटातील धोकादायक स्थितीत असलेला रस्ता दुरुस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाने हाती घेतला आहे. पावसाळ्यापूर्वी घाटातील अतिशय धोकादायक असलेल्या ठिकाणी काँक्रिटीकरणाला जागोजागी तडे गेले होते. तसेच काही ठिकाणी रस्ताही खचला होता. त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रयत्न सुरू असतानाच काही महिन्यांपूर्वी अचानक रस्त्याचा मोठा भाग खचला आणि त्या ठिकाणची संरक्षक भिंतही कोसळली. तेव्हापासून आजतागायत परशुराम घाटात एकेरी वाहतूक केली जात आहे.
मे महिन्यात पहिल्याच पावसात नव्याने उभारलेली गॅबियन वॉल खचली. त्यानंतर काही दिवसातच या गॅबियन वॉलचा काही भाग भरावासह वाहून गेल्याने या मार्गावरील धोका आणखी वाढला.
चौकट
कृत्रिम धबधब्याचीही भीती
परशुराम घाटाच्या मध्यवर्ती भागात पावसाळ्यात ओहळ वाहून येतात. त्याठिकाणी काँक्रिटीकरणाद्वारे पायऱ्यांसारखे टप्पे तयार करून तो भाग सुरक्षित केला आहे. त्याठिकाणी कृत्रिम धबधब्यासारखा भाग तयार झाला असून, पावसाळ्यात तो धबधबा प्रवाशांना खुणावतो आहे. मात्र परशुराम घाटातील धोकादायक स्थितीमुळे या कृत्रिम धबधब्याचीही भीती प्रवाशांना जाणवत आहे.
चौकट
अवजड वाहतूक अंशतः बंद ठेवावी
या घाटातील दरडीकडील मार्ग अतिशय धोकादायक बनल्याने याठिकाणी बॅरिकेटस उभारून एकेरी वाहतूक सुरू ठेवली आहे. त्यामुळे काही वेळा याठिकाणी वाहतूक कोंडीचे प्रकारही घडत आहेत. विशेषतः अवजड वाहतुकीमुळे वाहतूक कोंडीत जास्त भर पडत आहे. अतिवृष्टीच्या वेळी अवजड वाहतूक सकाळ व संध्याकाळच्या सत्रात बंद ठेवावी, अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.