चिपळूण ःएक राखी, एक देश संकल्पनेसाठी चिपळुणात रॅली
80518
एक राखी, एक देश संकल्पनेसाठी चिपळुणात रॅली
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर उपक्रम; विद्यार्थ्यांच्या राख्या पोस्टाद्वारे जवानांसाठी रवाना
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २८ ः येथील युनायटेड इंग्लिश स्कूल व सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मीडियम स्कूलच्यावतीने रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती जागवणारा एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. ‘एक राखी, एक देश’ या संकल्पनेवर आधारित सहाशे विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. युनायटेड इंग्लिश स्कूल ते चिपळूण मुख्य पोस्ट ऑफिस असा या रॅलीचा मार्ग होता. विद्यार्थ्यांनी भारतीय जवानांसाठी स्वहस्ते तयार केलेल्या राख्या चिपळूण पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून देशभरातील जवानांपर्यंत पाठवण्यात आल्या.
या उपक्रमाची सुरवात युनायटेड इंग्लिश स्कूलच्या प्रवेशद्वारावर मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध यांच्या हस्ते सरस्वती देवी व मातृपूजनाने झाली. शाळेतील आठवी व नववीतील सुमारे ६०० विद्यार्थ्यांनी तिरंगा हातात घेऊन देशभक्तीपर घोषणा देत, ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ अशा गगनभेदी जयघोषांसह रॅलीचे नेतृत्व केले. युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या १८ विद्यार्थ्यांचे वडील भारतीय सैन्यात कार्यरत आहेत.
या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या वडिलांसाठी खास राख्या तयार करून त्या त्यांच्या युनिटच्या पत्त्यावर पाठवण्यात आल्या. ही राखी केवळ बंधूभाव दर्शवणारी नसून, सैन्यातील शूरवीरांना मनोबल देणारी ठरली. पोस्ट ऑफिस परिसरात पोहोचल्यावर युनायटेड इंग्लिश स्कूल व गद्रे इंग्लिश मीडियम स्कूलच्या महिला शिक्षकांनी पोस्ट विभागातील अधिकाऱ्यांचे औक्षण करून त्यांना राखी बांधली. या वेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, नायब तहसीलदार मोरे, उद्यान विभागप्रमुख बापू साडविलकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते भारतीय जवानांसाठीच्या राख्यांची पाकिटे पोस्टमास्तरांकडे औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक संजय बनसोडे, मुख्याध्यापिका संगीता नाईक, शिशूविहारच्या रानडे, गद्रे इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका यशोदे, प्रायमरी विभागप्रमुख गोरिवले, प्री प्रायमरीच्या पोटसुरे तसेच शिक्षक संदीप मुंडेकर, वैशाली चितळे, पराग लघाटे, खेडेकर, तुषार जाधव, मानसी पेढांबकर, क्रीडाशिक्षक समीर कालेकर व धापसी यांचे सहकार्य लाभले. पालक प्रतिनिधींचीही उपस्थिती लक्षणीय ठरली.
कोट
विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण व्हावी यासाठी ‘एक राखी, एक देश’ हा उपक्रम घेतला. राखी हा केवळ बंधाचा उत्सव नसून, तो सुरक्षा व सन्मानाचे प्रतीक आहे.
- विभाकर वाचासिद्ध, मुख्याध्यापक, युनायटेड इंग्लिश स्कूल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.