लांजा - अधिकाऱ्यांनी नागरी प्रश्न तातडीने मार्गी लावावेत
80523
अधिकाऱ्यांनी नागरी प्रश्न तातडीने मार्गी लावावेत
आमदार किरण सामंत; वेरळमध्ये आमदार आपल्या दारी कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २८ ः वेरळ येथील ग्रामस्थांनी आपल्या परिसरातील रस्ते, गटारे, पाणी, वीज, स्मशानभूमी, शालेय पोषण आहार या विषयीच्या समस्या आमदार किरण सामंत यांच्यापुढे मांडल्या. नागरी सुविधांची पूर्तता करताना अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणा व चालढकलपणा करू नये. नागरी प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशा सक्त सूचना आमदार सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
तालुक्यातील नागरिकांची विश्वासाहर्ता जपण्यासाठी आमदार आपल्या दारी, ही संकल्पना आमदार किरण सामंत यांनी प्रत्यक्षात आणण्यास सुरवात केली आहे. विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नागरिकांच्या समस्या, अपूर्ण विकासकामे, प्रलंबित प्रश्न जाणून घेत नागरिकांचे समाधान करण्यावर सामंत यांनी भर दिला आहे. या दौऱ्याची सुरवात वेरळ येथून झाली.
मतदार संघातील गावदौऱ्यामध्ये ग्रामीण भागातील नव्या कामांसह पावसामुळे अपूर्ण राहिलेली विकासकामे पावसाळ्यानंतर पूर्ण करू, असा विश्वास आमदार सामंत यांनी नागरिकांना दिला. नागरी सुविधांबाबत अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करू नये. ते खपवून घेणार नाही, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
तालुक्यातील गावागावात जाऊन आमदार सामंत यांनी प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला. हे दौरे दोन टप्यात होणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात आंजणारी, वेरळ, कणगवली, तळवडे, कुरचुंब, आडवली, देवधे, आसगे, बेनीखुर्द, वाडगाव, वेरवली बुद्रुक, वेरवलीखुर्द-पडवण या गावांमधील जनतेशी संवाद साधत ग्रामविकासावर आढावा घेण्यात आला.
चौकट १
पावसाळ्यानंतर रस्त्यांची कामे
पावसाने लवकर सुरवात केल्यामुळे रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. ती पावसाळ्यानंतर पूर्ण होतील, असा ठाम विश्वास आमदार किरण सामंत यांनी ग्रामस्थांना दिला तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांना सहकार्य करावे, अशा सूचनाही दिल्या.
चौकट २
विलवडे, वेरवलीत एकतरी जलद गाडी थांबवावी
कोकण रेल्वेमार्गावरील विलवडे, वेरवली ही लांजा तालुक्यातील अत्यंत महत्वाची रेल्वेस्थानके आहेत. त्या ठिकाणी येत्या काही दिवसात एकतरी जलद गाडी थांबावी त्यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी लांजावासियांतर्फे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.