‘झाराप-पत्रादेवी’वरील जीवितहानी थांबवा
80550
रस्त्याचा दर्जा निकृष्ट, वाढले अपघात
मनसे शिष्टमंडळ; ‘झाराप-पत्रादेवी’वरील जीवितहानी थांबवा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी या टप्प्यावर वाढलेल्या अपघातांमुळे होणारी जीवितहानी थांबवण्यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने आज महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी रस्त्याच्या कामाच्या निकृष्ट दर्जावर आणि अर्धवट कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत महामार्ग विभागाचे अधिकारी वृषाली पाटील आणि मुकेश साळुंके यांना विविध समस्यांबाबत जाब विचारला.
बांदा येथील पुलाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते महिनाभरापूर्वी झाले असतानाही पुलावरील पथदिवे अजूनही बंद असल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून प्रामुख्याने मांडला. महामार्गाचे काम अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे असून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याचा आरोप करण्यात आला. महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे प्रवाशांना आणि स्थानिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. मळगावमधील सेवा रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने स्थानिक लोकांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या अपूर्ण रस्त्यामुळे अनेक अपघात झाल्याचेही मनसेने निदर्शनास आणले. या व्यतिरिक्त, महामार्गावर कुठेही सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था नसल्याचा आणि अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून अपघात होत असल्याचा मुद्दाही उपस्थित केला. या अपघातांना आणि अपूर्ण कामांना जबाबदार कोण? असा संतप्त प्रश्न विचारत, काम चालू असताना अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून कामाची गुणवत्ता सुनिश्चित करावी, अशीही मागणी केली.
---
सर्व कामे तातडीने मार्गी लावू!
दरम्यान, अधिकारी पाटील आणि साळुंके यांनी मनसेच्या सर्व प्रश्नांना थेट उत्तरे देणे टाळले. त्यांनी लवकरच महामार्गाची रीतसर पाहणी करून सर्व कामे तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल केसरकर, उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, तालुकाध्यक्ष मिलींद सावंत, शहराध्यक्ष अॅड. राजू कासकर, विभाग अध्यक्ष काशिराम गावडे, उपविभाग अध्यक्ष राकेश परब, आशितोष राऊळ आणि मंदार परब उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.