सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर तिकीट सुविधा हवी
80605
सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर तिकीट सुविधा हवी
प्रवासी समन्वय संघटना; रेल्वे अधिकाऱ्यांकड़ून स्थानकांची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २८ ः येथील पोस्ट कार्यालयातील रेल्वे तिकीट आरक्षण सुविधा गेले वर्षभर बंद आहे. प्रवाशांच्या सोईसाठी येथील यंत्रणा काढून त्याऐवजी सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर तिकीट सुविधा सुरू करावी, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी समन्वय संघटनेतर्फे उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांकडे आज केली.
रेल्वे प्रवासी संघटनेने सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर १ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा दिला आहे. याची दखल घेत आज रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवासी समन्वय व संघर्ष समितीच्या समवेत विविध रेल्वे स्थानकांची पाहणी करत तेथील समस्या जाणून घेतल्या. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येणारे चाकरमानी प्रवासी लक्षात घेता त्यांना सुविधा मिळाव्यात, त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी समन्वय संघर्ष समितीच्या माध्यमातून १ ऑगस्टला जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रविवारपासून (ता. २७) खारेपाटण ते सिंधुदुर्ग स्थानकाची पाहणी केली. आज सिंधुदुर्ग स्थानकावर पाहणी करण्यात आली. यावेळी रेल्वेचे अधिकारी मधुकर मातोंडकर, शैलेश अंबाडेकर, विजय सामंत, चिन्मय अंधारी आदी उपस्थित होते. प्रवासी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पावसकर, रानबांबुळी सरपंच परशुराम परब, अजय मयेकर, नागेश ओरोसकर, स्वप्नील गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अधिकाऱ्यांनी पोस्ट विभागातील बंद असलेल्या पीआरएस तिकीट यंत्रणेची पाहणी केली. जिल्हा पोस्ट कार्यालयातील रेल्वे तिकीट आरक्षण सुविधा कोकण रेल्वे प्रशासनाकडूनच कित्येक महिने बंद केल्याचे पोस्ट अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे येथील बंद यंत्रणा जिल्ह्याचे प्रमुख असलेल्या सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकात सुरू करावी, अशी मागणी करत ही सुविधा तत्काळ सुरू न झाल्यास १ ऑगस्टचे आंदोलन अटळ असल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पावसकर यांनी स्पष्ट केले. कोकण रेल्वेच्या प्रवाशांच्या दृष्टीने सर्व सुविधा, जलद गाड्यांना थांबा आणि तिकीट आरक्षण सुविधा या मागणीवर प्रवासी संघटना ठाम आहे. सर्व स्थानकांच्या प्रश्नांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन कायम आहे, असे संघटनेचे अध्यक्ष पावस्कर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.