स्मार्ट वीज मीटर आठ दिवसांत हटवा
80606
स्मार्ट वीज मीटर आठ दिवसांत हटवा
महावितरणच्या अधिकाऱ्यांना इशारा; सावंतवाडीत सर्वपक्षीयांसह ग्राहक एकवटले
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ ः वीज ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता सावंतवाडी शहरात बसविलेले स्मार्ट मीटर आठ दिवसांत हटवावेत. ग्राहकांना कल्पना दिल्याशिवाय शहरात असे मीटर बसवू नयेत. असा प्रकार पुन्हा घडल्यास याद राखा, असा सज्जड दम येथील वीज वितरणचे उपअभियंता शैलेश राक्षे यांना आज वीज ग्राहकांसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी दिला. आठ दिवसांत स्मार्ट प्रीपेड मीटर न काढल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
ठाकरे शिवसेनेचे शहर संघटक निशांत तोरस्कर यांनी स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात आवाज उठवत या संदर्भात येथील वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनामध्ये सर्वपक्षीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत आज सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध ग्राहकांनी शहरातील महावितरण कार्यालयावर धडक देत उपअभियंता राक्षे यांना घेराओ घालत आंदोलन छेडले.
उद्योगपतींचे स्मार्ट प्रीपेड मीटर आम्हाला नको, कोणतीही पूर्वकल्पना देता बसविलेले मीटर तत्काळ काढून न्या, अन्यथा यापुढे वीज बिल भरणार नाही. त्या मीटरचे बिल सर्वसामान्यांना परवडणारे नाही. आमच्यावर सक्ती नको, अशी मागणी ग्राहकांनी केली. आम्ही मीटर बसवा अशी परवानगी दिली नाही. घरी कोणी नसतानाही बऱ्याच जणांचे मीटर बसविले आहेत, असा आरोप ग्राहकांनी केला. त्यावेळी असा प्रकार पुन्हा घडल्यास गप्प बसणार नाही. कोणावरही स्मार्ट प्रीपेड मीटरची सक्ती करू नका, बसविलेले मीटर आठ दिवसांत काढून त्या ठिकाणी जुने मीटर बसवा; अन्यथा पुन्हा एकदा याच ठिकाणी तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला.
ग्राहकांची आक्रमकता आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास श्री. राक्षे सक्षम नसल्याचे लक्षात येताच उपस्थितांनी शहरात तसेच तालुक्यात ज्यांनी स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याबाबत ठेका घेतला आहे, त्या संबंधित ठेकेदाराला या ठिकाणी हजर करा. त्यांनी आम्हाला उत्तरे द्यावीत, अशी मागणी केली. अधिकाऱ्यांनी संबंधिताला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यामुळे उपअभियंता राक्षे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून या संदर्भात तोडगा काढू, असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलकांनी माघार घेतली.
यावेळी श्री. तोरसकर यांच्यासह राष्ट्रवादीचे पुंडलिक दळवी, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख शैलेश गंवडळकर, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, आशिष सुभेदार, विनोद ठाकूर, प्रशांत बुगडे, महेश नार्वेकर, विकास नार्वेकर, कौशिक आगा, समीरा खालील, रफिक मेमन, धनश्री मराठे, अल्ताफ विरानी, सत्यजित देशमुख, देवा टेमकर, अशोक धुरी, राजू कासकर, अनिल केसरकर, महेश धुरी, श्रुतिका दळवी, अनिकेत मोरया, नीलेश म्हाडगुत, ऋत्वेद सावंत आदी उपस्थित होते.
----------------
विश्वासात न घेता मीटर बसविलेच का?
ग्राहकांना विश्वासात घेऊनच त्यांची परवानगी असल्यास वीज मीटर बसवता येतो; अन्यथा तो बसवता येत नाही, असा कायदा असताना आपण सावंतवाडी शहरासह तालुक्यांमध्ये बऱ्याच ग्राहकांच्या घरी जुना मीटर काढून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसविले, शिवाय याबाबतची कुठलीही कल्पना त्यांना दिली नाही. हा नेमका कायदा कुठला? आणि ही जबरदस्ती का? असा प्रश्न यावेळी पदाधिकाऱ्यांनी विचारला. या प्रश्नावर उपअभियंता राक्षे निरुत्तर झाले. त्यांनी काहींची परवानगी घेऊनच मीटर बसवल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.